Thursday, February 13, 2025
वृत्त क्रमांक 177
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9.20वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.25 वा.मोटारीने भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, तरोडा खुर्द नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. भक्ती लॉन्स, नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. बैठकीसाठी राखीव. स्थळ- भक्ती लॉन्स, नांदेड . दुपारी 1.30 वा. विमानाने नांदेडहून छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.
00000
वृत्त क्रमांक 176
जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष
(राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी यांचा दौरा
नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायं.5.30 वाजता पुणे येथून विमानाने नांदेड विमानतळावर आगमन व सर्किट हाऊस कडे रवाना. रात्री 7.30 वाजता जैन समाज पदाधिकारी यांच्यासोबत सर्कीट हाऊस येथे बैठकीस उपस्थिती.
रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता जैन मंदिर येथे वाहनाद्वारे सदिच्छा भेट. सकाळी 11 वाजता व्यापारी उद्योजक संघटनाच्या प्रतिनिधी सोबत बैठक स्थळ –सर्कीट हाऊस सभागृह. सायं 5 वाजता सकल जैन समाज आयोजित पुरस्कार समारंभास उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन, नांदेड .
00000
वृत्त क्रमांक 175
28 फेब्रुवारी रोजी नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन
आयोजनाची बैठक संपन्न
नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड आयोजित ग्रंथोत्सवाचे नियोजन पूर्वतयारी करीता शासनाने गठीत केलेल्या समितीची बैठक आज जिल्हा ग्रंथालयात घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करुन नांदेड येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन निश्चित करण्यात आले.
या बैठकीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे प्रतिनिधी रोहिदास बस्वदे, प्रकाशन संस्था यांचे प्रतिनिधी निर्मलकुमार सुर्यवंशी, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधरजी पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, सहसचिव संजय पाटील,साहित्यिक नारायण शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, संतोष इंगळे, कैलाशचंद्र गायकवाड व अजय वटटमवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय ग्रंथोत्सवात साहित्यिक, लेखक व विविध क्षेत्रातील वक्त्यांच्या संदर्भात चर्चा करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन ग्रंथोत्सवात सहकार्य करण्याबाबत विनंती केली.
00000
वृत्त क्रमांक 174
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना
नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ व 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच आपल्या अर्जातील त्रुटीची पुर्तता एसएमएस प्राप्त झाल्याच्या 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे समक्ष सादर करावा. दिलेल्या मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सन 2024-25 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज वसतीगृह लॉगीन व इतर कारणामुळे अपात्र झाले आहेत व ज्यांचे अर्ज अलॉटमेंट पेडींग , रिजेक्ट, अंडर स्क्रुटनी , वेटींग मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी सदरचे अर्ज विद्यार्थी लॉगीनवर त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात येत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरते वेळेस जे मेल आयडी जोडलेले आहेत. त्यावर सेड बॅक टू अप्लीकन्ट असे मेल आलेले आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज व्यवस्थित निकषानुसार सर्व कागदपत्र जोडून अर्ज त्रुटी मध्ये आल्यानंतर 7 दिवसाच्या आत सदर अर्जाची एक प्रत आपल्या प्रवेशित महाविद्याल्यात सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
लेख
मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली पासून गल्लीपर्यंत एक मंतरलेले वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. मराठी भाषा तिचा विस्तार घराघरातील मराठी मराठीच्या अन्य भाषिक भगिनी मराठीचा विस्तार सात समुद्रापलिकडे गेलेली मराठी अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे ऊर भरून यावा असे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिची प्राचीनता, शासनाच्या योजना आणि जागतिक स्तरावरील आपल्या माय मराठीची नोंद या सर्व घटनाक्रमाचा उहापोह करणे औचित्यपूर्ण आहे.
मराठी भाषेचे प्राचीन संदर्भ
मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील महत्त्वाची भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेतून झाल्याचे भाषाशास्त्रज्ञ मानतात. मराठीत प्राचीनतम लिखित संदर्भ १०-११ व्या शतकातील 'शिलाहार ताम्रपटां'मध्ये आढळतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे मराठीत उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन गद्य स्वरूपातील साहित्य आहे. मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. तसेच ज्ञानेश्वरांनी रचलेली भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ही मराठीत लिहिलेली पहिली मोठी साहित्यकृती मानली जाते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सापडलेल्या जुन्या पांडू लिपी, शिलालेख, यामध्ये देखील मराठी भाषेची नोंद सापडते.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा
भारत सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष ठरवलेले होते. यामध्ये
1. भाषेला १५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन लिखित साहित्य परंपरा असावी.
2. स्वतंत्र व्याकरण आणि समृद्ध साहित्य असावे.
3. संस्कृतीवर महत्त्वपूर्ण प्रभाव असावा.
लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकयांचे अभंग, दासबोध, पंडितराज जगन्नाथांची संस्कृत-मराठी लेखन परंपरा आणि पुढे येणाऱ्या संत साहित्यामुळे मराठी भाषा या निकषांमध्ये बसते. या संदर्भात पुरावा देण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले होते. विविध स्तरावरून यासाठी पाठपुरावा केला जात होता. 3 ऑक्टोबर 2024 ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन येत असल्यामुळे सध्या तमाम मराठी मुलुखामध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. मंतरलेल्या आणि भारावलेल्या वातावरणातच दिल्लीत होणाऱ्या सारस्वतांच्या मेळामध्ये अनेकांनी कुच करायचे ठरविले आहे.
शासनाचे भाषा संवर्धनाचे उपाय
मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
मराठी भाषा विभागाची स्थापना राज्य शासनाने 2011 मध्ये केली. शासनाने स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला असून, तो जतन आणि संवर्धनाचे विविध धोरण आखतो.
मराठी भाषा धोरण: २०१३ मध्ये राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धन आणि प्रसारासाठी धोरण आखले.
मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कायदा: २०२२ मध्ये 'महाराष्ट्र मराठी भाषा अधिनियम' संमत करण्यात आला, ज्यामुळे शासकीय कामकाजात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
माय मराठीच्या संवर्धनाचा विचार व्हावा यासाठी मराठी भाषा भवन मुंबई येथे होणार आहे
शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेमध्ये कामकाज करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
मराठी भाषा दिवस (२७ फेब्रुवारी): कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.
मराठी शाळांसाठी अनुदाने: इंग्रजी माध्यमाकडे झुकणाऱ्या प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी मराठी शाळांना अनुदाने दिली जातात.
४) बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि जागतिक पातळीवरील मराठी भाषा
महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचा प्रचार आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ करते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे. या ठिकाणी मराठी सण उत्सव व भाषा संदर्भातील कार्यक्रम नियमितपणे घेतली जातात. महाराष्ट्रात केवळ चांदा ते बांदा मराठी आहेत अशी धारणात चुकीची ठरते मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ,गुजरात एवढेच नव्हे तर सीमा लगत नसतानाही दिल्लीमध्ये जवळपास पाच लाख मराठी नागरिक रहिवासी आहेत. एकट्या दिल्लीमध्ये शेकडो मराठी मंडळे कार्यरत असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी आपले मराठी सण उत्सव परंपरा राजधानी दिल्लीमध्ये सुरू ठेवली आहे नवी दिल्लीमध्ये दोन मराठी शाळा व अनेक मराठी मंडळे मराठी भाषेची सेवा कसोशीने करत आहे.
भारताबाहेर मराठी भाषा:
कविवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या कवितेमध्ये ....
भाषेचे आणि जातीचे काय असते नाते
भाषा म्हणजे धान्य धर्म म्हणजे जाते
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा
पऱ्हाटीकडून बोंडाचीच कराल ना आशा
असे भाषा आणि धर्माचे वर्णन करतात. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन सर्व जाती धर्माची मंडळी मराठीमध्ये बोलतात. देवनागरी लिपी आणि अनेक भाषांमधले शब्द स्वतःमध्ये सामावून घेण्याची वृत्ती यामुळे ही भाषा लोकप्रिय आणि अधिक बोलल्या जाते जगामध्ये दहाव्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते जवळपास दहा कोटी जनता ही भाषा बोलते. काही ठिकाणचे मराठी मंडळ तर भारतातील भाषिक उपक्रमांना लाजवेल अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करते. यामध्ये उल्लेखनीय नोंदी म्हणजे लंडनमध्ये मराठी भाषेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते.ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मराठी सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. कराचीतील मराठी मंडळी अजूनही गणेशोत्सवाला विसरली नाही.
दुबई आणि सिंगापूरमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. जगाच्या पाठीवर जाई ठिकाणी मराठी माणूस गेला त्या ठिकाणी तो तीन गोष्टी करतो एक म्हणजे मराठी मंडळ स्थापन करतो, दुसरा म्हणजे गणेशोत्सवात गणपतीला विसरत नाही आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेल्या आदर्शांना त्याला विसरणे शक्य नसते. त्यामुळे शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिन, दिवाळी,दसरा, रक्षाबंधन अशा अनेक सणांना मराठी भाषा मराठी उत्सव आणि मराठी अस्मितेचा मुलामा चढलेला असतो त्यामुळे भाषेसोबत संस्कृती हे देखील मराठी भाषा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
जागतिक स्तरावर मराठी भाषेचे स्थान
मराठी ही जगभरातील प्रमुख भाषांपैकी एक आहे. काही महत्त्वाचे आकडेवारी दाखले –
जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये १०व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे.भारतात हिंदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची मातृभाषा असलेली भाषा.९ते १० कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा मराठी आहे.
दिल्लीतील महोत्सव
दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होणे, ही एक ऐतिहासिक बाब आहे. महाराष्ट्राबाहेर हे संमेलन होत असून, ते मराठी भाषेच्या जागतिक पातळीवरील महत्त्वाचे स्थान दर्शवते. यावेळी साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचे चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जात आहेत. दिल्लीच्या विज्ञान भवनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करणार आहे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर भूषवित आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील शेकडो प्रकाशक आपल्या प्रकाशनासह दिल्लीत डेरे दाखल होत आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जिल्ह्यात घट्ट पाळीमुळे असणाऱ्या ग्रंथ चळवळीतील अनेक मान्यवर प्रकाशक साहित्यिक कवी लेखक समीक्षक दिल्लीकडे कूच करणार आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण देशात भारावलेले वातावरण निर्माण होत आहे. मराठी सारस्वतांमध्ये तर या संमेलनाचे प्रचंड आकर्षण असून विविध उपक्रम संमेलनाची पूर्वतयारी म्हणून गावागावात सुरू झाले आहे.
खरे म्हणजे आमची माय मराठी कधीच लोकल नव्हती ती कायम अटकेपार ग्लोबलच होती. मराठी ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती आता आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, तिच्या संवर्धनासाठी शासन आणि बृहन्महाराष्ट्र मंडळे योगदान देत आहेत. अशा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मराठीचा जागतिक प्रसार अधिक व्यापक होईल, यात शंका नाही. त्यामुळेच 21, 22, 23 फेब्रुवारी मराठी भाषकांच्या कॅलेंडरवर राखीव तारीख ठरली आहे... तेव्हा चलो दिल्ली !
प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
97O2858777
वृत्त क्रमांक 173
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा
नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईहून विमानाने सकाळी 8.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड कडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वा नांदेड जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभाग आढावा बैठक. स्थळ- उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड . सकाळी 10 वा. पत्रकार परिषद स्थळ- उद्योग भवन, नांदेड . सकाळी 10.30 वा. उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.
00000
#डॉमिर्झारफीअहमदबेग अ.भा. #मराठीसाहित्यसंमेलन #नांदेड
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...