आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत
जिल्ह्यातील नागरीकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे
– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात केंद्र शासनाची आयुष्यमान भव मोहिम 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राबविली जात आहे. गावपातळीपर्यंत गुणवत्ता पुर्वक आरोग्य सेवा सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हे या मोहिमेचे उदिष्ट आहे. या अंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमधून आरोग्य मेळावे व आरोग्य सभांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 377 उपकेंद्र व 69 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील या आरोग्य मेळाव्यातून नागरीकांनी सहभागी होऊन आरोग्य विषयक सोई सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
जिल्ह्यात 1 ऑक्टोंबर 2023 रोजी *स्वच्छता ही सेवा* अंतर्गत सर्व आरोग्य संस्था व परिसर स्वच्छ व सुंदर केला जाणार आहे. 2 ऑक्टोंबर 2023 रोजी गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये आयुष्यमान सभा आयोजित केली जाणार आहे. 100 टक्के आयुष्यमान कार्ड, आभा आयडी (ABHA ID) नोंदणी करुन आयुष्यमान कार्डचे (गोल्डन कार्ड ) वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच असंसर्गजन्य आजारांची माहिती जसे की, हाय रिस्क फॅक्टर, योग्य आहार विहार, मानसिक आरोग्य, सिकलसेल आजार, लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग इ. संसर्गजन्य रोग, टेली कन्सलटेशन, इ. माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.
दर शनिवारी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान हेल्थ मेलाचे आयोजन करण्यात येणार आहे. निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे ही योजना राबविली जाणार आहे. आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत आरोग्यवर्धीनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मेळाव्यात 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे आरोग्य तपासणी, बीपी, शुगर, वजन उंची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, नाक, कान व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्य चिकित्सक तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून गंभीर रुग्णांना संदर्भित करुन औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. आजपर्यत जिल्ह्यात 85 हजार 263 जणांची तपासणी करण्यात आली असून, 9 हजार 54 रुग्णांना आयुष योजने अंतर्गत उपचार करण्यात येत आहेत.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्व नागरीकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार असून आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतीवर्ष 5 लाख रुपये आहे. या योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालंयामधून उपचाराचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान आयुष्यमान भारत विमा योजना यामध्ये प्रत्येकाला स्वतःचे 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा योजना असलेले आयुष्यमान कार्ड स्वतःचे स्वतः काढता येण्याची सोय आयुष्यमान ॲपद्वारे उपलब्ध झाली आहे. हे ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड केल्यानंतर त्यात बेनिफिशरी हा पर्याय वापरून त्यामध्ये आधार लिंक मोबाईल नंबर टाकून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
0000