Thursday, February 14, 2019


ज्येष्ठ माजी सैनिक / विधवांना अनुदान
            नांदेड, दि. 14 :- वृद्वाश्रमात वास्तव्यास असलेल्या तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक / विधवा यांना अनुदान देण्याची शिफारस करण्यात येत आहे. जिल्हयातील वयोवृद्व पात्र माजी सैनिक / विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधून या योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी  केले  आहे.  
वृद्वाश्रमात वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक / विधवा ज्यांचे जे वय 70 वर्षोच्यावर आहे व सध्या वृद्वाश्रम / आधारगृहात वास्तव्यास आहेत. तसेच जे माजी सैनिक / विधवा  शासकीय / निमशासकीय कार्यालये, शाळा / कॉलेज, शासकीय वसतिगृहे / विश्रामगृहे इत्यादी ठिकाणी त्यांची क्षमता व अनुभवानुसार रोज किमान 3 तास सेवा देत आहेत असे माजी सैनिक / विधवांना त्यांच्या उत्पादक कार्यातील सहभागापोटी कल्याणकारी निधीतून दरमहा 2 हजार रुपये अनुदान देण्याची शिफारस करण्यात येणार आहे. असेही नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
00000


हमीभावाने तूर खरेदी नोंदणी सुरु

नांदेड, दि. 14 :-  केंद्र शासनाचे किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सहा ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.
नांदेड तालुक्यात नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवामोंढा नांदेड. मुखेड- मुखेड तालुका खरेदी विक्री संघ संस्था : तालुका खरेदी विक्री संघ मुखेड यांचे कार्यालय. देगलूर- पूर्वारेश्वर ॲग्रो प्रोड्यूस कं. लि. करडखेड संस्था : आर्य समाज मंदिर रोड जुनी तहसिल जवळ देगलूर. भोकर- भोकर तालुका खरेदी विक्री संघ संस्था : खरेदी विक्री संघ कार्यालय भोकर. नायगाव- कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव संस्था : कृषि उत्पन्न बाजार समिती नायगाव कार्यालय. किनवट- तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट : कृषि उत्पन्न बाजार समिती किनवट कार्यालय हे नोंदणीचे ठिकाण राहिल.
शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीसाठी येतांना सोबत ऑनलाईन पीकपेरा नोदं असलेला सात/बारा आधार कार्ड झेरॉक्स व आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
0000



नांदेड शहरात जडवाहनांना
सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत प्रवेशबंदी  

नांदेड, दि. 14 :- नांदेड शहरात ट्रॅव्हल्स / लक्झरी बसेस व जडवाहनांच्या प्रवेशबंदी अधिसुचनेच्या वेळेत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत. 
मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व जनहितार्थ नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षीत ठेवण्याच्यादृष्टिने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खाजगी बसेस / ट्रॅव्हल्स, सहा-आसनी ॲटोरिक्षा, मिनी-डोअर, काळी-पिवळी टॅक्सी या वाहनांना नांदेड शहरात सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत येण्यास प्रवेशबंदी करण्यात आले आहे.  
·         नांदेड शहरात खाजगी बसेस, ट्रॅव्हल्स, सहा-आसनी ॲटोरिक्षा, मिनी-डोअर, काळी-पिवळी टॅक्सी या वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत येण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.   
·         पुर्णा जि. परभणी ते मालेगाव जि. नांदेड येथून नांदेड शहरात येणाऱ्या या वाहनांसाठी तरोडेकर चौकाचे (राज हॉटेल) पुढे शहरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
·         अर्धापूर, भोकर फाटा मार्गे शहरात येणाऱ्या या वाहनांना नवीन मोंढा टी पॉईंटचे (दांतीवाला पेट्रोल पंपाच्या अलीकडे) पुढे शहरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
·         देगलूर, नायगाव, मुखेड, लोहा येथून धनेगाव फाटा जुना पूल मार्गे शहरात येणाऱ्या या वाहनांना खादी ग्रामोद्योग व खालसा हायस्कूलमध्ये असलेल्या श्री सत्येंद्र शिवराम जिंदम यांची जागा स. नं. 91 सीटीएस नं. 11303 च्या पुढे शहरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लोहा येथून आंबेडकर चौक, नवीन पुल मार्गे शहरात येणाऱ्या या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
यापुर्वीच्या अधिसुचनेत सदर वाहनांसाठी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी घालण्यात आली होती. त्यावेळेत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे. तसेच इतर अटी व शर्ती पुर्वीप्रमाणे कायम राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
0000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
0000


बेरोजगार अभियंतासाठी 
काम वाटप समितीची बैठक

नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक सोमवार 25 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ नांदेड येथे दुपारी 3 वा. घेण्यात येणार आहे.
कामे घेण्यास इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...