Thursday, December 12, 2019


 दिव्यांगांना मुक्त संचारासाठी कार्यालयात  
  रॅम्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना
नांदेड, दि. 12 :-  महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी, अधिकारी संघटनांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांचा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.
या निर्णयानुसार दिव्यागांना मुक्त संचार करण्यासाठी रॅम्स उपलब्ध करुन देणे ही सर्व शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालय, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व इतर संबंधीत सर्व कार्यालय प्रमुखांची जबादारी आहे. याविषयी सक्षमरित्या कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत. 
00000


राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबरला
नांदेड, दि. 12 :- ऊर्जा संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 ते 20 डिसेंबर 2019 दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करावा. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाची शपथ घ्यावी. तसेच शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांना दिले आहेत.
00000



देगलूर, नायगाव येथील कृत्रिम अवयव
मोजमाप शिबिरातील तारखेत बदल
            नांदेड दि. 12 :- जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना  सहाय्यभूत साधने व कृत्रिम अवयव वितरणासाठी आयोजित देगलूर व नायगाव येथील मोजमाप शिबिरातील तारखेत बदल करण्यात आला असून देगलूर 21 डिसेंबर तर नायगावला 23 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार देगलूर व नायगाव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील 10 ते 26 डिसेंबर कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देगलूर येथे 23 ऐवजी 21 डिसेंबर व नायगाव 21 ऐवजी 23 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इतर तालुक्यातील शिबिर ठरलेल्या दिनांकाला होणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा बिपीएल कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरावर, नांदेड येथे 10 डिसेंबर, अर्धापूर- 11, मुदखेड- 12 रोजी संपन्न झाले तर भोकर- 13, हदगाव- 14, किनवट- 15 व 16, माहूर- 17, हिमायतनगर- 18, लोहा- 19, कंधार- 20, देगलूर- 21, मुखेड- 22, नायगाव- 23, बिलोली- 24 धर्माबाद- 25 तर उमरी येथे 26 डिसेंबर रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेडच्यावतीने आयोजित शिबिरात अस्थिव्यंगांसाठी 3 चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठ्या, सीपीचेअर देण्यात येणार आहे तर मोटराइज ट्रायसायकलसाठी 80  टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र व 12  हजार रुपये स्थानिक सहभाग गरजेचा आहे. अंधप्रवर्गासाठी 75 टक्क्यावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्याना स्मार्ट केन, ब्रेल कीट, डेसी प्लेअर, स्मार्ट फोन. मतिमंद प्रवर्गासाठी व्हीलचेअर, एम आर कीट, सी. पी. चेअर तर कर्णबधीर प्रवर्गासाठी श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
पूर्व नोंदणीसाठी त्या-त्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जेष्ठ नागरिकांनी व  दिव्यांगांनी दिव्यंगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्डच्या झेरॉक्स व दोन फोटोसह संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.  
000000


जिल्हा नियोजन कार्यालयाचे कामकाज
आयपास संगणकीय प्रणालीद्वारे होणार
13 व 16 डिसेंबरला दुसरी कार्यशाळा  
नांदेड, दि. 12 :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विकास कार्यक्रम योजनांचे प्रभावी संनियंत्रण करण्यासाठी आयपास संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे 1 एप्रिलपासून कामकाज होणार असून याचे पहिली कार्यशाळा जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आज संपन्न झाले. या प्रणालीबाबत दुसरी कार्यशाळा शुक्रवार 13 डिसेंबर व सोमवार 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.   
यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपआयुक्त (नियोजन) रविंद्र जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  
उपआयुक्त (नियोजन) श्री. जगताप म्हणाले, आयपास प्रणालीचा परिपूर्ण माहिती घेऊन प्रत्येक स्टेपचा स्वत: वापर केल्यास प्रणालीद्वारे काम करणे सुलभ होईल. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. कोलगणे यांनी येत्या 1 एप्रिलपासून राज्यात ही प्रणाली लागू होणार आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस व गतीमान होणार असून प्रशिक्षणात दिलेल्या माहितीच्या आधारे प्रणालीचा वापर करावा, असे सांगितले.  
ईएसडीएस सॉफ्टवेअरचे संदेश उगाळे यांनी प्रणालीतील विविध विषयासह मोबाईलद्वारे भरण्यात येणारी माहिती सादरीकरणाद्वारे देऊन विचारलेल्या शंकांचे समाधानही केले. शेवटी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर यांनी आभार मानले.  
या प्रणालीच्या दुसरी कार्यशाळा शुक्रवार 13 डिसेंबर व सोमवार 16 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.     
00000    


तलाठी पदभरतीसाठी सादर केलेली
मुळ कागदपत्रे घेऊन जाण्याचे आवाहन
नांदेड दि. 12 :- जिल्‍ह्यातील तलाठी पदभरतीसाठी मुळ कागदपत्रे सादर केलेल्‍या उमेदवारांनी आस्‍थापना शाखेतून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्‍यात आलेली मुळ पोच पावती व ओळखपत्रासह स्‍वतः उपस्थित राहुन आपली मुळ कागदपत्रे 13 डिसेंबर 2019 व दि. 16 डिसेंबर 2019 रोजी कार्यालयीन वेळेत हस्‍तगत करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य सचिव जिल्‍हा निवड समिती नांदेड यांनी केले आहे.
महापरीक्षा पोर्टल मार्फत नांदेड जिल्‍ह्यातील तलाठी पदभरती 2019 साठी उपलब्‍ध रिक्‍त पदांची जाहीरात प्रसिध्‍द करुन 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत परीक्षा घेण्‍यात आली होती. परीक्षेत त्‍या-त्‍या प्रवर्गातील गुणवत्‍तेनुसार निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्‍याकरीता मुळ कागदपत्रे तपासणीसाठी पात्र विविध प्रवर्गातील उमेदवारांची यादी निश्‍चीत केली. या यादीतील पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्रे तपासणी 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड परीसर येथे करण्‍यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.       
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...