वृत्त क्रमांक 1286
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या श्वानांवर जिल्हा परिषदेची अंमलबजावणी मोहीम
नांदेड, दि. 9 डिसेंबर:- आज यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे भटक्या श्वानांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, तसेच डॉ. प्रविणकुमार घुले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन प्रमुख उपस्थित होते.
या कार्यशाळेत सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तसेच पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.
बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या श्वानांबाबत तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
भटक्या श्वानांच्या व्यवस्थापन, जनजागृती, लसीकरण, निर्बीजीकरण, तसेच सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अंमलात आणावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.
०००००


.jpeg)
