Friday, September 16, 2022

 पशुधनातील लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी गोठ्याची स्वच्छता व

दक्षता घेणे आवश्यक
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
▪️जिल्ह्यातील पशुसंवर्धन व प्रशासकीय या यंत्रणांना दक्षतेचे आदेश

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- पशुधनामध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यामध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी उपाययोजना व दक्षता घेतली जात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे गोठयातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठयापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या लम्पी आजाराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखी, महा वितरण नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड आदीची उपस्थिती होती.

जनावरातील साथीच्या आजाराबाबत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विशेषत: नांदेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. मनपाने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असे निर्देश खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. याचबरोबर गावपातळीवर दंवडी व इतर संपर्काची माध्यमे प्रभावीपणे उपयोगात घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

साथरोगावर नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आहे. यासाठी औषधोपचाराची कुठलीही कमतरता नसून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले यांनी लम्पी आजाराबाबत जिल्ह्यातील आढावा सादर केला आहे.
0000


 वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 5.45 वा. नागपूर येथून विमानाने निघून 6.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वा. मोटारीने हिंगोलीहून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000

प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड शहरातील मात गुजरीजी विसावा उद्यान शिवाजीनगर नांदेड परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर 17 सप्टेंबर 2022 रोजी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत. 

शनिवार 17 सप्टेंबर रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हा आदेश निर्गमीत केला आहे. हा आदेश 17 सप्टेंबर रोजी (16 सप्टेंबर 2022 रोजीच्या मध्यरात्री) ते 17 सप्टेंबर 2022 रोजी 24 वाजेपर्यंत वरील नमूद परिसरात उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात प्रतिबंध करण्यात आले आहे.

000000


 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.10 नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.15 वा. मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 11.10 वा. मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.15 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

 19 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022  रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

***** 

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने

जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएल / बीआर-2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहे. 

जिल्ह्यात  मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 मतदानाच्या दिवशी सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.मतमोजणीचा दिवशी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियमावली, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

00000

 मतदान व मतमोजणी क्षेत्रातील

आठवडी बाजार 18 व 19 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदानाच्या दिवशी रविवार 18 सप्टेंबर  रोजी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.  अशा गाव / ठिकाणांचे आठवडी बंद ठेवण्यास आणि अन्य दिवशी भरविण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...