Thursday, February 16, 2017

जि.प., पं.स. निवडणुकीसाठी
जिल्ह्यात 69.61 टक्के मतदान
मतमोजणी गुरुवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार  
नांदेड दि. 17 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 69.61 टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी बुधवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्ह्यात पुरुष मतदारांचे 70.10 टक्के मतदान झाले तर महिलांचे 69.08 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी माहूर तालुक्याची 77.10 टक्के इतकी आहे. तर सर्वात कमी मुखेड तालुक्यात 62.88 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 323 पुरूष मतदार आणि 8 लाख 4 हजार 372 महिला मतदार आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे. (कंसात एकूण मतदार) कंसाबाहेर झालेल्या मतदानाची टक्केवारी (दुसऱ्या कंसात पुरुष व महिला मतदानाची टक्केवारी ) : माहूर- ( एकूण मतदार 62 हजार 206 )- 77.10 टक्के (पुरुष 77.62 टक्के, महिला- 76.51 टक्के ), किनवट- (एकूण मतदार 1 लाख 48 हजार 927 )- 73.52 टक्के (पुरुष 74.17 टक्के, महिला- 72.82 टक्के), हिमायतनगर- (एकूण मतदार 60 हजार 24)- 70.40 टक्के ( पुरुष- 70.61 टक्के, महिला- 70.16 टक्के), हदगाव- (एकूण मतदार 1 लाख 67 हजार 205)- 66.33 टक्के ( पुरुष- 67.09 टक्के, महिला- 65.74 टक्के), अर्धापूर- (एकूण मतदार 59 हजार 533 )- 72.10 टक्के ( पुरुष- 74.05 टक्के, महिला- 69.91 टक्के), नांदेड- (एकूण मतदार 1 लाख 17 हजार 763)-70.11 टक्के ( पुरुष- 71.46 टक्के, महिला-68.60 टक्के ), मुदखेड- (एकूण मतदार 65 हजार 525)- 68.87 टक्के ( पुरुष- 71.39 टक्के, महिला- 66.05 टक्के ), भोकर- (एकूण मतदार 76 हजार 226 )- 70.15 टक्के ( पुरुष- 70.71 टक्के, महिला-69.56 टक्के), उमरी- (एकूण मतदार 60 हजार 07 )- 65.58 टक्के ( पुरुष- 66.82 टक्के, महिला- 64.24 टक्के ), धर्माबाद- (एकूण मतदार 45 हजार 252)- 72.85 टक्के ( पुरुष- 74.54 टक्के, महिला- 71.07 टक्के), बिलोली- (एकूण मतदार 95 हजार 372)- 71.38 टक्के ( पुरुष- 71.78 टक्के, महिला-70.95 टक्के), नायगाव खै.- (एकूण मतदार 1 लाख 16 हजार 487)- 74.25 टक्के ( पुरुष- 74.57 टक्के, महिला 73.91 टक्के ), लोहा- (एकूण मतदार 1 लाख 58 हजार 177)- 71.23 टक्के ( पुरुष- 71.13 टक्के, महिला 71.35 टक्के ), कंधार- (एकूण मतदार 1 लाख 60 हजार 274)- 69.92 टक्के ( पुरुष- 69.29 टक्के, महिला- 70.63 टक्के ), मुखेड- (एकूण मतदार 1 लाख 84 हजार 792)- 62.88 टक्के ( पुरुष- 62.69 टक्के, महिला- 63.09 टक्के), देगलूर- (एकूण मतदार 1 लाख 16 हजार 935)- 66.02 टक्के ( पुरुष- 65.99 टक्के, महिला- 66.05 टक्के ).
नांदेड जिल्ह्यात एकूण 16 लाख 94 हजार 705 मतदारांपैकी 11 लाख 79 हजार 733 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्याची टक्केवारी 69.61 इतकी आहे. यातील 8 लाख 90 हजार 323 पुरुष मतदारांपैकी 6 लाख 24 हजार 96 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदानांची टक्केवारी 70.10 टक्के इतकी आहे. तर 8 लाख 4 हजार 372 महिला मतदारांपैकी 5 लाख 55 हजार 667 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदानाची टक्केवारी 69.08 इतकी आहे. अन्य म्हणून नोंदणी केलेल्या 10 मतदारांपैकी एकाचेही मतदान झाले नाही.
मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

000000
जि.प., पं.स. निवडणुकीसाठी जिल्ह्यात
उत्साहात मतदान, महिलांचा उत्स्फुर्त सहभाग
मतदान शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न  
नांदेड दि. 16 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान झाले. यात महिला मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली. यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
 मतदानाला आज सकाळी जिल्ह्यात सुनियोजिरित्या प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह राहीला. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वाडी बु., नवीवाडी, विष्णुपूरी येथील मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
सायंकाळी उशीरा पर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या. यामुळे मतदान संपताना हाती आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक यंत्रणेने वर्तविला. जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत.  
मतदानासाठी सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसून आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार तसेच ज्येष्ठ मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती. महिला मतदारांनी मतदानाचा हक्क उत्स्फुर्तपणे बजाविला.
मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
जिल्ह्यात शांततेत व सुव्यवस्थेत मतदान पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्ह्यातील मतदारांसह निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसार माध्यमांचे, आणि मतदार जागृतीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे आभार मानले आहेत.
000000



जि.प., पं.स. निवडणुकीसाठी
मतदानास उत्साहात प्रांरभ
जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
नांदेड दि. 16 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी जिल्ह्यात सुनियोजिरित्या प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह राहीला. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी सुमारे 37.66 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाने दिली.  
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी केलेले आहेत. जिल्ह्यात 57 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांसह जिल्ह्यात सर्वत्र पोलिस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक तसेच गृहरक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसून आला. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार तसेच ज्येष्ठ मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी नांदेड तालुक्यातील वाडी बु. आणि विष्णुपूरी अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मतदारांसाठीच्या आवश्यक सुविधा, तसेच अनुषंगीक बाबींबाबत त्यांनी मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. वाडी बु.मधील टायनी एंजेल्स हायस्कुलमधील मतदान केंद्र, तसेच नांदेड-पुर्णा मार्गावरील नवीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र, विष्णपुरीतील जिल्हा परीषद प्रशालेतील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी काकाणी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांशीही संवाद साधला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी हेही उपस्थित होते.
सकाळच्या प्रहरानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याने, मतदान केंद्रावर उत्साहाचे चित्र होते.

000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...