Tuesday, June 15, 2021

 

नोंदणीकृत न्यासांनी नामफलक दर्शनी भागावर मराठीत लावावी   

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत न्यासांनी (शैक्षणिक व सामाजिक संस्था, मंदिरे, वाचनालये, व्यायामशाळा किंवा इतर सर्व प्रकारचे न्यास) त्यांच्या नावाचे फलक मराठी भाषेत न्यासाच्या दर्शनी भागावर लावावेत, असे आवाहन नांदेड विभागाचे धर्मादाय उपआयुक्त  के. व्ही. मसने यांनी केले आहे. याबाबत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे परिपत्रक 6 जानेवारी 2020 आणि मुंबई धर्मादाय आयुक्त यांचे परिपत्रक 2 जून 2021 अन्वये न्यासानी त्यांच्या नावाचे फलक हे न्यासाच्या दर्शनी भागावर मराठी भाषेत लावावे, असे आदेशित केले आहे.

000000

 

 

 

मतदार यादीतील दुबार नावे, छायाचित्र नसलेली नावे वगळली जाणार

मतदारांनी आपल्या मतदार यादीतील छायाचित्राची खात्री करावी   

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 100 टक्‍के शुध्‍द मतदार यादी (चुका विरहीत) तयार करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादी शुद्ध करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्‍ती, दुबार नाव वगळणी करुन घेण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांनी केले आहे.

 

16 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या मतदार यादीतील दुबार असलेली नावे, ज्‍या मतदारांची नावे आहेत पण फोटो नाही अशा मतदारांची नावे वगळणी करण्‍यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्‍या विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदार यादीत आपल्या नावासमोर फोटो आहे किंवा नाही याची खात्री करून घ्‍यावी. मतदार यादीत फोटो नसल्‍यास तात्‍काळ आपला अद्यावत कलर (रंगीत) पासपोर्ट साईज फोटो संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करावेत. अन्‍यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळण्‍यात येणार आहेत.

 

मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळणी करण्‍यासाठी नागरीकांनी आपले कुटुंबातील  मयत झालेल्‍या व्‍यक्‍तींचे मृत्‍यु प्रमाणपत्रासह नमुना नं. 7 भरून आपल्‍या भागातील बीएलओ, तहसिल कार्यालय,  उपविभागीयअधिकारी कार्यालय यांचेकडे जमा करावेत. अथवा www.nvsp.in संकेतस्‍थळास भेट देऊनही नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणीबाबतचे अर्ज सादर करता येतील. तसेच ज्‍या मतदारांनी नव्‍याने मतदार यादीत नाव नोंदविलेले आहे अशा मतदारांनी त्‍यांचे निवडणूक मतदान ओळखपत्र घरबसल्‍या www.nvsp.in संकेतस्‍थळास भेट देऊन डाऊनलोड करून घ्‍यावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यातून सहभागी घरकूल लाभधारकांनी शासनाप्रती व्यक्त केली कृतज्ञता

·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नमूना 8 हस्तांतरण 

नांदेड (जिमाका), दि. 15 :- महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत नांदेड जिल्ह्याने घरकूल योजनेचे निर्धारित वेळेत उद्दीष्ट साध्य केले. आज राज्यातील एकत्रित ई-गृहप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकुल लाभधारकांना घरकुलाच्या चाव्या व नमुना 8 प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. देगलूर तालुक्यातील खानापूर येथे एका छोटेखानी समारंभात याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.   

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या या आव्हानाशी सामना करत विक्रमी काळात एकुण 5 हजार 126 घरकुले पूर्ण केली. यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण, रमाई आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजनेंतर्गत घरकुलांचा समावेश आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या अल्प कालावधीत ही घरकुले पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या ई-गृहप्रवेश या समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधीक 8 लाभार्थी उपस्थित होते. यात व्यंकटी गुडमवार, लक्ष्मण बोकारे, चंपती पोहरे, कल्पना पाटोळे, संभाजी देशमुख, शंकर इंगोले, चिमनाजी शेके, शंकर आत्राम या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी चाव्या हस्तांतरीत केल्या.  





00000

 राज्यात एकुण 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

ग्रामविकास विभागाची कौतुकास्पद कामगिरी

-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

·         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरकूल लाभार्थ्यांशी साधला संवाद

·         महाआवास अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात

·         कोरोनाचे आव्हान असतांनाही 5 हजार 126 घरकूल पूर्ण

·         आठ लाख कुटुंबांना विक्रमी वेळेत घरकुले

·         40 लाख लोकांना मिळाले हक्काचे छत 

नांदेड (जिमाका), दि. 15 :- ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी आज गृहप्रवेश केला. त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत सुमारे 4 लाख 68 हजार घरकुलांची बांधकामे पुर्णत्वाच्या मार्गावर असून ती महिन्याभरात पूर्ण होऊ शकतील. अशा पद्धतीने या अभियानातून कमी कालावधीत सुमारे आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले. 

दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या अल्प कालावधीत घरकूल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात ई-गृहप्रवेश निमित्ताने सह्याद्री अतिथृगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवडक घरकूल लाभार्थी या ई-गृहप्रवेश कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहूल शेवाळे, खासदार विनायक राऊत,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ. राजाराम दिघे हे उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्ह्यातील 8 घरकूल लाभधारक प्रातिनिधीक स्वरुपात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.   

आज हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण 3 लाख 22 हजार 929 लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात शासनाच्यावतीने प्रातिनिधीक चाव्या सुर्पूद करण्यात आल्या. 

मागील दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे, भुमीहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता, ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने  दिले असून अभियान कालावधीत 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले होते. त्यातील 3 लाख 22 हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत, तर  उर्वरित 4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासन अनेक योजना राबवते, त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरे बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. 3 लाख 22 हजार 929 घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज 15 लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे, त्यांना सुरक्षित केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विभागाचे कौतूक करून मुख्यमंत्री म्हणाले की, घरांच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य महिला बचतगटांच्या घरकुल मार्टमधून उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही विभागाने केले आहे. हे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करणारे शासन आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज महाआवास अभियानातून हक्काचे घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराला, स्वत:च्या कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचे वचन मला द्यावे, कारण यातूनच गाव आणि राज्याचा कोरानामुक्तीचा प्रवास यशस्वी होणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.   

40 लाख लोकांना मिळाले हक्काचे छत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, महाआवास अभियानामध्ये आज गृहप्रवेश केलेली 3 लाख 23 हजार कुटुंबे आणि बांधकाम पुर्णत्वाच्या मार्गावर असलेली 4 लाख 68 हजार कुटुंबे अशा एकुण 8 लाख कुटुंबांची सरासरी सदस्य संख्या लक्षात घेतली तर सुमारे 40 लाख लोकांना घरकुलाचे छत मिळाले आहे. कोरोनाचे संकट असतानाही सर्व यंत्रणेने एकजुटीने हे अभियान यशस्वी केले. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली. गवंडी प्रशिक्षण, घरकुल मार्ट, बहुमजली इमारती, गृहसंकुले यांसारखे वेगवेगळे प्रयोग करुन घरांचा दर्जा चांगला राहील यासाठी दक्षता घेण्यात आली. आता चालू वर्षात प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांनाही घरे देण्यात येतील. राज्यात ग्रामीण भागात स्वत:चे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, ग्रामविकास विभागाने विविध विभागांच्या सहयोगातून महाआवास अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. अनुसुचित जाती, जमाती यांनाही सामाजिक न्याय, आदिवासी विकास यांच्या योजनेतील घरकुलांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे वंचित घटकांचा सामाजिक स्तर उंचावण्यात या अभियानाचा मोठा फायदा झाला. यापुढील काळातही सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनांकरीता भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात ग्रामविकास यंत्रणेने महाआवास अभियानाद्वारे केलेली कामगिरी अभूतपुर्व अशी आहे. या योजनेद्वारे गोरगरीब, वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला. अभियान काळात उद्दीष्ट निश्चित केलेले सुमारे 8 लाख घरकुलांपैकी आज 3 लाख 23 हजार जणांचा गृहप्रवेश झाला आहे. उर्वरीत लाभार्थीही महिन्याभरात गृहप्रवेश करतील. सामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये या अभियानाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते महाआवास अभियान-यशोगाथाया पुस्तिकेचे आणि राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाची दिनदर्शिका (शैक्षणिक वर्ष) चे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर महा आवाससंकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. 

अभियान कालावधीतील इतर साध्य बाबी 

20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत 50 हजार 112 भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. 3 लाख 69 हजार 495 घरकुलांना मंजूरी देऊन नवीन लाभार्थ्यांना या योजनांमध्ये सामावून घेण्यात आले. 8 हजार 815 ग्रामीण गवंड्यांना प्रशिक्षण देण्यात आले तर 13 हजार 295 ग्रामीण गवंड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे. लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी 320 डेमो हाऊसेस उभारण्यात आली असून बांधकामाचे साहित्य वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यासाठी 612 घरकुल मार्ट सुरु करण्यात आली आहेत. याचबरोबर 42 हजार 180 लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरीक्त वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळवून देण्यात आले आहे. तसेच घरकुल बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यास 1 हजार 286 बहुमजली इमारती (जी+1 व जी+2) उभारुन तसेच पुरेशी जागा असल्यास 625 गृहसंकुले उभारुन उपक्रम यशस्वी करण्यात आले आहेत. अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या घरकुलांपैकी 1 लाख 22 हजार 104 घरकुले मुलभूत नागरी सुविधांनी युक्त आहेत. 

अभियान कालावधीत इतर शासकीय योजनांशी कृतीसंगम करण्यावर देखील भर देण्यात आला. या कृतीसंगमामधून ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6,10,06,280 मनुष्यबळ निर्मिती करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलजीवन मिशनमधून 8 लाख 06 हजार 895 घरकुलांना नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानमधून 9 लाख 32 हजार 102 घरकुलांना शौचालयाचा लाभ देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेमधून 7 लाख 27 हजार 031 गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून 7 लाख 51 हजार 150 विद्युत जोडणी व 7 लाख 51 हजार 140 लाभार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशन मधून 8,10,031 लाभार्थ्यांना उपजिविका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.






00000

 

नांदेड जिल्ह्यात 23 व्यक्ती कोरोना बाधित,

तर 84 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 901 अहवालापैकी  23 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 940 एवढी झाली असून यातील 88 हजार 81 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 408 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 899 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, गुजरात 1, अर्धापूर 2, वाशीम 1 लोहा 4, मुखेड 1, तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 2, कंधार 7, किनवट 1, यवतमाळ 1  असे एकूण 23 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 84 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 2,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, हिमायतनगर तालुक्यातर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 3, कंधार तालुक्यातर्गत 2,माहूर तालुक्यातर्गंत 5,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 59, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 9 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 408 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  24, हदगाव कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 3,   मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 275, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गह विलगीकरण 69, खाजगी रुग्णालय 16  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 130 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 80 हजार 194

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 77 हजार 770

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 940

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 81

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 899

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-172

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 408

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6

00000

 

 

बांबू लागवड व त्याच्या व्यावसायिक उत्पादनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी संधी - पालकमंत्री अशोक चव्हाण 

महसूल, वन, कृषि व रेशीम विभागाच्या संयुक्त विद्यमाने

बांबु व रेशीम लागवड मार्गदर्शन व कार्यशाळा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर या भागात असलेली वनसंपदा लक्षात घेऊन आपण भोकर येथे बांबू विकास प्रकल्प साकारुन यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहोत. आपल्या जिल्ह्यात आदिवासी समाजात कोलाम व बुरुड समाजाची संख्या ही लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन येत्या काही वर्षात बांबू लागवडीतून व त्याच्या विविध व्यावसायिक उत्पादनातून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी या उद्देशाने डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू व रेशीम लागवड कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक माजी आमदार पाशा पटेल, संजीव करपे, संदीप माळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे उपस्थित होते. 

या कार्यशाळेच्या माध्यमातून बांबू लागवडी संदर्भात होणारी चर्चा व मार्गदर्शन महत्वाचे आहे. येथे उपस्थित असलेले कृषि, वन व महसूल मनरेगा विभागातील अधिकारी-कर्मचारी हे मार्गदर्शन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकुण नद्यांची संख्या त्यांचे खोरे-काठ विचारात घेतले तर नदी-नाल्याच्या काठावर बांबू लागवडीला शेती व्यतिरिक्त मोठी संधी आहे. विशेषत: सामाजिक वनीकरणांतर्गत उपलब्ध असलेल्या जमिनीवर बांबुची लागवड करता करता येईल यादृष्टिने संबंधित विभागाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

काळाची गजर लक्षात घेवून बांबू लागवडीचे महत्व सविस्तरपणे माजी आमदार पाशा पटेल यांनी विषद केले. मनुष्याला भविष्यात जगायचे असेल तर बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यापासून ऑक्सीजन मोठया प्रमाणावर मिळते आणि आज जी ऑक्सीजनची परिस्थिती निर्माण झाली आहे ती भविष्यात होणार नाही. यासाठी त्यांनी गोमाखोरे चळवळ सुरु केली आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे अर्थ चक्र बदलू शकते ऊसाची लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षच उत्पन्न घेता येते. याला भरपूर खर्च येतो, परंतु बांबु लागवड एकवेळेस केली तर ते 50 ते 60 वर्ष चालते त्यामुळे खर्च कमी, पाण्याची बचत आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होवू शकतो, असे पाशा पटेल यांनी स्पष्ट करुन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रवृत्त केले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाईल, असे सांगितले. सन 2021-22 मध्ये अंदाजे जवळपास 1 हजार एकरवर बांबूची लागवड केली जाईल याबाबतचे लक्षांक सर्व तालुक्यांना देण्यात येईल. तसेच भविष्यात शेतकऱ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येईल असेही कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी सद्या जिल्ह्यात पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे. त्यामुळे जिल्हयातील ही कार्यशाळा अतिशय योग्यवेळी घडवून आणलेली आहे. जिल्हयामध्ये डोंगराळ परिसर मोठया प्रमाणात असून त्याठिकाणी व ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवडीचा कार्यक्रम मोठया प्रमाणावर हाती घेण्यात येईल, असे सांगितले. 

बांबू लागवडी पासून फर्निचर, रिसोर्ट, खाद्य पदार्थ आदी विविध प्रकारचे साहित्य बनविता येते. त्यांचा शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ होवू शकतो. सद्याच्या काळात ऑक्सीजनची  जी कमतरता भासत आहे ते सुध्दा बांबू लागवडीपासून दुर होऊ शकते. वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणावर आर्थिक लाभ देखील होऊ शकतो या सर्व बाबीचे महत्व प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे संजीव करपे यांनी विषद केले. 

प्रास्ताविकात शेतकऱ्यांनी बांबूची लागवड का करावी याबाबतचे महत्व विषद करुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. प्रभारी रेशीम विकास अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी रेशीम लागवड (तूती) लागवडीचे महत्व, लागवड संगोपन, उत्पादन, सेंद्रीय खताची मात्रा तसेच आर्थिक लाभ याबाबतचे महत्व सादरीकरणाद्वारे सांगितले. 

सुरवातीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, माजी आमदार पाशा पटेल, संजीव करपे, संदीप माळी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले. रेशीम लागवड शेती हे पुस्तक भेट देवून रेशीम विकास अधिकारी श्रीमती आरती वाकुरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 

प्रभारी रेशीम विकास अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, प्र. उपवनसंरक्षक एम. आर.शेख नांदेड, रेशीम विकास अधिकारी श्रीमती आरती वाकुरे तसेच जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, वन विभागाचे व रेशीम विभागाचे सर्व अधिकारी तसेच जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.




                                                                      0000000

 

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...