Monday, September 30, 2019


86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांसाठी
निवडणूक विषयक पहिल्या सामुहीक प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 30 :- निवडणूकीसाठी 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्‍त मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण 2 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत डॉ.शंकराराव चव्‍हाण प्रेक्षागृह, स्‍टेडीयम जवळ, नांदेड येथे आयोजीत केले आहे. तसेच या कालावधीत प्रत्‍यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देखील दुपारी 12 ते सायंकाळी 6 या कालावधीत स्‍पर्धा परीक्षा अभ्‍यासिका, शासकीय ग्रंथालय इमारत स्‍टेडीयम परिसर येथे आयोजीत करण्‍यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी निवडणूकीचा कार्यक्रम दिनांक 21 सप्‍टेंबर 2019 च्‍या प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये घोषित केला आहे. 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळित व कालमार्यादेत पार पाडण्‍यासाठी विविध पथके तयार करण्‍यात येवून या पथकात नमुद केल्‍याप्रमाणे पथकातील प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांच्‍या नेमणुका करण्‍यात आल्‍या आहेत.
या निवडणूकीसाठी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्‍त मतदान केंद्राध्‍यक्ष तसेच मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी  नमूद प्रशिक्षणाची नोंद घेऊन प्रशिक्षणास उपस्थित राहावे. तसेच या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या अधिकारी / कर्मचारी यांच्‍या भारतीय लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल. असे  86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री सदाशिव पडदुणे यांच्‍यावतीने कळविले आहे.
000000




दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30:- दिपावली उत्‍सव दिनांक 27 ऑक्टोंबर 2019 ते 29 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 7 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख 7 ऑक्‍टोंबर 2019 आहे. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.  नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्‍थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.
जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत/मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणा-या परवान्‍यातील नमूद ज्‍या अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र.दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील1.अग्निशमन दल 2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 12 ऑक्टोबर, 2019 व 14 ऑक्टोबर,2019 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.   
            दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.
0000




     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात 14 ऑक्टोंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 14 ऑक्टोंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


जागतिक हृदय दिन व पोषण आहार सप्ताह
नांदेड दि. 30 :-  जागतिक ह्रदयदिन व पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड येथील प्राचार्य एस. ए. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ह्रदयदिन व पोषण आहार सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला.
या अनुषंगाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी व डॉ. सबा खान यांनी उपस्थित रुग्न व नातेवाईक यांना ह्रदयरोगाबद्दल मार्गदर्शन केले. त्याचवेळी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी पोषण आहार प्रदर्शांनाच्या माध्यमातून ह्रदयरोग रुग्णांनी घ्यावयाच्या आहाराबद्दल प्रदर्शांनाच्या माध्यमातून माहिती दिली.
या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक, डॉ. पवार, डॉ. डॉ. लोमटे, पाठ्यनिर्देशक ये.बी. कुलकर्णी,व्ही.बेरळीकर अधिपरिसेविका चरडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व श्रीकांत बोटलावर यांनी परिश्रम घेतले.
00000


शौर्यदिनानिमित्त
माजी सैनिकांचा सत्कार संपन्न
नांदेड दि. 30 :-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे आयोजित शौर्यदिनाच्या कार्यक्रमात प्रशासनातर्फे जिल्हातील विरनारी, विरपिता, विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार रविवार 29 सप्टेंबर 2019 रोजी  संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ  हे होते.
 भारतीय सैन्यदलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही जम्मु कश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्याचा  बदला घेण्यासाठी करण्यात आली होती.  यानिमित्त 29 सप्टेंबर  हा दिवस शौर्यदिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
यावेळी मेजर बिक्रमसिंग थापा, शेटे के.अे, कल्याण संघटक, जेलअधिकारी बी. माळी,  माजी सैनिक संघटना अध्यक्ष व्यंकट देशमुख, पठाण हयुन, सार्जेन्ट संजय पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.    
            नांदेड येथील माजी सैनिक भोसले पुंजाराम, पॅरा कमांडो 9 पॅरा यांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जीकल स्ट्राईक या मोहिमेत भाग घेतला होता. त्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच प्रदिर्घ सैन्य सेवा केलेले ऑन कॅप्टन किशन कपाळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तुरे, सार्जेन्ट रामराव थडके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकात श्री शेटे यांनी शौर्यदिनाचे महत्व सांगून नांदेड येथील  सैनिकांचा सहभाग असल्याचे नमुद केले.  मेजर बिक्रमसिंग थापा यांनी  विविध भाग घेतलेलेल्या  ऑपरेशनची माहिती दिली.   या प्रसंगी  इयत्ता 8 वीत शिकत असलेली माजी सैनिकाची मुलगी कु. सायरा हयुन पठाण  हिने  आपल्या भाषणात सर्जीकल स्ट्राईक विषयी पुर्ण माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास जिल्हयातील जवळपास 90   माजी सैनिक/ विधवा व सैनिकी मुलांचे वसतिगृहातील मुलांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार तुकाराम मसीदवार, सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे, माधव  गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
0000


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
     प्रकाशक व मुद्रक यांच्या बैठकीचे आयोजन         
            नांदेड दि. 30 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 पूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व नोंदणीकृत वृत्तपत्राचे प्रकाशक व मुद्रक यांची मंगळवार 1 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या बैठक कक्षात आयोजित केली आहे.
            जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वृत्तपत्रांचे प्रकाशक व मुद्रक यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  अरुण डोंगरे यांच्यावतीने करण्यात आले आहे, असे  अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात
 मतदार जनजागृतीसाठी रथ मार्गस्थ
          

  नांदेड, दि. 30 :- उत्तर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने स्वीप कक्षाची स्थापना केली आहे. दिनांक 29 सप्टेंबर 2019 रोजी मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन व स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदूणे यांचे हस्ते करण्यात आले.
            मतदारसंघात रथफेरीद्वारा मतदार जनजागृती केली जाणार आहे. तसेच मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात, ग्रामीण भागात व मोक्याच्या ठिकाणी रथफेरीद्वारे मतदान करण्यासाठी संदेश प्रसारित करण्यात येत आहे, अशी माहिती नांदेड उत्तर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी दिली.
            या कार्यक्रमास स्वीप कक्ष प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी आर. एल. आडे, तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील, आर. डब्लू. मिटकरी, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड तसेच कर्मचारी गणेश नरहिरे, माधव पवार, गणेश रायेवार, श्रीमती कविता जोशी, संजय वाकोटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...