Saturday, May 28, 2022

 जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री

ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचा दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि28 :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

रविवार 29 मे 2022 रोजी वाशिम येथून शासकीय वाहनाने सायं 5.15 वा. हदगाव येथे आगमन. सायं 5.30 वा. हदगाव ते तामसा मोटार सायकल रॅली कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. तामसा येथे बेघर बेरोजगार मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9 वा. तामसा येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

 नांदेडचा कायापालट करणाऱ्या विकास कामांचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भू‍मिपूजन 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- नांदेड महानगरातील वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते व इतर आवश्यक सोई-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे विविध विकास कामांचे आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन समारंभास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, संतबाबा बलविंदरसिंघजी, डॉ. मिनलताई खतगावकर, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, बर्की चौक, महाराणा प्रताप चौक सिडको, छावा चौक कौठा येथे भूमिपूजन करण्यात आले. लातूर फाटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते ढवळे कॉर्नर व महाराणा प्रताप चौक सिडको ते हडको पाण्याची टाकी, उस्माननगररोड लिंक रस्त्याचे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा केली जाणार आहे. रवीनगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी ते साई कमान ते वसरणी येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मुथा चौक-महावीर चौक-गुरुद्वारा चौक (देनाबॅक चौक)-जुना मोंढा-बर्की चौक-पहेलवान टी हाऊस-देगलूरनाका येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ-महात्मा गांधी पुतळा-फॉरेस्ट ऑफीस चौक-गुरुद्वारा गेट नंबर 1 ते रणजीतसिंह मार्के (स.भगतसिंग चौक)-केळी मार्केट चौक-कब्रस्तानच्या घर बाजूने उर्दू घरापर्यंत सी.सी. रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली गेट आरोबी-यात्री निवास पोलीस चौकी-फॉरेस्ट ऑफीस ते महावीर चौक-मल्टीपर्पज हायस्कूल ते बंदाघाट लिंक सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे या कामांचा विकास कामात समावेश करण्यात आलेला आहे. या कामांमुळे नांदेडकरांच्या जनजीवनास व वाहतुकीस मोठा लाभ होईल.

000000




 कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद

 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अशा अनाथ मुलांच्या कल्याणासाठी व सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वर्षे पूर्ण होई पर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. अशा बालकांना येत्या 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील इतर लाभधारकांसह ही 9 बालके कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना ऑनलाईन संवाद साधणे सोईचे व्हावे यादृष्टिने डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात विशेष तयारी करण्यात आली आहे.  

000000

 सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून

श्रीक्षेत्र माहूरगड विकासाला चालना देऊ

-        पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·        माहूरबाबत लवकरच मुंबई येथे बैठक

·        जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठकीत निर्णय  

 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010 मध्ये 79 कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंर्तभाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्यादृष्टिने लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक सर्व संबंधित विभाग प्रमुख व सन्माननीय मंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन याला चालना देऊ, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

श्रीक्षेत्र माहूरगड विकासाच्या 79 कोटीच्या मूळ आराखड्यास सन 2010 मध्ये मंजूरी देण्यात आली. यात रेणुका माता मंदिर परिसर विकास, दत्त शिखीर परिसर विकास, अनुसया माता मंदिर परिसर विकास, सोना पीरबाबा दर्गा परिसर विकास, शेख फरिद दर्गा यासाठी 13 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले. सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने पांडवलेणी विकास, माहूर किल्ला विकास, जलसंवर्धन प्रकल्प, नैसर्गिक पर्यटन घटक विकास, संग्रहालय विकास, मातृतिर्थ तलाव व परिसर विकास, भानूतीर्थ तलाव व परिसर विकास, भोजंती तलाव, जनदग्नी ऋषीमंदिर आदी बाबींचा समावेश आहे. पायाभूत सुविधांमध्ये बसस्थानक, हेलिपॅड, केबलकार, रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण, पथदिवे-सौरदिवे, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन बाबतचीही कामे होणार आहेत. ही कामे निधीच्या उपलब्धतेप्रमाणे केली जात आहेत.


यातील माहूर टी पॉईट ते रेणुकामाता मंदिर, दत्तशिखर पायथा पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सौरपथदिवे, रेणुकामाता मंदिर करीता एक्सप्रेस फिडर, दत्त शिखर मंदीर करीता एक्सप्रेस फिडर, देवस्थान करीता पाणीपुरवठा योजना अशी कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बाकी इतर विभागाची कामे प्रलंबित आहेत. ही कामे युद्धपातळीवर हाती घेण्यासाठी संबंधित विभागाचा निधी उपलब्ध करून घेण्यावर भर देऊ असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

सन 2010 चा मंजूर आराखडा व त्याची किंमत लक्षात घेता सन 2017 मध्ये या आराखड्याबाबत पूर्नपडताळणी करून इतर कामांसह 216 कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला. याचे नियोजन लवकरच केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

पुलाची कामे तात्काळ पूर्ण करा

ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे वेगात सुरू आहेत. याचबरोबर ज्या तालुक्यांमधून रेल्वे जाते त्या-त्या ठिकाणी ग्रामीण भागाच्या वाहतूकीसाठी हे मार्ग तात्काळ मान्सूमच्या अगोदर सुरू झाले पाहिजे. यासाठी संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी दक्षता घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. यावेळी भोकर, अर्धापूर, मुगट व इतर तालुक्यातील विकास कामाबाबत आढावा घेण्यात आला.

000000   




महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...