Friday, January 26, 2024

 वृत्त क्र. 84

 

खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाचे

सर्वेक्षण ठरेल संपूर्ण देशातील आदर्श मापदंड

- राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे

 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वेक्षणाची आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेच्या माध्यमातून यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोग दक्ष आहे. ग्रामपातळी पासून ते महानगरापर्यंत युद्धपातळीवर केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक माहितीवर व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात असल्याने याला अनन्य साधारण महत्त्व आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व अत्यंत अल्पावधीत होणारा हा सर्वे संपूर्ण देशापुढे एक आदर्श मापदंड ठरणार असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक कटिबद्ध होऊन काम करीत आहेत या शब्दात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी गौरव केला.

 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण व विविध शासकीय योजना, धरण, प्रकल्प, सिलिंग कायद्याअंतर्गत झालेले जमीन अधिग्रहण याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात मनपा क्षेत्रात महानगरपालिका सर्वेक्षण करत असून एकुण 920 प्रगणक यासाठी नेमले आहेत. 16 अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. नगरपरिषदा, ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असून यासाठी एकुण 3 हजार 905 प्रगणक व इतर मनुष्यबळ कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी जशा समोर येत आहेत त्या तात्काळ दूरही केल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यात बराचसा भाग दूर्गम व डोंगराळ भागात असल्याने त्याठिकाणी कव्हरेजचा प्रश्न असून त्यावर मात करून हा सर्वे पूर्ण केला जात आहे. सर्वेक्षण करतांना जर कोणाचा फोन आला तर तो उचलल्यास पुन्हा पहिल्यापासून काही मोबाईलवर सर्वे करण्याची गरज निर्माण होत आहे. हे लक्षात घेता ऑनलाईन सर्वेक्षण सुरू असतांना कॉल न घेता सर्वे पूर्ण झाल्यावर संवाद साधावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याचा एकत्रित विचार करून सर्व प्रश्न व सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्या जात असल्याचे प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी सांगितले.

00000







वृत्त क्र.  83 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते

मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

 

·         भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

·         सगरोळीच्या अश्व पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

·         राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव 

नांदेड (जिमाका), दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिकांची उपस्थिती होती. 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यात पोलीस निरीक्षक माणिक बेंदरे, होमगार्ड कार्यालयाचे राम बाळकृष्ण पिंजरकर व अरुण तेजराव परिहार यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस विभागाकडून उत्कृष्ट तपास कार्य करण्यात आलेल्या पोलीस उप अधीक्षक सुशील नायक, श्वान शेरु, बालाजी अंबलवाड, गजानन पल्लेवाड, रमेश शंकरराव खाडे यांचा पदक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा कारागृह विभागातील महिला शिपाई श्रीमती अर्चना डाखोरे यांचा उल्लेखनिय कार्य केल्याबाबत प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 

कौशल्य विभाग, रोजगार, उद्योजगता व नाविण्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टूंडट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात एमजीएम कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स ॲड टेक्नालॉजीचे मनोज विजयकांत वसमतकर, रुतुज राजेश देवडवार, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टीट्युटचे साईनाथ नामदेव आरसुळे, रोहित सुनिल पाईकराव, श्रीनिवास माळवदकर, शेख फिरदोस बशिर, एमजीएम महाविद्यालयाचे वरद उमेश जिंतुरकर, यश संजय महाजन, शिवप्रसाद फार्मसी महाविद्यालयाच्या श्रीमती गीता माणिकप्रभू बिजलवाड यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नायगाव तालुक्यातील सीएससी, मिनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कहाळा चे उद्योजक विजय विश्वांभर पांचाळ यांना प्रथम पुरस्कार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 15 हजार रुपयांचा धनादेश तर नांदेड तालुक्यातील समर्थ इंडस्ट्रीज, खुपसरवाडी येथील उद्योजक संतोष गंगाधरराव अमिलकंठवार यांना द्वितीय पुरसकार स्मृती चिन्ह, पुष्पगुच्छ आणि 10 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. यात अश्व पथकाने केलेल्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. 

यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप व परेड कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस बल, सशस्त्र सीमा बल, जलद पतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, उपविभाग नांदेड शहर पथक, पोलीस शहर वाहतुक पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, एसपीसी प्लाटून मनपा हायस्कूल, केंद्रीय विद्यालय एसपीसी पथक, पोलीस बॅन्ड पथक, अश्व पथक, डॉग स्काड, मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका, पोलीस विभागास प्राप्त नवीन वाहने बोलरो निओ यांचा पथसंचलनात सहभाग होता.

000000

छायाचित्र: पुरुषोत्तम जोशी, सदा वडजे



















 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...