Saturday, May 14, 2022

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी

सामाजिक न्याय भवनला भेट देऊन एसटीपी युनिटची केली पाहणी  

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज येथील सामाजिक न्याय भवन येथे भेट दिली. सामाजिक न्याय भवनच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून (एसटीपी) फुलविण्यात आलेल्या परिसरातील बगीच्याची पाहणी त्यांनी केली. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी नांदेड शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध ठिकाणी हे एसटीपी प्रकल्प बसविण्यात आले असून पाण्याच्या पूर्नवापराचा नवा मापदंड निर्माण केला आहे. नाविन्यपूर्ण या प्रकल्पाचे त्यांनी कौतूक केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून त्यांनी अधिक माहिती समजून घेतली. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, संशोधन अधिकारी आनंद कुंभारगावे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. त्याचबरोबर डिजिटल स्टँडीद्वारे शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार होण्याच्या विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल स्टँडीचेही त्यांनी अवलोकन केले.

000000






 मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोगाला

निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा

 

नांदेड (जिमाका), दि. 14 :- औरंगाबाद विभागासाठी समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम दिनांक 22 मे 2022 रोजी, सकाळी 9.30 ते 11.30 ही वेळ निश्चित करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ज्‍या नागरीकांना / संस्‍थाना मा. समर्पित आयोगाची भेट घ्‍यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे अशा नागरीकांनी / संस्‍थांनी त्‍यांचे / संस्‍थेचे नाव, पत्‍ता, दुरध्‍वनी क्रमांक व ई-मेल इत्‍यादी माहितीसह नोंदविणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 21 मे 2022 पर्यंत (कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत) इच्‍छुकांनी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये नागरीकांच्‍या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण देण्‍यासाठी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे महाराष्‍ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्‍यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्‍यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्‍या भेटीच्‍या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेतदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्‍त कार्यालयात आपल्‍या नावाची नोंदणी भेटीच्‍या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्‍यात आले आहे.


नांदेड जिल्‍हयातील नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, नगरपरिषद, देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड, हदगांव, लोहा, कंधार, किनवट, नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, माहुर या 17 नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषद प्रशासन विभाग, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे, तसेच ग्रामीण भागासाठी उपजिल्‍हाधिकारी(सामान्‍य), जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कक्ष (हेल्‍प डेस्‍क) स्‍थापन करण्‍यात आला असून दिनांक 21 मे 2022 पर्यंत (कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत) इच्‍छुकांनी नोंदणी करणे आवश्‍यक राहील, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 नांदेड येथे पोलीस आयुक्तालयाबाबत

लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करू

-        गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज घडीला 36 पोलीस स्टेशन आहेत तर महानगरामध्ये 12-14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरातील पोलीस स्टेशनची संख्या लक्षात घेऊन नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

 

नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृहविभागाच्या बैठक घेतला. अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. आरोपी विरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हे अचूक झाले पाहिजे. याचबरोबर याचे प्रमाणही अधिक वाढले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000000

 ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी

गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

 

          मुंबई, दि. 13 : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

          राज्यातील जिल्हा परिषदपंचायत समितीग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिकानगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

          राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेतऔरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेतनाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेतकोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेतअमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेतनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.

०००

 मंगळवारी महिला लोकशाही दिन 

जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज 

 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी मंगळवार 17 मे 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 मे 2022 रोजी सुट्टी येत असल्याने मंगळवार 17 मे 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  डॉ. अब्दूल रशीद शेख यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...