Monday, November 4, 2019


अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या
शेती पिकांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा
-         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेले पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिले.
कृषि राज्यमंत्री खोत यांनी आज नायगाव तालुक्यातील कहाळा (बु) , सोमठाणा, मांजरम, गडगा, बिलोली तालुक्यातील लोहगाव, पांचपिंपळी फाटा, धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा येथील अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश पवार, जिल्हा परिषद सदस्या सुमनताई पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी.चलवदे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, विक्रम राजपूत  यासह संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री खोत शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे असलेला पैशाची गुंतवणूक झाली आहे. यातच अवकाळी पावसामुळे शेतातले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी सर्वांनीच शेतकऱ्यांना धीर देवून तात्काळ पंचनामे पूर्ण करण्यासाठी मदत करावी. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने दहा हजार कोटीची तरतूद करुन ठेवली आहे. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यामध्ये मी नांदेड जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करणार आहे. त्याचबरोबर रबीच्या पेरणीसाठी मदत करण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे पुरावा म्हणून फोटो ग्राह्य धरला जाणार आहे.
कृषि राज्यमंत्री खोत यांनी कहाळा बु. येथील शेतकरी अंबादास देशमुख, सोमठाणा येथे व्यंकटराव कदम, मांजरम येथे अशोक गंदेवार, गडगा येथे आनंदराव अमलापूरे आणि पार्वतीबाई विभूते यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन व ज्वारी यासह विविध पिकाची पाहणी केली. लोहगाव येथे प्रकाश वसमते यांच्या शेतात जाऊन दुबार पेरणी करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतमजूर भागाबाई कांबळे यांच्याशीही संवाद साधला. तसेच बाभळी बंधारा परिसरातील बॅकवाटरने तेथील शेती पाण्याखाली गेली असल्याने तेथील पिकांचे नुकसान झाल्याने तेथील नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना राज्यमंत्री खोत यांनी धीर दिला.
या दौऱ्याप्रसंगी गडगा येथे अर्जून हणमंतराव कोनेले यांच्या विकास नर्सरीमध्ये सर्वांसोबत पंगतीत बसून वनभोजन केले. आज दिवसभरात झालेल्या दौऱ्यात सोमठाणा व कुंडलवाडी येथील उपस्थित ग्रामस्थाशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.
***





















निवृत्ती वेधनधारकांनी
हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन   
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन चालू ठेवण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी निवृत्तीवेतनधारक हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र कोषागारात सादर करणे आवश्यक आहे. हयात प्रमाणपत्राच्या आद्याक्षर निहाय याद्या निवृत्तीवेतनधारकांच्या बँक शाखांना पाठविण्यात आल्या आहेत.
सर्व निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी बँकेच्या शाखेत उपस्थित राहून बँक मॅनेजरसमोर हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी. हयात प्रमाणपत्र ऑनलाईन http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर देखील सादर करता येईल.
हयात प्रमाणपत्र सादर न केलेल्या, निवृत्तीवेतन, कुंटूब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्तीवेतन / कुंटूब निवृत्ती वेतन माहे डिसेंबर 2019 पासून बंद करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


 मूग, उडीद, सोयाबीन खरेदी

   नोंदणीस 15 नोव्हेंबर मुदतवाढ
नांदेड दि. 4 :- केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री
जयदत्त क्षीरसागर यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 4 :- राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 5 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.30 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने सर्कीट हाऊसकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 10 वा. सर्कीट हाऊस येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण व उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख यांच्या समवेत अवेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बाधीत क्षेत्राची पाहणी. सकाळी 11 वा. नांदेड विमानतळावरुन लोहाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. लोहा येथे आगमन. सकाळी 12.15 वा. लोहा ते कंधारकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. कंधार येथे आगमन. दुपारी 12.45 वा. कंधार ते अहमदपूरकडे प्रयाण करतील.
0000


सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) मंत्री
एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 4 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथजी शिंदे यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 5 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. नांदेड येथून मोटारीने लोहाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. लोहा येथे आगमन. दुपारी 12.15 वा. लोहा येथून मोटारीने कंधारकडे प्रयाण. दुपारी 12.30 कंधार येथे आगमन. दुपारी 12.45 वा. कंधार येथून मोटारीने अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...