Monday, May 4, 2020


नांदेड जिल्हा न्यायीक विभागात ;
कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर
मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे अनुपालन करा
    प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया   
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- सध्या उद्भवलेल्या कोविड 19 या साथीच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर मा. उच्च न्यायालयाने 4 मे 2020 रोजी परिपत्रकान्वये विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील, न्यायाधीश यांनी नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करुन सहकार्य करावे, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी सूचित केले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी नांदेड जिल्हा न्यायीक विभागातील सर्व आस्थापना प्रमुख, न्यायीक अधिकारी यांना पुढे असे सुचीत केले आहे की, त्यांनी आपआपल्या न्यायालयात मा. उच्च न्यायालयाच्या नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन तात्काळ प्रभावाने होण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही लगेच करावी.  पुढील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.
न्यायालयात प्रवेश करणाऱ्या सर्व विधीज्ञ, पक्षकार व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप स्थापित करण्याच्या सुचना दयाव्यात. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायालयात प्रवेश करणाऱ्या विधिज्ञ, पक्षकारांचे ओळखपत्र तपासून त्या सर्वांची एका स्वतंत्र नोंदवहीत नोंद केली जाण्याची व्यवस्था करावी. चेहरा व्यवस्थीतरित्या झाकला जाईल, अशा प्रकारे मास्क अथवा रुमालाने बांधलेला असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाऊ नये. न्यायदालनामध्ये शिरण्यापूर्वी हात पाण्याने व सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावे. प्रस्तुत परिपत्रक आपल्या मुख्यालयी असलेल्या स्थानिक अधिवक्ता संघाच्या निदर्शनास आणून दयावे. तसेच दिनाक शनिवार 16 मे 2020 पर्यंत फक्त अत्यंत तातडीची व रिमांडची प्रकरणे दुपारी 12 ते 2 या कालावधीत घेतली जातील. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील आणी न्यायाधीश यांनी  मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे.
00000


नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे  
नवीन तीन रुग्ण पॉझिटीव्ह
आतापर्यंत कोरोनाचे 34 रुग्ण ;
62 जणांचा अहवाल प्रलंबित
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- कोरोना विषाणु संदर्भात आतापर्यंत घेण्यात आलेल्या 1 हजार 329 स्वॅब पैकी 1 हजार 208 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 62 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. तर पाच स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. यापैकी एकुण 34 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह असून यापैकी औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवार 4 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालापैकी गुरुद्वारा परिसरातील तीन व्यक्तींचा अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. या रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेले
नागरिकांना, विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी
राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी संकेतस्‍थळ उपलब्‍ध
नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  नांदेड जिल्ह‍यात तसेच इतर राज्‍यातील किंवा इतर जिल्‍हयातील नागरीक, विद्यार्थी नांदेड जिल्‍हयात कोरोना रोगाच्‍या प्रतिबंधासाठी करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्‍हयात अडकलेले आहेत, अशा नागरिकांना आप-आपल्‍या गावी जाण्‍यासाठी राज्य शासनामार्फत नोंदणीसाठी https://covid19.mhpolice.in/ हे  संकेतस्‍थळ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे.
या संकेतस्‍थळावर परीपुर्ण माहिसह छायाचित्र व इतर आवश्‍यक कागदपत्राची प्रत अपलोड करून माहिती नोंदणी केल्‍यानंतर आपणास ऑनलाइन टोकण क्रमांक प्राप्‍त होईल. हा ऑनलाईन टोकन क्रमांक त्‍याच संकेतस्‍थळावरून डाऊनलोड पास या ऑपशनवर आपला टोकण क्रमांक नोंदवून पासची प्रिंट काढुन घेता येईल.
            या पास नोंदणीसाठी आपणास नोंदणीकृत वैद्यकीय व्‍यावसायिक (Registered Medical Practitioner) याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच आपण  कंटेनमेंट झोन (containment zone) मधील व्‍यक्‍ती नसावेत, आपण जाणारे ठिकाण हे देखील कंटेनमेंट झोन (containment zone) मधील नसावे.  अधिक माहितीसाठी 02462-235077 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच collectornanded1@gmail.com हा ई-मेल नांदेड जिल्‍हा प्रशासनाकडून उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे केले आहे.   
00000


महिला / बालकांच्या संरक्षणासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून
 वन स्टॉप सेंटर ची स्थापना
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही महिला अथवा बालकावर कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास त्यांना त्यापासून संरक्षण व मदत मिळावी या हेतूने नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वन स्टॉप सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव राजेंद्र रोटे यांनी दिली आहे.   
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.  या सेंटरचे काम 24 तास चालू राहील यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून अॅड. सौ. पी. एच. रतन व अॅड. कुमूताई वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास आपण अॅड. सौ. पी. एच. रतन यांना 9923040996 व अॅड कुमूताई वाघमारे यांना 9689881195 या मोबाईल नंबर संबंधितांनी संपर्क करावा अथवा legalaidnanded@gmail.com या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई-मेल आयडीवर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रोटे  यांनी केले आहे.
00000


एप्रिल महिन्यात शिधापत्रिकाधारकांना
23 हजार 450 मेट्रीक टन धान्याचे वितरण
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्‍हयात 1 हजार 993 रास्‍तभाव दुकानदार असून या सर्व रास्‍तभाव दुकानदारांना सर्व योजनेचे एप्रिल महिन्यांसाठी 24 हजार 206 मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. त्यापैकी जिल्ह्यात 23 हजार 450.89 मेट्रीक टन धान्याचे वितरण 30 एप्रिल अखेर करण्यात आले आहे.   
30 एप्रिल 2020 अखेर पर्यंत, माहे एप्रिल 2020 या महिन्याचे नियमित अन्‍नधान्‍य वितरण नांदेड जिल्‍हयासाठी 1 हजार 993 रास्‍तभाव दुकानदारांकडून अंत्‍योदय योजनेचे 2 हजार 759.90 मे. टन, प्राधान्‍य कुटुंब योजनेचे 8 हजार 624.67 मे. टन व  केशरी (शेतकरी) योजनेचे 1 हजार 953.22 मे. टन असे एकुण 13 हजार 337.78 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना वितरण करण्‍यात आले आहे. सर्व योजनेचे एकुण शिधापत्रिका 5 लाख 86 हजार 376 पैकी 5 लाख 67 हजार 938 (96.85 टक्के) शिधापत्रिकाधारकांना धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गंत एकुण शिधापत्रिका 4 लाख 90 हजार 499 पैकी 4 लाख 53 हजार 579  (92.47 टक्के) शिधापत्रिकाधारकांना 10 हजार 113.11 मे. टन धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे.
नोव्‍हेल कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या व एपील (केशरी) योजनेत समाविष्‍ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे 2020 साठी एकुण 83 हजार 638 शिधापत्रिका धारकांनापैकी 1 हजार 579 शिधापत्रिका धारकांना  21.41 मे.टन गहू व 14.28 मे. टन तांदूळ धान्‍य वितरीत करण्‍यात आले आहे. प्रतिकिलो 8 रुपये दराने गहू व प्रति किलो रुपये 12 दराने तांदूळ या सवलतींच्‍या दराने प्रतिमाह प्रती व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्‍नधान्‍य वितरीत करण्‍यात येत आहे.
ई-पॉसद्वारे धान्‍य वितरणाचा नियमितपणे आढावा घेऊन कोणताही पात्र लाभार्थी अन्‍नधान्‍यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे.   
000000

अत्यावश्यक साधनांची साठेबाजी केल्यास कारवाई
फौजदारी प्रक्रिया दंडसंहितेचे कलम 144
नांदेड जिल्ह्यात रविवार 17 मे पर्यंत लागू
नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश रविवार 3 मे रोजी मध्यरात्री पासून ते 17 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश 15, 19 व 21 एप्रिल 2020 व शुद्धीपत्रक 20 व 23 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.  
जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाचे 15, 19 व 21 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश 3 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश 20 व 23 एप्रिल 2020 मध्ये नमूद शुद्धीपत्रकानुसार सुधारीत निर्देश जारी करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांचा 2 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनाने रविवार 17 मे 2020 पर्यंत अटी व शर्तीच्या अधिन लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यानुसार व फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, नमूद व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून जमावबंदी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने सदर आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारचे कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. असे आदेश रविवार 3 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...