Wednesday, November 30, 2016

शहीद जवान संभाजी कदम यांचे पार्थिव आज पोहचणार

नांदेड, दि. 30 :-  जम्मू-काश्मिरमधील नागरोटा येथील लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील चकमकीत 5- मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी यशवंत कदम ( वय 33) यांना वीरमरण आले. शहीद कदम यांचे पार्थीव जम्मू येथून तेथील युद्वजन्य परिस्थितीखराब हवामानामुळे आज नांदेड येथे पोहचू शकले नाही. जम्मू येथील सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कदम यांचे पार्थीव उद्या गुरूवार 1 डिसेंबर, 2016 रोजी नांदेड येथे पोहचणार आहे. त्यानंतर जानापुरी या त्यांच्या मुळगावी लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, अंत्यसंस्कारासाठीची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज जानापुरी येथे विविध यंत्रणांच्या समन्वयातून पुर्ण करण्यात आली.  जम्मू येथील सैन्य अधिकारी  कर्नल  हरीसींग यांनी  दिलेल्या  माहितीनुसार शहिद जवान यांचे पार्थीव दिनांक 1  डिसेबर 2016  रोजी सकाळी  जम्मू  येथून  वायुदलाच्या खास विमानाने पुणे येथे पोहचेल व तेथून  नांदेड विमानतळावर सकाळी  11 वाजता  पोहचणे अपेक्षीत  आहे.  त्यानंतर पार्थिव जानापुरी येथे शहीद कदम यांच्या मुळ गावी नेण्यात येईल. जानापुरी येथे शहीद कदम यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन तसेच त्यानंतर लष्करी प्रथेप्रमाणे मानवंदना दिल्यानंतर लष्करी व शासकीय इतमामाप्रमाणे पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल.
 जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार भारतीय लष्करातील वरीष्ठ अधिकारी तसेच जानापुरी येथील व्यवस्थेसाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, कंधारच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आदी यंत्रणांचे अधिकारी जानापुरी येथील व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत. शहीद जवान कदम यांच्या लष्करी व शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारासाठी जिल्हयातील  सर्व माजी सैनिक / विधवांनी सैन्यदलाचा गणवेश-मेडल व मिलीटरी कॅप लावून उपस्थित रहावे असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार यांनी केले आहे.
0000000



शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना कॅशलेस
व्यवहाराबाबत प्रशिक्षण द्या - जिल्हाधिकारी काकाणी
बँकांना निर्देश, नागरिकांनाही डिजिटल पेमेंट मार्ग अवलंबण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून, नागरिकांपर्यंत दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाणी घेण्यासाठीच्या मार्गांबाबत लोकशिक्षण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग, बाजार समिती, आठवडी बाजार त्याही पुढे जाऊन घराघरांत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करण्याची माहिती पोहचावी यासाठी शाळा, महाविद्यालय यांच्याद्वारेही प्रयत्न करण्यात यावेत असेही श्री. काकाणी यांनी आज येथे बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.  जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाचे प्रमुख अधिकारी तसेच अन्य बँक अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी काकाणी यांनी विशेष बैठक घेतली. त्याबैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यातील रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांच्या लोकशिक्षणाकरिता कार्यक्रमही आखण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, नाबार्डचे व्यवस्थापक श्री. धुर्वे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की,  निश्चलनीकरणानंतर रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांबाबत सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून माहिती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती, मोंढे, विविध सहकारी संस्था यांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. याशिवाय बँक व्यवयाय मित्र (बीसीए) यांची संख्या वाढविण्यात यावी. दोन ते तीन गावांमागे एक बँक व्यवसाय मित्र नियुक्त करण्यात यावेत. त्यांच्याद्वारे आधारशी संलग्न तसेच बायोमेट्रीक पद्धतीने रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करता येतात. याची माहितीही पोहचविण्यात यावी. याशिवाय प्वाईंट ॲाफ सेल (पीओएस) यंत्रांची सख्या पुरेशी उपलब्ध होईल. याचाही दक्षता घेण्यात यावी. या यंत्राद्वारे व्यवहार व्हावेत यासाठी बँकांनी विशेषत्वाने प्रयत्न करावेत.  जनधन योजनेशी निगडीत खात्यांवरील व्यवहार रुपे कार्ड, किसान कार्ड यांच्या माध्यमातून व्हावेत यासाठी बँकांनी लोकांमध्ये पोहचून माहिती द्यावी.
यावेळी बैठकीत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार व्हावेत, डिजीटल व्यवहार व्हावे यासाठी शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार तसेच दुकान निरीक्षक यांच्यासह विविध घटकांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही श्री. काकाणी यांनी दिले. या प्रशिक्षणासाठीचे साहित्य, विविध प्रकारचे माहितीपत्रके, दृक-श्राव्य (व्हिडीओज्) आदींचाही वापर करण्यावर भर द्यावा, अशीही सुचना करण्यात आली.
डिजिटल व्यवहाराची व्याप्ती वाढविताना रोखीने आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दीष्ट असून त्याद्वारे व्यवहारात पारदर्शकता आणणे हे ध्येय आहे. नागरिकांनी या पद्धतीचा अवलंब करुन अधिकाधिक डिजिटल व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकरी काकाणी यांनी केले आहे.


– डिजिटल बँकिंगचे विविध मार्ग –
1) यूपीआय : या पद्धतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम मध्ये नोंदवा. संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा. आपला आयडी तयार करा. आपला पिन नंबर सेट करा. यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
2) यूएसएसडी : आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा. आपल्या फोन वरुन * 99 # डायल करा. आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे, फंड ट्रान्स्फर- MMID हा ऑप्शन निवडा. ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि MMID टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा. यानंतर आपण आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
 3) ई वॅलेट : एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊन लोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी लिंक करा, आता तुमचा फोन हेच तुमचे वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे.
4) कार्डस्‍ : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा. आपले कार्ड स्वाईप करा, आपला पिन नंबर टाका, पावती घ्या.
5) आधार संलग्न पेमेंट पद्धती : आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा. आपण आपली देवाण-घेवाण, खात्यावरील शिलकेची चौकशी, पैसे जमा करणे, काढणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता.

0000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर
लघुपट सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

नांदेड, दि. 30 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर 'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे. या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास शनिवार 31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट शनिवार 31 डिसेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.comया ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) 8605312555 यांचेशी  संपर्क साधावा.
0000000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...