Friday, November 6, 2026

वृत्त क्रमांक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून गावांचा कायापालट करा !

• नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवाहन

• उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच ग्रामपंचायतींसह सगरोळी व बारड ग्रामपंचायतींचा गौरव

नांदेड, दि. 6 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 च्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधून नांदेड जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

अभियानातील प्रत्येक निकषाचा अभ्यास करून मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल प्रशासन आणि लोकसहभाग या क्षेत्रांत ठोस कामे करावीत. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी ग्रामपंचायतींना समन्वयातून सहकार्य करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले. कार्यशाळेत ग्रामपंचायतींच्या अडचणींवर चर्चा करताना गाव नमुना क्रमांक आठचे संगणकीकरण आणि कर वसुलीसाठी क्यूआर संकेत प्रणालीचा वापर करण्यावर भर देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी उपलब्धतेचे नियोजन, काटकसरीने वापर आणि गावपातळीवरील उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

अभियानाच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या येरगी (ता. देगलूर), बोंढार नेरली व वडवणा खडकी (ता. नांदेड), लखमापूर (ता. माहूर) आणि पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) या पाच ग्रामपंचायतींच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच क्यूआर संकेत प्रणालीद्वारे प्रभावी कर वसुली केल्याबद्दल सगरोळी (ता. बिलोली) आणि 928 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा आधारित आदर्श ग्राम उपक्रम राबविल्याबद्दल बारड (ता. मुदखेड) ग्रामपंचायतीचा विशेष गौरव करण्यात आला. बारड ग्रामपंचायतीच्या उपक्रमासाठी शासनाने एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. ग्रामसेवक संघटनेचे अमृत शिंदे यांनी अभियान यशस्वी करण्याची ग्वाही दिली. ग्रामपंचायत अधिकारी मधुकर मोरे यांनी अभियानाचे सादरीकरण केले. 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी. बी. गिरी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, डॉ. एस. बी. खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, मयूरकुमार आंदेलवाड, अमित राठोड, राहुल रावसाहेब, डॉ. निलकुमार ऐतवडे, डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

***







No comments:

Post a Comment

महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्...