Friday, August 12, 2022

 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी अस्थापना / सहकारी संस्था / शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.

00000

 जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित" फ्रीडम जाॅईन रॅली" लक्षवेधी


नांदेड (जिमाका) दि. १२ जिल्हाधिकारी नांदेड च्या वतीने स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात "फ्रीडम जाॅईन" रॅली चे  यशस्वी आयोजन लक्षवेधी ठरले.
सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर,शिवाजीनगर, आयटीआय , व्हीआयपी रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली.

सदर रॅलीच्या सुरूवातीस वंदेमातरम गीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने सादर करुन हर घर तिरंगा बाबत जनजागृती साठी चे  पथनाट्य सादर करण्यात आले. पोलीसांच्या बॅंड पथकाच्या देशभक्ती पर धून ने परिसरातील सर्वांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले‌. डाॅ.उद्धव भोसले कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.स्काऊट गाईड मुलींनी हर घर तिरंगा राखी मान्यवरांच्या हातावर बांधल्यानंतर  कुलगुरूसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी तिरंगा ध्वज ओवाळणी म्हणून विद्यार्थीनींच्या हाती दिला.

ध्वनिक्षेपक लावलेले फिरत्या वाहनांसह नॅशनल कॅडेट कोर,स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवायोजना विद्यार्थी ,नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी ,रोलर स्केटिंग खेळाडू , माध्यमिक प्राथमिक शाळांचे बारा हजार  पेक्षा अधिक विद्यार्थी तिरंगी ध्वजासह सदर रॅलीत सहभागी झाले.विद्यार्थ्यांच्या घोषणांसह  NCC विद्यार्थी यांनी क्रीडा संकुल पर्यंत  फडकवत नेलेला १०० फूट लांबीचा तिरंगा" हर घर तिरंगा"चा संदेश देत होता. रॅलीत ठिकाणी झालेली ललीत व प्रयोगजीवी कला संकूल विद्यापीठ मार्फत सादर पथनाट्य ,गीते व ललीत कला अकादमी नांदेड च्या वतीने सादर केलेला भारत मातेचा देखावा, व देशभक्ती पर नृत्यांनी लक्ष वेधून घेतले.

सदर रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थीनी  "हर घर तिरंगा व ७५" आकारात रचना करून  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व हर घर तिरंगा अभियानाचा संदेश दिला. सदर रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी देवकुळे, तहसीलदार ज्योती चव्हाणसह इतर अधिकारी कर्मचारी व  तहसील नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यापीठासह अनेक महाविद्यालयीन प्राध्यापक, ललीत कला संकूल संचालक डॉ पृथ्वीराज तौर, राष्ट्रीय सेवायोजना संचालक डॉ.मल्लीकार्जून करजगी व त्यांचे सहकारी यांचे सह ५० पेक्षा अधिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.  
सात हजार पाचशे विद्यार्थी यांच्या सहभागाचे नियोजन केले असता बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यांच्या उत्फुर्त  सहभागाने सदर रॅली लक्षवेधी, व अधिक यशस्वी झाली व तेवढीच शिस्तबद्ध होती हे विशेष.

   सदर रॅली च्या यशस्वी आयोजनासाठी  जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली , उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय  अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी ,शिक्षणाधिकारी दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी आडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार, मनपा क्षेत्रिय अधिकारी चौरे, सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक,व  शालेय विभागाचे माणिक भोसले,संजय भालके,प्रलोभ कुलकर्णी  व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

 

15 ते 31 ऑगस्ट या कालावधीत

कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडा साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमइ) ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन)या आधारावर असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. योजनेतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण 60 : 40 असे आहे. या योजनेत नांदेड जिल्हयाचा समावेश असुन या योजनेला व्यापक स्वरुप देण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडा साजरा केला जात आहे.

 

या पंधरवाडयात पुढील प्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनी प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी / कर्मचारी / जिल्हा संसाधन व्यक्ती यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. सर्व ग्राम सभांमध्ये कृषि सहाय्यक योजनेची प्रचार-प्रसिध्दी करतील. तसेच इच्छुक, पात्र व सक्षम लाभार्थींची आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे सुपूर्द करतील.

 

16 ते 31 ऑगस्ट 2022 बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीस्तव सादर केले आहेत. त्या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात येऊन लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यासमक्ष पडताळणी करुन त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात येईल. जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थ्यांच्या सविस्तर प्रकल्प आराखडे (डीपीआर) तयार करुन जिल्हा नोडल अधिकाऱ्यामार्फत विहीत कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी सादर करतील. याबाबत संबंधीत तालुका कृषि अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी संनियंत्रण करतील. जिल्हास्तरावर प्रस्ताव प्रलंबीत असणाऱ्या बँक संबंधीत कृषि अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात येईल व त्याचे संनियंत्रण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने करतील असे कृषि अधिक्षक कार्यालयाच्यावतीने कळविले आहे.  

0000

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते

महात्मा गांधी पुतळा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर 12 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री पासून ते 15 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर 12 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली, रस्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत.

000000

 भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) 12 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सन 2019 प्रमाणे यावर्षी राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

 

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

 

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा.

 

राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा.

 

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुद्धा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक 20 मार्च 1991, 5 डिसेंबर 1991 आणि 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

खासदार, आमदार, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

 

संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकार क्षेत्रात स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करावी. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निर्देश योग्य प्रकारे पाळण्यात येतील याची व्यक्तीश: दक्षता घ्यावी.

 

आचारसंहिता अंमलात असल्यास पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठावर वापर करू नये.

 

विभागीय मुख्यालयी / जिल्हा मुख्यालयी ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांबाबत सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत. हा कार्यक्रम साजरा करतांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आले असून ते राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळावा 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांवर अत्याचार झाले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार,  दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळण्यात येत आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त प्रत्येक कार्यालयात यादृष्टीने योग्य ते उपक्रम करण्याबाबत कार्यालय प्रमुखांना सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

फाळणी अत्याचार स्मृती दिवस या दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे. हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरूपात https://amritmahotsav.nicin/partition-horror-remembrance-day.htm संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व कार्यालय, शाळा यांनी समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेवून याविषयीचे प्रदर्शन आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

00000





समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...