Sunday, May 10, 2020


सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्य घ्यावे ;
नांदेड तालुक्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍या
अन्‍न योजनेतून मोफत तांदळाचे वितरण सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 10 :-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना माहे एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याच्‍या दिलेल्‍या नियमित नियतनानुसार अंत्‍योदयकार्ड धारकांना 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्‍य, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल. शेतकरी यांना प्रति व्‍यक्‍ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो (सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्‍या-त्‍या महिन्‍यात करण्यात येणार आहे.
      माहे एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचे वरील प्रमाणे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना ज्‍यामध्‍ये प्राधान्‍य कुटुंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति सदस्‍य प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्‍याचबरोबर अंत्‍योदय योजनेतील लाभार्थ्‍यांना शिधापत्रिकेतील सदस्‍य संख्‍येनुसार प्रति सदस्‍य 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्‍यात येणार आहे.
या दोन्‍ही प्रकारचे वाटप पॉस PoS मशीनमार्फत होणार आहे. माहे एप्रिलचे धान्‍य वाटप झाले असुन माहे मे 2020 चे धान्‍य वाटप चालू आहे. तसेच ज्‍या लाभार्थ्‍यांकडे राशनकार्ड आहेत आणि त्‍यांचे उत्‍पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे परंतू त्‍यांचे ऑनलाईन नोंदणी झालेली नाही अशा कार्डधारकांसाठी 8 रुपये किलो प्रमाणे गहू व 12 रुपये किलो प्रमाणे तांदूळ रास्‍तभाव दुकानात उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. या लाभार्थ्‍यांना प्रत्‍येकी 3 किलो गहू 8 रुपये दराने व 2 किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहे. ऑनलाईन नसलेल्‍या या लाभार्थ्‍यांनी धान्‍य उचलल्‍यानंतर त्‍याची नोंद ई-झी फॉर्म अॅपमध्‍ये त्‍यांची नोंदणी होणार आहे.
अंत्‍योदय योजनेचे लाभार्थी असलेल्‍या नागरीकांना प्रति कार्ड 1 किलो साखर मिळणार आहे तसेच अन्‍न नागरी पुरवठा व ग्रामीण विकास मंत्रालय यांचे नियतण आदेश पत्र 28 एप्रिल 2020 नुसार राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनीक वितरण व्‍यवस्‍थेतील अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटूंब योजनेतील लाभार्थ्‍यांना प्रति शिधापत्रीका प्रति महा 1 किलो डाळ या परीमानात (तुरदाळ व चनादाळ या दोन्‍हीपैकी एक दाळ 1 किलो या कमाल मर्यादेत) मोफत वितरीत होणार आहे.
नांदेड तालूक्‍यात अंत्‍योदय योजनेत 7 हजार 836 शिधात्रीका असुन त्‍यावरील लोकसंख्‍या 37 हजार 102 इतकी आहे तर प्राधान्‍य कुटूंब योजनेत 64 हजार 195 शिधापत्रीका असुन त्‍यावरील लोकसंख्‍या 3 लाख 11 हजार 740 इतकी आहे. तसेच शेतकरी योजनेत 5 हजार 174 शिधापत्रीका असुन त्‍यावरील लोकसंख्‍या 24 हजार 654 इतकी आहे.
या सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी केले आहे.
0000000


लॉकडाऊनमधील व्यक्तींना मुळगावी जाण्यासाठी
राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत प्रवास सुविधेकरिता
तहसिलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 10 :-लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मोफत प्रवास सुविधेसाठी संबंधित तहसिलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.   
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर व्यक्तींना राज्यांतर्गत व परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणाऱ्यांना काही अटी व शर्तीवर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर नमूद महाराष्ट्र राज्याच्या सिमेपर्यंत आलेल्या आहेत त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचविण्याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत पोहचविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी Incident Commander इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषीत केले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अडकलेल्या व मुळ गावी जाण्यास इच्छूक असलेल्या परजिल्हा, परराज्यातील मजूर, विस्थापीत कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतर नागरिक यांच्या नावाची यादी प्रमाणीत करुन एकाच ठिकाणी जाणाऱ्यांची प्रवास निहाय यादी एस. टी. महामंडळाच्या आगार व्यस्थापकाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना समन्यय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सुद्धा परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेले वरिलप्रमाणे व्यक्ती मोठ्या प्रमाणात परत येण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींच्याबाबत यापुर्वीचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी ॲन्टी कोरोना कवच / फोर्सची स्थापना करण्यात आली असून परराज्यातून, परजिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये याकरिता घ्यावयाची दक्षता व प्रमाणीत कार्यपद्धती बाबत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची वेळोवेळी नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्यानुसार अलगीकरण, विलगीकरण करण्याची कार्यवाही व इतर अनुषंगीक आदेशात नमूद कामे करावी व अशा नागरिकांची वेळावेळी यादी करुन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठवावी.
या आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी पर्यवेक्षन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी. जे कोणी व्यक्ती, समूह या आदेशाचे उल्लंघन करील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नांदेडचे जिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000


उत्तरप्रदेश, पंजाब राज्यासह ठाणे जिल्ह्यातील
नवीन सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह  
37 अहवाल प्रलंबित, आतापर्यंत 51 रुग्ण पॉझिटिव्ह
44 पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर, आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू
नांदेड, (जिमाका) दि. 10 :- कोरोना विषाणु संदर्भात रविवार 10 मे 2020 रोजी प्राप्त तपासणी अहवालात 6 नवीन रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून हे सर्व रुग्ण इतर राज्यातील, जिल्ह्यातील आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील 3 महिला, पंजाब राज्यातील 1 महिला व एक पुरुष, ठाणे जिल्ह्यातील 1 पुरुष असे एकुण 6 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत घेतलेल्या 51 रुग्णांच्या स्वॅब तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना विषाणु संदर्भात रविवार 10 मे 2020 रोजी सायं. 4 वा. पर्यंतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 96 हजार 147 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यातील 1 हजार 690 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 1 हजार 571 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 37 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. यात घेतलेल्या 51 रुग्णांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
            या पॉझिटिव्ह 51 रुग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व 32 रुग्ण पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले हे रुग्ण रक्कतदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...