Friday, July 8, 2022

रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न   

नांदेड (जिमाका) दि. 8 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे "रस्ता सरुक्षा मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची विशेष  उपस्थित होते. 

सार्वजनिक वाहतुकीचा दैनंदि व्यवहारात वापर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करावे. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वानी वाहतुक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितले.

या शिबीराउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी नियमातील बदल, रात्रीच्या वेळी/ पावसाळ्यात वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट / सिटबेल्टचा वापर याबाबत मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी  संदिप निमसे यांनी केले. सुत्रसंचालन नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.

00000



 

हर घर तिरंगा साठी जिल्ह्यातील

5 लाख नागरिकांचा मिळेल उत्स्फूर्त सहभाग

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांच्या मनात भारतीयत्वाची भावना वृद्धींगत व्हावी, नवीन पिढी पर्यंत स्वातंत्र्य लढ्याचे मोल पोहचावे या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहीम प्रभावीपणे राबवू. यात जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, महानगरपालिका, शैक्षणिक संस्था यांच्या सहभागातून या मोहिमेला जिल्ह्यातील 5 लाख लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमासाठी 11 ते 17 ऑगस्ट हा सप्ताह निर्धारीत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व घटकातून या अभिनव उपक्रमाला सहभाग मिळावा यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक समिती नियुक्त करून चालना दिली आहे. आज या उपक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे व कापड व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आढावा घेण्यात आला. 

हर घर तिरंगा उपक्रमाबाबत कृती आराखडा तयार करून प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा मध्ये घेतलेला सहभाग नोंदवला जावा यासाठी स्वतंत्र ॲपही विकसीत करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लोकांना आपल्या घराच्या पत्त्यासह आपला सहभाग अधोरेखीत करता येईल. harghartirangananded.in या लिंकवर सहज सोप्या पद्धतीने नागरिकांना आपला सहभाग शासन स्तरावर नोंदविणे शक्य आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑनलाईन नोंदणीसह तिरंगा उत्पादक, विक्रेते, जे लोक उत्स्फूर्त राष्ट्रध्वज दान देऊ इच्छितात अशा दात्यांची निवड केली जात आहे. 5 लाख राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील बचतगट, खाजगी उत्पादक, खादी भांडार, जेम, इंडिया मार्ट, ॲमेझॉन आदींशी समन्वय साधला जात आहे. ज्या इच्छुकांना गरीब घरांसाठी राष्ट्रध्वज दान करण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती, संस्थांचीही यात मदत घेतली जाणार आहे. राष्ट्रध्वज विक्रीचे केंद्र लवकरच जाहीर करण्यात येईल. युवा वर्गांचा अधिकाधिक यात सहभाग व्हावा यासाठी लवकरच महाविद्यालयीन पातळीवर संवाद कार्यक्रमाचेही नियोजन केले जात असल्याचे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या उपक्रमाबाबत केलेल्या सादरीकरणाचा व स्वतंत्र विकसित करण्यात आलेला ॲपचा गौरव करण्यात आला.

00000




 बारावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेशपत्राबाबत आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 8  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापकप्राचार्यशिक्षकविद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे कीउच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षा जुलै-ऑगस्ट 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांना जुलै-ऑगस्ट 2022 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शनिवार 9 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कॉलेज लॉगईनमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेश हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.

 

प्रवेश पत्रावरील फोटोस्वाक्षरीविद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधीत उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेश पत्र द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थीपालकशिक्षकमुख्याध्यापकप्राचार्यसर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावीअसे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  270 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, मुखेड 2  व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 949 एवढी झाली असून यातील 1 लाख 226 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 7 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 4 असे एकूण 11 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 असे एकुण 31 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 9 हजार 603

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 89 हजार 314

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 949

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 226

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-31

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

 जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत  

नांदेड (जिमाका) दि. 8  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 जुलै 2022  रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.    

 

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 12 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी

विशेष तपासणी शिबिर  

 

·  33 महिला बंदीजणांची झाली तपासणी

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीजणांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासह कुणाला जर गंभीर आजार असेल तर त्याचे लवकर निदान करता यावे या उद्देशाने आज जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरासाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून एनसीडी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उच्चरक्तदाबमधुमेहएचआयव्ही इत्यादीची तपासणी करण्यात आली. या शिबिरात उच्चरक्तदाब व मधुमेहाचे निदान झालेल्या बंदीजणांवर त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात आले.

 

संपूर्ण कैद्यांची  जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकामार्फत नियमित तपासणी केली जाते. याचबरोबर दररोज वैद्यकीय अधिकारी कैद्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध असतात. कोरोनाच्या विविध मर्यादानंतर आता एकत्रित आरोग्य तपासणी शिबिर सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिक्षक एस.एम. सोनवणे यांनी दिली.

 

या आरोग्य शिबिरात एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खानभूलतज्ञ डॉ. सोनाली जाधवसमुपदेशक सुवर्णकार सदाशिवप्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकरअधिपरिचारिका प्रियंका झगडेएसटीडी समुपदेशक उषा वानखेडे यांनी बंदीजणांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तुरुंगाधिकारी तुकमेऔषध निर्माण अधिकारी आर. के. देवकत्तेमहिला रक्षक टेकुळे व ताई बिनवडे यांनी सहकार्य केले.

0000



 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

 

·  मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 9 नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात एकूण 310 उमेदवार उपस्थित होते. नऊ कंपन्यांनी उमेदवारांची मुलाखती घेऊन 191 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड केली.

 

या मेळाव्यास श्री गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक श्री गुरुविंदरसिंग वाधवाशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बिराजदार, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री पाटणुरकर, गुरुद्दारा सचंखड बोर्डाचे सहायक अधीक्षक रवींद्रसिंग कपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता पोहरेसहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवारप्राचार्य गुरबचन सिंग शिलेदार यांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुविंदरसिंग वाधवा यांनी युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखून जीवनातील समस्यांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कामाशिवाय या जगात कुणीही महत्व देत नाही या विषयावर मार्गदर्शन केले. श्री पाटणुरकर यांनी मराठवाडयातील मुलांची मानसिकता कशी असते व त्यांना या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे सांगितले. सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी वर्तन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करुन मार्गदर्शन केंद्रातील योजनांची माहिती दिली. श्रीमती सुजाता पोहरे यांनी विद्यार्थ्यांना आपले कर्तृत्व कसे सिध्द करावे याबाबत मार्गदर्शन केले.

00000







 आयटीआयमध्ये अल्पसंख्याक समाजातील

युवक-युवतींसाठी विविध ट्रेडसाठी राखीव जागा

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अल्पसंख्याक समाजासाठी विविध ट्रेडच्या राखीव जागा उपलब्ध आहेत. अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी या राखीव ट्रेडसाठी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. बिरादार यांनी  केले आहे.

 

सन 2022 साठी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 20 ट्रेडसाठी जवळपास 724 जागा  उपलब्ध आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ट्रेडसाठी उपलब्ध आहेत. फक्त अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येईल. ड्रासमन सिव्हिल-24फिटर-24मेसन -24ट्रॅक्टर मेकॅनिक -20टुल ॲन्ड डायमेकर-24 या ट्रेडसाठी अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावाअसेही आवाहन संस्थेचे प्राचार्य  यांनी केले आहे.

00000

औरंगाबाद येथे युवकांसाठी आर्मी भरतीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अग्नीपथ योजनेंतर्गत 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद परिसरात होणाऱ्या भरतीत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कर्नल प्रविण कुमार एस यांनी केले आहे.

 

भरती बाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 या तारखेस अनुसरुन निश्चित केले जाईल. यासाठी ऑनलाईन नोंदणी 1 ते 30 जुलै या कालावधीत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे. अग्निवीर सामान्य कर्तव्ययांत्रिकीक्लार्क/स्टोअर किपर टेक्निकल, यांत्रिकी 10 वी उत्तीर्ण, अग्निवीर यांत्रिकी (सर्व शाखा) 8 वी उत्तीर्ण या पदासाठी अर्ज करता येतील. नोंदणी केलेल्या उमेदवारांना 7 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रवेशपत्र मिळतील. नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातील उमेदवार या भरतीत सहभाग घेवू शकतात. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात येत आहे. उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला व दलालांना बळी पडु नये, असे आवाहन आर्मी विभागाने केले आहे.

 

उमदेवारांची पात्रता याप्रमाणे आहे : अग्नीवीर सामान्य कर्तव्य सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्षे अशी आहे. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता दहावीत 45 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा. वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या प्राध्यान्य देण्यात येईल.

 

अग्निवीर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 167 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परिक्षा उत्तीर्ण असावा. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयात किमान एकुण 50 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असावेत.

 

अग्निवीर क्लार्क/स्टोअर किपर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 162 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परीक्षा (कला, वाणिज्य, विज्ञान) यामध्ये 60 टक्के गुण असावेत. तसेच प्रत्येक विषयात 50 टक्के गुण आणि इंग्रजी व गणित, अकाऊंट, बुक किंपीग विषयात 50 टक्के गुण असावेत.

 

अग्निवीर यांत्रिकी (सर्व शाखा) 10 वी उत्तीर्ण आचारी, टेलर, ड्रेसर, व्यवस्थापक, स्वच्छक, मदतनीस आदी पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

 

अग्निवीर यांत्रिकी (सर्वशाखा) 8 वी उत्तीर्ण या हाऊस किपर आणि मेस किपर या पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार हा आठवी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...