Tuesday, July 27, 2021

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 29 व 30 जुलै 2021 या कालावधीत 2 दिवसाचे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास इमारत, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप, फोन आदीद्वारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 3 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 213 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 166 एवढी झाली असून यातील 87 हजार 460 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 51 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत 1, देगलूर 1, लोहा 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, कंधार 1 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 51 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 144 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 51 हजार 198

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 49 हजार 93

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 166

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 460

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-43

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

गौण खनिज वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 27 :-जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध खनिजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनी आपल्या वाहनांवर तात्काळ जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी, अन्यथा अशा वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे. 

फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 133 नुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने शहरात ट्रक, टिप्पर, हायवा आदी वाहनांनी गौणखनिजाच्या वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

0000



 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...