Monday, August 2, 2021

 

विषबाधेच्या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी 

शास्त्रोक्त पद्धतीने किटक नाशकाची फवारणी करावी

- जिल्हा परिषद अध्यक्षा मंगारणी अंबुलगेकर 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- शेतकऱ्यांना विवध नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानात किटक नाशकाची फवारणी करताना होणारी विषबाधा व अपाय दुर्लक्षून चालणार नाहीत. हे संकट शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर पूर्णतः टळण्यासारखे आहे. आरोग्याचा विचार करून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक कीटक नाशकांची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगारानी अंबुलगेकर यांनी केले. राज्य शासनाचा कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने हाती घेतलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड तालुक्यातील सायाळ गावातील मुंजाजी धुमाळ यांच्या शेतात कापसाच्या पिकावरील फवारणीचे प्रात्यक्षिक आज शास्त्रज्ञानी शेतकऱ्यांना करुन दाखविले. यावेळी त्या बोलत होत्या.   

या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संतोष नादरे हे उपस्थित होते. 

कृषि विभागाचा हा अभिनव उपक्रम असून शेतकऱ्यांनी कृषि तज्ज्ञाच्या सल्याला प्राधान्य देऊन अधिकाधिक सुरक्षित शेती करण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट करुन आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या पिक व्यवस्थापनाला सदिच्छा दिल्या. 

शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करतांना कराव्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनातर्फे शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केले जाते. यासाठी कार्यशाळाही घेतल्या जातात. शेताच्या बांधावरुन थेट प्रात्यक्षिक विविध शेतकऱ्यांपर्यंत पोहाचावे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनही त्यांना सहज उपलब्ध व्हावे, यादृष्टिने हे प्रात्यक्षिक फेसबुक लाईव्हद्वारे आम्ही करीत आहोत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो अन्नदाता आहे. हा अन्नदात आरोग्याच्यादृष्टिनेही अधिक सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहिल. शेतातल्या विविध प्रयोगासह शेतकऱ्यांना किटनाशकांची फवारणी करतांना अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. त्यांनी यावेळी पिकाला पोषक असणारी मित्रकिटकही असतात असे सांगून शेतकऱ्यांना अधिक सावध होऊन फवारणी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गटातील जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकरी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

000000


नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

विविध प्रकरणात 26 कोटी 39 लाख 35 हजार रक्कमेची तडजोड

4 हजार 190 प्रकरणे सामोपचाराने निकाली 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम यांच्या उपस्थित जिल्ह्यातील सर्व न्यायालयात रविवार 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 4 हजार 190 प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात 26 कोटी 39 लाख 35 हजार 147 रक्कमेबाबत तडजोड करण्यात आली. हे लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकिल सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. 

प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालयात सुद्धा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालयातील प्रकरणांचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणाचा समावेश होता. तसेच तीन दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 1 हजार 242 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. ही लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश एस. एस. खरात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम यांनी लोकअदालत यशस्वी  झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 

सर्व पक्षकार, न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून यापुढेही अशीच सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 966 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 186 एवढी झाली असून यातील 87 हजार 487 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, हदगाव तालुक्यांतर्गत 1, मुखेड 2, किनवट 1 असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 44 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 35 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 63 हजार 635

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 61 हजार 470

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 186

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 487

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-32

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

 

जिल्ह्यातील 82 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 82 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 3 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाण हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या एकूण 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंद सिंघजी रुग्णालय येथे कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचेही प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर स्त्री रुग्णालयात कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध केले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामीण भागात 39 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्डचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 26 हजार 690 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 2 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...