Tuesday, November 20, 2018

अन्न व्यावसाईकांनी परवाना / नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन  
नांदेड, दि. 20 :-  अन्न व्यावसाईकांनी परवाना / नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा. ज्या अन्न व्यावसाईकांची वार्षिक उलाढाल रुपये बारा लाखपेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या अन्न व्यावसाईकांची वार्षिक उलाढाल रुपये बारा लाखपेक्षा कमी आहे. त्यांनी नोंदणी करुन घ्यावी. विना परवाना / नोंदणी व्यवसाय करणाऱ्या अन्न आस्थापनांना न्यायालयीन खटला दाखल करण्याची / द्रव्यदंडाची तरतूद या कायद्यानुसार आहे.
नांदेड जिल्ह्यातील नोंदणी / परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या अन्न आस्थापना (उदा: अन्न उत्पादक, रिपॅकर, घाऊक , किरकोळ, किराणा दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा,पाणीपुरी, भेळ, स्नॅक्स,वडापाव, मंच्यूरियन, चायनिज पदार्थ, विक्रेते, दाबेली, मांसाहारी, कवाब, मास मच्छी मटन विक्रेते ( राज्य शासनाने गोवंश हत्या बंदी निर्बधित केलेले मास वगळून) . अन्न पदार्थाची फेरी करुन विक्री करणारे व्यावसायिक घरोघरी दुध विक्री पुरवठा करणारे व्यावसायिक , पान स्टॉल / शॉप / भांडार , फळ विक्रेते व त्यांचे कमिशन एंजट, ताडी, निरा, विक्री करणारे, अन्न पदार्थाची वाहतुक करणारे सर्व वाहतूकदार, शाळा, कॉलेजमधील व परिसरातील सर्व खाद्यपदार्थ विक्री करणरे व्यावसायिक,  भोजनालय, घरगुती मेसचालक, मेसची सुविधा असणारे हॉस्टेल, केटरर्स, पॅक बंद पदार्थाचे वितरण करणारे वितरक , बेबीफुड व तत्सम अन्न पदार्थ विक्री करणारे औषध दुकानदार, न्युट्रीशन फुड विक्रेते, खाद्य बर्फ , रसवंती, ज्युस सेंटर, बेकरी व बेकरी उत्पादन करणारे व आईसक्रीम पार्लर ईत्यादी यांनी त्यांच्या व्यवसायाच्या स्वरुपानुसार परवाना / नोंदणी घेणे आवश्यक आहे.
परवाना / नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून कोणत्याही नेटकॅफे, ग्राहक सेवा केंद्र यांच्यामार्फत www.fssai.gov.in या वेबसाईटवरुन आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करुन विहीत नमुन्यात अर्ज करुन ऑनलाईन शुल्क भरुन स्वत:चा व्यवसाय परवाना / नोंदणी करुनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांनी केले आहे.
तसेच व्यापक जन आरोग्याच्या हेतूने महाराष्ट्रात गुटखा / पानमसाला सुगंधीत तंबाखु व तत्सम पदार्थ यांच्यावर बंदी असून कोणत्याही अन्न व्यावसायिकांनी पान मटेरियल विक्रेते / पान स्टॉल /शॉप / भांडार यांनी त्यांची उत्पादन साठवणूक , वाहतुक विक्री करु नये, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल,असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.     
बुधवारी दारु दुकाने बंद  
नांदेड, दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात व शहरात दि. 21 नोव्हेंबर, 2018 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठ्या प्रमाणात ईद-ए-मिलादुन्नबी (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) साजरी होणार आहे. त्या अर्थी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी , नांदेड यांनी आदेश दिले आहेत.
ईद-ए-मिलाछुन्नबी  (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) निमित्त मागील वर्षीप्रमाणे दि. 21 नोव्हेंबर, 2018 रोजी सायंकाळी 6-00 वाजेपर्यंत नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएलल / बिआर -2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशानचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.
 

गोवर-रुबेला मूक्तीसाठी...
 
-         अनिल आलुरकर
     जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
           
गोवर-रुबेला या आजारांचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने देशभरात गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणजे ही मोहिम महाराष्ट्र राज्यात 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होत आहे. या मोहिमेविषयी ही माहिती.
 
गोवर आणि रुबेला या लहान मुलांना होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश पातळीवर नियोजनबध्द रीतीने प्रक्रिया सुर करण्यात आली आहे. गोवर आणि रुबेला या दोन्ही आजारावर एमएमआर लसीमुळे प्रतिबंध करता येतो. या रोगांवर मात करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत नऊ महिने पूर्ण केलेल्या ते पंधरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल.
            गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून या रोगामुळे मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व येऊ शकते. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. ज्या मुलांना लस मिळालेली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्केपेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होण्याची शक्यता राहते. रुबेला ज्याला जर्मन मिझल सुध्दा म्हटल्या जाते, हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागुंत याच्यामुळे होऊ शकते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
           
गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात. गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया आणि मेंदूज्वरासारखे आजार उदभवतात. पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते. या आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते. या आजारामुळे देशात दरवर्षी सुमारे 49200 बालके गोवरामुळे मृत्यूमूखी पडतात. आणि महत्वाचे म्हणजे हा आजार गोवर लसीचे दोन डोस देऊन पूर्णपणे थांबवू शकतो.
            गर्भवती मातेस पहिल्या तिमाहीत रुबेला हा आजार झाल्यास बालकांमध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकांमध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने ह्रदयाचे आजार तसेच बहिरेपणा किंवा आंधळेपणा येऊ शकतो. दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त कंजेनायटल रुबेल सिंड्रोम ( सी.आर.एस.) लस आजाराची बालके जन्माला येतात. जन्मत:च व्यंग घेऊन असलेल्या या बालकांमुळे संपूर्ण कुटूंब मानसिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन जाते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुध्दा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (एमएमआर) चा वापर केला जातो.
            गोवर व रुबेलाचे प्रगत राष्ट्रांमधून सन 2002 सालीच उच्चाटन झाले आहे. परंतु अशा आजाराचा रुग्ण त्या देशात जातो आणि त्याठिकाणी लस न मिळालेला बालक अशा रुग्णांच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याला हा असा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे नियमित लसीकरण अतिशय आवश्यक आहे. गोवर, रुबेला आणि कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) हे आपण थांबवू शकतो. त्याकरिता नियमित लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. परंतु त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नियमित लसीकरणाच्या माध्यमातून आपण हे प्रमाण बरेच कमी करु शकलो आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. शाळांमध्ये पालक सभा घेऊन या मोहिमेची माहिती दिली जात आहे. पालकसभेत आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी पालकांनी उपस्थत केलेल्या विविध शंकांचे निरसन करुन त्यांना या लसीकरणाची उपयोगिता व महत्व पटवून देत आहेत.
गोवर लसीप्रमाणे एमएमआर लसीचे दोन डोस दिले जातात. गोवर रुबेला या लसीचा अंतर्भाव नोव्हेंबर 2018 पासून शासकीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येईल. परंतु यापूर्वी गोवर रुबेला लसीची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येईल. या मोहिमेत 9 महिने पूर्ण ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल. ही लस इंजेक्शनद्वारे उजव्या दंडात (सब क्युट्यानियस) देण्यात येईल. बालकांना या लसीचा डोस पूर्वी दिलेला असेल तरीही मोहिमेतील जादाचा डोस देणे आवश्यक आहे. जादाचा डोस दिल्याने बालकाला कोणतेही नुकसान होत नाही. ही मोहीम 27 नोव्हेंबर पासून राबविण्यास सुरुवात होणार असून सुमारे पाच आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवडे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. पाचव्या आठवड्यात राहिलेल्या सर्व मुलांना डोस देण्यात येईल.
लोकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी भारत सरकारने एमआर कॅम्पेन सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये भारतातील नऊ महिने ते पंधरा वर्षाखालील 40 कोटींपेक्षा जास्त बालकांना लस द्यायची आहे. 2017 मध्ये सुरु झालेली ही मोहीम दोन वर्ष राबवायची आहे.
या लसीचा कोणताही दुष्परिणाम नाही. अगदी नगण्य स्वरुपात एखाद्या मुलांना किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतो. त्यावर तातडीने इलाज केल्यास कोणताही धोका नाही. ही लस घेतल्यावर मुलांना गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या 9 महिने पूर्ण ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना एमआर लसीचा डोस देऊन त्यांना गोवर व रुबेला आजारांपासून मुक्त  करावे.
यासाठी प्रत्येक पालकांनी पुढाकार घेण्याची गरज असून आपल्या शाळेत, घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन पात्र मुला-मुलींना एमआरची लस देण्यास पुढे यावे. आपल्या परिसरातील पात्र बालकांनाही लस मिळाल्याची खात्री एक सुजान नागरिक म्हणून पुर्ण करा.
 
 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...