Friday, August 27, 2021

 ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर वेबिनार

नांदेड (जिमाका) दि. 27 :- बेरोजगार उमेदवार, युवक-युवतींसाठी ई-कॉमर्स क्षेत्रात नोकरीची संधी विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन 30 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वा. करण्यात  येणार आहे. या वेबीनारमध्ये देगलूर येथील सय्यद कॉम्प्युटर सेंटरचे सय्यद आरीफ सय्यद हबीब हे मार्गदर्शन करणार आहेत. 

हे वेबिनार जॉइन करण्यासाठी https://meet.google.com/bic-kvjr-pax या गुगल मीट लिंकचा उपयोग करावा. रजिस्ट्रेशन, नोंदणीसाठी https://forms.gle/96bJhiX679dnSiR87 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा.  या वेबिनारचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा आधिक माहितीसाठी क्र. 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

इसापूर धरणात 80.41 टक्के पाणीसाठा

पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 27 :- इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शुक्रवार 26 ऑगस्टला इसापूर धरण 80.41 टक्के भरले आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे. 

इसापूर धरणाची पाणी पातळी 438.92 मी. एवढी असून इसापूर धरणाचा जलाशय प्रचलन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा (आरओएस) (90 टक्के विश्वासाहर्ता) नुसार 31 ऑगस्ट पर्यंत 440.82  मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्यादृष्टिने इसापूर धरणातून वक्रदारद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडवे लागेल. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या  प्रमाणात वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी कळविले आहे.

0000


 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्पोर्टस रन फॉर नेशनचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्पोर्टस रन फॉर नेशनचे आयोजन रविवार 29 ऑगस्ट 2021 रोजी अशोकनगर नांदेड येथे सकाळी 7 वा. केले आहे. सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड तायक्कांदो असोसिएशन, मास्टर तायक्कांदो मार्शल आर्ट स्कूलच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले आहे. 

रविवार 29 ऑगस्टला स्पोर्टस रन फॉर नेशनची सुरुवात अशोकनगर येथून सकाळी 7 वा. होईल त्यानंतर भाग्यनगर, आनंदनगर येथून पुन्हा अशोकनगर नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थित समारोप होणार आहे. देशाप्रती मेजर ध्यानचंद यांनी केलेल्या कार्याची ओळख खेळाडूंना व्हावी या उद्देशाने याचे आयोजन केले आहे. नांदेडकरांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. 

00000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. रविवार 29 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून नंदीग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.30 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन.

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 28 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 26 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 89 हजार 898 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 27 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 14 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 58 हजार 40 डोस याप्रमाणे एकुण 10 लाख 72 हजार 70 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 आंतराष्ट्रीय साक्षरता दिनी पढना लिखना कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शिक्षणाधिकारी नांदेड यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून 8 सप्टेंबर रोजी निरक्षरांसाठी पढना लिखना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या साक्षरता मोहिमेची शासन स्तरावर टप्याने सुरुवात झाली आहे.त्यानुसार 8 सप्टेंबर 2009 पासून निरंतर शिक्षण योजनेर्तंगत साक्षर भारत ही योजना राबविण्यात आली आहे.साक्षरतेचे प्रमाण वाढविणे हे उदिष्टे ठेवून पढना लिखना अभियान योजना राबविण्यात येत आहे. सदर अभियानामध्ये काम करण्याऱ्यांनी नजीकच्या शाळेत जाऊन नोंदणी करावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 1  व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 217 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 728 एवढी झाली असून यातील 88 हजार 42 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे हैद्राबाद 1 असे एकुण 1 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 5 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 5 हजार 714

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 2 हजार 752

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 728

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 42

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

ऐतिहासिक टेळकी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांकडून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर

गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप 

नांदेड. (जिमाका) दि. 27 :- भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासा इतकाच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास रंजक आहे. मराठवाडा मुक्तीसाठी ज्यांनी योगदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांची महती इथल्या प्रत्येक पिढींला माहित असणे आवश्यक आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्तीच्या इतिहासाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोहा तालुक्यातील ऐतिहासिक टेळकी या गावी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो आणि जिल्हा प्रशासनाच्या सहभागातून आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, लोहा पंचायत समितीच्या सभापती आनंदराव शिंदे पाटील, उपसरपंच संदीप देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, माहिती सहायक अलका पाटील, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वांना मुकत्ततेने आचार आणि विचारांचे स्वातंत्र्य लोकशाहीने दिले असून या लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण सदैव डोळयासमोर ठेऊन संस्कृती जतन करून संस्कार जपले पाहीजे अशी अपेक्षा जि. प. सदस्या प्रणिता देवरे यांनी व्यक्त केली. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना लोकशाहीची जी मूल्ये आहेत त्याचा अधिक जागर होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि परस्पर सहिंष्णूता ही केवळ लोकशाहीचीच मूल्य नाहीत तर अनेकांच्या त्यागातून भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला मिळालेली ती विरासत आहे. याच्या जपणुकीसाठी प्रत्येकाने या देशाचा नागरीक म्हणून आपल्या कर्तव्याचेही भान ठेवले तर खऱ्या अर्थाने तो भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सन्मान ठरेल असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. 

प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी या महोत्सवाची रूपरेषा विषद करून भारतीय स्वातंत्रय संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील घडामोडींचा धावता आढावा घेतला.

पंचायत समीतीचे सभापती शिंदे पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे मोल लक्षात घेऊन गावाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रशासनासोबत गावातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगीतले. यावेळी लक्ष्मण संगेवार यांनी मनोगत व्यक्त केले. टेळकी गावातील हुतात्मा रघुनाथराव हंबर्डे, हुतात्मा भिकाजी राठोड व इतर स्वातंत्र्य सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक परिवारातील बाबुराव मोरे, खंडू मदेवाड, पुरभाजी मोरे, काप्रतवार, बालासाहेब हंबर्डे यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विदयार्थांचा बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमीत्त गावातील विवीध शाळांमध्ये चित्रकला, रांगोळी आणि फिट इंडीया रन चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि शंकरराव मोरे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाहीर रमेश गीरी यांनी सांस्कृतीक आणि देशभक्तीपर गितांच्या सादरीकरणाने उपस्थीत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली.

00000








    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...