Tuesday, April 23, 2024
वृत्त क्र. 379
ज्येष्ठांनी केले नांदेडकरांना मतदानाचे आवाहन
नांदेड दि. २३ : आम्ही ज्येष्ठ झालो आहोत. अनेकांना मतदान केंद्रापर्यंत जाणेही शक्य नसते. मात्र अनुभवावरून सांगतो, लोकशाहीला मतदानाची संजीवनी हवी असते, त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाणार आहोत 26 एप्रिलला मतदान करणार आहोत, तरुणांनी मागे राहायला नको, असे आवाहन नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी तमाम जिल्हावाशियांना केले आहे.
आपले मतदान हे आपला पाठिंबा. आपला विरोध. आपली तटस्थता. व्यक्त करण्याची सनदशीर तरतूद लोकशाहीमध्ये आहे. जे मनात आहे ते ईव्हीएमचे बटन दाबून उमटू द्या. निर्भय होऊन मतदान करा. घरी बसून राहू नका, असे आवाहन ज्येष्ठांनी केले आहे.
स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेच्या आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
आज जिल्ह्यासह महानगरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत सीईओ मीनल करनवाल यांनी संवाद साधला. निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठांसाठी घरून मतदान करण्याची व्यवस्था केली होती. मात्र अनेक ज्येष्ठांनी मतदान केंद्रावरूनच मतदान करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचा उत्साह या संवादात दिसून आला. यावेळी अनेक ज्येष्ठांनी माध्यमांच्याद्वारे महानगरातील सर्व नागरिकांना विशेषता तरुणांना साद घातली. मतदानासाठी बुथवर पोहोचा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वृत्त क्र. 378
आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार
बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार
जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त
नांदेड दि. 23 :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून 26 एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून निर्भय वातावरणात मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांची व भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी यावेळी तयारी बाबतची चर्चा केली.
एकूण 18 लक्ष 51 हजार मतदार
नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२९४४०९), नांदेड उत्तर (३४६८८६), नांदेड दक्षिण (३०८७९०), नायगाव (३०१२९९), देगलूर (३०३९४३), मुखेड (२९६५१६) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617 महिला तर 142 तृतीय पंथीचा समावेश आहे. 2062 केंद्रावर हे मतदान होणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये 144 कलम लागू होईल. याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
बुथ व्यवस्थापन महत्वाचे
यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.
कडेकोट बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.
मोबाईल वापरावर बंदी
मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांना अधिकारी दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक सुटी ; बाजार बंद
26 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 26 एप्रिल शुक्रवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.
48 तास मद्य विक्री बंद
कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.
रेडिओ संदेश बल्क एसएमएस बंदी
48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे
0000
वृत्त क्र. 377
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद
नांदेड, दि. 23 एप्रिल :- लो
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक प्रक्रीया कार्यान्वित आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार हिंगोली लोकसभा -15 व नांदेड लोकसभा -16 साठी मतदान 26 एप्रिल 2024 रोजी तर मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इ. नियम 1969 च्या नियम 9 A (2) (C) (1) महाराष्ट्र देशी मद्य नियम 1973 च्या नियम 26 (1) (C) (1) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने अनुज्ञप्ती देणे आणि ताडी झाडे छेदने नियम 1968 च्या नियम 5 (A) (1) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2024 रोजी मतदान संपेपर्यत, मतदानाचा दिवशी 26 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी 4 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या तीनही बाजूला असलेल्या कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी लोहा विधानसभा मतदार संघ क्षेत्रामधून नांदेड जिल्ह्यातील इतर क्षेत्रात मद्य अवैधरित्या वाहतूक, विक्री होण्याची शक्यता आहे. तसेच लोहा व कंधार तालुक्यातील ठराविक कार्यक्षेत्रात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
00000
दि. 22.4.2024
वृत्त क्र. 376
24 एप्रिलला उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी
नांदेड दि. २२ : 16-लोकसभा नांदेड निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी 24 एप्रिलला होत आहे. या बैठकीला उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यापूर्वी १२ एप्रिल व १८ एप्रिलला दोन खर्च तपासण्या झाल्या आहेत. 24 एप्रिलला सकाळी 11 ते सायं 6 वाजेपर्यंत कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन कॅबिनेट बैठक कक्ष तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे ही अंतिम तपासणी आहे. या तपासणीसाठी दोन्ही खर्च निवडणूक निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड, मग्पेन भुतीया उपस्थित राहणार आहेत.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारे सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळावेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करणाऱ्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ( अपात्र ) ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
00000
दि. 22.4.2024
वृत्त क्र. 375
26 एप्रिलच्या मतदानाची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
नागरिकांनी यावेळी 'रेकॉर्ड ब्रेक ' मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शुक्रवारला सुटी, निवारा, प्रथमोपचार, प्राथमिक सुविधा पूर्ण
नांदेड दि.२२ : लोकशाहीच्या पर्वातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक 26 एप्रिल रोजी होत आहे.सकाळी सात वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 एप्रिल रोजी मतदान करता येणार आहे. शासनाने 26 एप्रिलला सुटी घोषित केली असून मतदानाची सर्व तांत्रिक प्रक्रिया तसेच सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला.
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपला मताधिकार बजावणे लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असून यावर्षी जिल्हावाशीयांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, मुख्य लेखा अधिकारी जनार्दन पक्वाने यांच्यासह अन्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने मतदान दिवसाच्या शेवटचे 72 तास, 48 तास व 24 तासापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान घडवून आणणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता व प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील पायाभूत सुविधा, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक काळातील पैशांचा गैरवापर, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मुबलक प्रमाणातील उपलब्धता, निवडणूक खर्चावरील सनियंत्रण, मतदारांची जनजागृती, पोलिंग एजंटच्या येणाऱ्या तक्रारी, माध्यमांसाठी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या प्राधिकार पत्रांचे वाटप, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाला नियमित द्यावयाची माहिती, मतदानाच्या वेळी नियमानुसार होणारे मतदान शंभर मीटरच्या आत मधील प्रचार बंदी, मोबाईल वापरावरील बंदी, याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
प्रामुख्याने पुढील काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातही आढावा यावेळी घेण्यात आला. रात्रीच्या तपासणी वाढवण्यात याव्यात, फिरत्या पथकांकडून तपासणी कसून करण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
00000
वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...