Wednesday, July 19, 2023

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

मुसळधार पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

 

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 19 व 20 जुलै 2023 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 19 व 20 जुलै 2023 या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

 

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबुमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून गुरुवार 20 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जुलै  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

गोगलगायीचे वेळीच नियंत्रण करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 गोगलगायीचे वेळीच नियंत्रण करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगल गायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी ते होऊ नये म्हणुन सुप्त अवस्था संपुन जमीनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. गोगलगायीं अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान टाळता येईल, असा सल्ला कृषि शास्त्रज्ञांनी दिला आहे.

 

जमिनीतील सुप्तावस्था संपुन वर आलेल्या गोगलगायी पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायींशी संग करुन पंधरा दिवसानंतर जमिनीच्या खाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकतात. या अंडयाद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होते. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायींचे नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिका बरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल. त्यासाठी नियंत्रण हवेसुप्त अवस्थेतील गोगलगायीने डोकेवर काढले आहे. त्यामुळे आताच गोगलगायीचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. तरच सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान टळेल.

 

गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन :

 

गोगलगायी सोयाबीन पिकाचे रोप अवस्थेत मोठया प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सद्या गोगलगायी सुप्त अवस्थेतुन बाहेर आलेल्या आहेत. दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बांधाच्या बाजुन आढळून येत आहेत. त्यामुळे गोगलगायीच्या प्रभावी नियंत्रणासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतात जाऊन जमीनीच्यावर आलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायी कुठे न टाकुन देता साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात. गोळा केलेल्या गोगलगायीवर मिठ किंवा चुन्याची भुकटी टाकावी. त्यासोबत सुतळीचे बारदाने गुळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधाच्या बाजुने रँण्डम पध्दतीने टाकावे. दुसऱ्या दिवशी सकाळी बारदाण्याखाली जमा झालेल्या गोगलगाई गोळा करुन मिठाच्या अथवा साबणाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात. गोगलगायींचा प्रादुर्भाव जास्त क्षेत्रावर झाला असल्यास मेटाल्डीहाईड दानेदार किलो प्रति एकर याप्रमाणे शेतात पसरुन घ्यावे. अशा पध्दतीने गोगलगायीचा एकात्मिक व सामुहीक पध्दतीने नियंत्रण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

0000

 

अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

 अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर 22 ऑगस्ट 2005 ते 30 एप्रिल 2023 पर्यतची वर्ग-3 व वर्ग-4 अनुकंपाधारकांची अंतीम सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nanded.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द करण्यात आलेली यादी सर्व अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी संकेतस्थळावरुन प्राप्त करुन सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून द्यावी.

 

शासन निर्णयात नमूद तरतुदी, निकषाचे काटेकोर पालन करुन अनुकंपा प्रतिक्षासुची, नियुक्ती बाबतची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. अनुकंपा नियुक्ती बाबतची कार्यवाही नियमानुसार विहित वेळेत करण्याची दक्षता अनुकंपा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच ज्या कार्यालयाच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकारी हे विभाग स्तरावर किंवा राज्यस्तरावर आहेत अशा संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्यास्तरावरील संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 53.60 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  53.60  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 19 :- जिल्ह्यात बुधवार 19 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 53.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 258.60  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार 19 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 74.40 (196.50), बिलोली-58.40 (337.10), मुखेड- 30 (321.30), कंधार-36.60 (155.10), लोहा-61 (199.40), हदगाव-39.40 (211.90), भोकर-68.10(291.50), देगलूर-33.50(246.70), किनवट-42(319.70), मुदखेड- 70.50 (254), हिमायतनगर-46.80 (179.50), माहूर- 37.80 (356.40), धर्माबाद- 73.80 (306.50), उमरी- 100.30 (312.20), अर्धापूर- 77.90 (254.70), नायगाव-59.20 (235.20) मिलीमीटर आहे.

0000 

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न

 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी शिबिर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 19 :- राजश्री शाहू महाराज जयंती पर्वा निमित्य 26 जून ते 26 जुलै 2023 या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन शिबीर व जात वैधता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी शिबिर नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदाकिनवट येथे संपन्न झाले.

यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे लघुलेखक उच्चश्रेणी एम. एस. मुळेसंजय पाटीलमुख्याध्यापक तथा प्राचार्य एच.ए.शेखउपप्राचार्य एस. के. राऊतपर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैस ठाकुर व विज्ञान विभाग प्रमुख प्रा. आर.वी. इंगळे यांची उपस्थिती होती.

26 जून ते 26 जुलै या कालावधीत शालेय स्तरावर सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत मिळवण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या शिबिरास मार्गदर्शन करतांना एम.एस. मुळे यांनी शिबिरामागची भूमिका मांडली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .प्रा. हेमंत सोनकांबळे यांनी केले. जात पडताळणी समितीचे संजय पाटील यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मुदतीत मिळविण्यासाठी काय-काय अडचणी निर्माण होतात व त्या कशा पध्दतीने त्या सोडवाव्यात यासंबंधी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबीर व जात वैधता प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास किनवट तालुक्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. हेमंत सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रा. सुबोध सर्पे यांनी मानले.

0000

प्रवाशी बस तपासणी मोहिमेत 150 दोषी वाहनांवर कारवाई

 प्रवाशी बस तपासणी मोहिमेत 150 दोषी वाहनांवर कारवाई

§  दोषी वाहनांवरील कारवाईत 2 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल

नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयच्या वायुवेग पथकाद्वारे प्रवासी बसची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. परिवहन आयुक्त, मुंबई यांनी खाजगी प्रवासी बसेसची तपासणी काटेकोरपणे करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने या मोहिमेत 1 जुलै  ते 16 जुलै 2023 या कालावधीत 150 दोषी वाहनांवर कारवाई करुन 2 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रवासी बसची तपासणी मोहिम कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत प्रामुख्याने वाहनांची कागदपत्रे वैध नसणे, वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त  सुस्थितीत नसणे, विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक करणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर . व्यवस्थित नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, जादा भाडे आकारणे, अग्निक्षमन यंत्रणा कार्यरत नसणे, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे बाबत कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन कायदा 1988  2019 तसेच अनुषंगिक नियम यानुसार या बसेस सर्व अटी/शर्ती पूर्तता करतात का याबाबत तपासणी करण्यात आली. तसेच ब्रेथ अनालायझरद्वारे 115 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली  यामध्ये कोणीही दोषी आढळून आलेले नाही. प्रवासी बस चालक/मालक यांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे वाहनाची कागदपत्रे  इतर सर्व बाबींची पूर्तता होईल याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा तपासणी दरम्यान दोषी आढळून आल्यास वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन दक्ष

संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन दक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  नांदेड जिल्ह्यात गोदावरीपैनगंगामांजराआसनालेंडीकयाधूमन्याड या प्रमुख नद्या असून जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. राज्यशासनाने एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ची स्थापना केलेली आहे. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात करण्यात आलेली आहे.

 

14 जुलै 2023 रोजी रात्री 8 वाजता या तुकडीचे नांदेड येथे आगमन झाले आहे. 15 जुलै  ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी ही तुकडी नांदेड येथे तैनात राहणार आहे. या तुकडीमध्ये एकूण 36 जणांचा समावेश आहे. यात पोलीस उप निरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व बाकी ३३ जवान आहेत. या तुकडीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मनोज जितेंद्र परीहार हे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक विजय यशवंत गावंडेदिनेश मधुकर तायडे व शंकर लक्ष्मण उकांडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत. या दलाची राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे करण्यात आलेली आहे. ही तुकडी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.  समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे हे काम पाहत असून 9422875808  हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे.


0000

 

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...