Saturday, August 15, 2020

 वृत्त क्र. 766 

87 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी

 196 बाधितांची भर तर चोघांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  शनिवार 15  ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 87 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले.

 आजच्या एकुण 1 हजार 769 अहवालापैकी  1 हजार 565 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 11 एवढी झाली असून यातील 2 हजार 312 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 181 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 शुक्रवार 14  ऑगस्ट रोजी  मुदखेड माळकौठा येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा, लोहा येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा, नांदेड सोमेश कॉलनी येथील 20 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शनिवार  15 ऑगस्ट रोजी दीपनगर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 144 एवढी झाली आहे.  

  आज बरे झालेल्या 87 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 11, नायगाव कोविड केअर सेंटर 17, हदगाव कोविड केअर सेंटर 15, खाजगी रुग्णालय 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, बिलोली कोविड केअर सेंटर 1, माहूर कोविड केअर सेंटर 1, लोहा कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, मुखेड कोविड केअर सेंटर 8, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय कोविड केअर सेंटर 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, कंधार कोविड केअर सेंटर 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 3 असे एकूण 87 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 10, लोहा तालुक्यात 5, नायगाव तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1 , मुदखेड तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 4,  अर्धापूर तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, उमरी तालुक्यात 11, उदगीर तालुक्यात 1 असे एकुण 48 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 82, अर्धापूर तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 26, किनवट तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 22, नांदेड ग्रामीण 8, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली तालुक्यात 1 असे एकुण 148 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 197, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 604, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 33, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 30, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 34, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 99, लोहा कोविड केअर सेंटर येथे 22, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 70, किनवट कोविड केअर सेंटर येथे 34, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 17, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 8, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 27, बारड कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 17, खाजगी रुग्णालयात 135 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 337,

घेतलेले स्वॅब- 29 हजार 184,

निगेटिव्ह स्वॅब- 23 हजार 40,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 196,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 011,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 144,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 312,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 537,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 614, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 181.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 

 

वृत्त क्र. 765 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सणासाठी 

जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना

    

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात पोळा सण मंगळवार 18 ऑगस्ट रोजी साजरा होणार असून हा सण ग्रामपातळीवर व्यापक स्वरुपात साजरा होतो. या सणाचे औचित्य साधून ग्रामपातळीवर कोरोना संसर्गजन्य विषाणुचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खालील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन पोळा सण साजरा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

 

पोळा सण हा घरगुती सण म्हणून साजरा करावा. यादिवशी मिरवणुका काढू नयेत. अत्यंत साधेपणाने व मर्यादित व्यक्ती समवेत मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर आदींचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांची ग्रामपातळीवर नियुक्ती करुन कोविड-19 कोरेाना प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन होऊन विषाणुंचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी धार्मिक स्थळाच्या‍ ठिकाणी लोकांचा जमा एकत्रित होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानिक स्तरावर नियोजन करुन हा सण व्यवस्थितरित्या पार पडेल याची इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी योग्य ती कार्यवाही करावी.

 

जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश गुरुवार 20 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, सार्वजनिक रितीने घोषणा देणार नाही, गाणी म्हणणार नाहीत किंवा वाद्य वाजविणार नाहीत. तसेच नांदेड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आदेश लागू असल्याने धार्मिक स्थळावर नागरिक, भाविकांना पुजेचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 

पाच पोलीस कर्मचाऱ्यांना

महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- नांदेड पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात हे सन्मानचिन्ह देण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक देशमुख, पोलीस नाईक सुर्यकांत घुगे, मारोती केसगीर, शामसुंदर छत्रकर यांना ही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रितांची उपस्थिती होती.

00000




देशासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबद्ध होऊन

आपले योगदान देण्याची अत्यावश्यकता

-  पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 15 :- अनेक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या सारख्या असंख्य सेनांनीने भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून देशाला लोकशाही मिळाली. याची आपण सदैव जाणीव ठेवून देशाच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे कटिबद्ध होत नागरिक म्हणून आपआपली कर्तव्य सुद्धा पार पाडली पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.  

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित गुणवंत विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

देशाची एकता, सदृढ एकोपा, सलोखा राखण्याची मोठी जाबदारी आजच्या नवीन पिढीवर आहे. ही जबाबदारी पार पाडत असतांना आज विशेषत: कोरोना सारख्या महामारीला समोर जात असतांना याचा खंबीरपणे मुकाबला आपण सर्वजन करीत आहोत. डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉइज, पोलीस, महसूल प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदाचा त्यांनी गौरव केला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना सारख्या या प्रसंगाला अतिशय संयमाने आपण सर्व समोर जात आहोत. कोरोनातून अनेक जण मृत्यू पडले असले तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आगामी काळात आपण या कोरोनाच्या महामारीवर मात करुन पुन्हा एकदा आपले जनजीवन नियमित व सुरळीतपणे पार पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिला आहे. परंतू कोरोनामुळे या सुविधेसाठी निधी देण्यासाठी कमतरता आली असली तरी या निधीतून आरोग्या सुविधा बळकट करुन सामान्य नागरिकांना गरजूला विनामुल्य दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. यात विविध रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यावर आमचा भर आहे.  जिल्हा न्यायालयाची नवीन अद्यावत इमारत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. यासह जिल्ह्यातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न असून यामुळे अनेक कामांना गती मिळेल. यंदाचा पाऊस चांगला झाल्यामुळे विविध प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न तेवढा चिंतेचा राहिलेला नाही. बळीराजासह आपल्या सर्वांना ईश्वराने शक्ती देवो आणि या कोरोना सारख्या कठीन प्रसंगाला सामोरे जातांना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण यशस्वी होवो, या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

जिल्ह्यातील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दहावीसाठी जिल्ह्यातून सन 2018-19 या वर्षी राष्ट्रीय स्तर परीक्षेत 19 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता यातील 5 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यात नागार्जुना इंग्लीश स्कूल नांदेडचा तेजस विद्यासागर चेके, महात्मा फुले हायस्कुल नांदेडचा आदित्य गंगाधर बेळगे, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूल नांदेडचा आनंद विश्वनाथ मठपती, ग्यानमाता विद्या विहार नांदेडचा हर्षवर्धन संजय जाजू, जिज्ञासा विद्यालय पुयणी नांदेडचा धीरजकुमार सदाशित पचलिंग या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

उद्योग घटकांना पुरस्काराचे वितरण

जिल्हा उद्योग केंद्र नांदेडच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील उद्योजकांना चालना देण्याच्या उद्देशाने थकबाकीदार नसलेल्या यशस्वी उद्योजकांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा प्रथम पुरस्कार मे. साईकृष्णा फुडस एमआयडीसी नांदेड यांना देण्यात आला. याचे स्वरुप 15 हजार रुपये धनादेश स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. द्वितीय पुरस्कार मे. जनता इंडस्ट्रीज धर्माबाद यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये धनादेश, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ असे  आहे. 

कोरोना योद्धांचा सन्मान

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून औषध विभागाच्या डॉ. स्वरुपा अरगडे, ईएनटी विभागातील डॉ. प्रशांत झाडे, कोरोना आजारावर मात करुन प्लाझ्मा दान केल्याबद्दल सामान्य रुग्णालयातील रेडीओलॉजिस्ट डॉ. राम मुसांडे, भगवान तुकाराम खिल्लारे, कोरोना आजारावर मात केलेले रुग्ण उपचार श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक रुग्णालयातील अशोक बच्चेवार, श्रीमती भाग्यश्री भालेराव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

00000





    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...