Thursday, January 25, 2018

लोकशाही बळकट करण्‍यासाठी
युवा शक्‍तीचा सहभाग महत्‍वाचा
- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जागृती फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद
नांदेड दि. 25 :- देशाची लोकशाही बळकट करण्‍यासाठी निवडणकांमध्‍ये मतदानाची टक्‍केवारी वाढली पाहिजे त्‍यासाठी युवा शक्‍तीचा सहभाग महत्‍वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्‍त येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात आयोजित कार्याक्रमात ते बोलत होते.
यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त आयुक्‍त गणेश देशमुख, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्‍छवे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव, प्राचार्य किशोर गंगाखेडकर, नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी, गजानन नांदगावकर , अश्विनी जगताप ,मुगाजी काकडे,  राजेश लांडगे , विजयकुमार पाटे यांची  प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे म्‍हणाले , मतदान हा पवित्र हक्‍क असून त्‍यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाकडन विविध स्‍तरावर प्रयत्‍न केले जात आहेत, असे सांगुन त्‍यांनी युवा मतदारांना या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्‍याचे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा दिली. मुख्‍य निवडणूक आयक्‍त यांच्या संदेशाची चित्रफित दाखविण्‍यात आली. मतदार जागृती निमित्त "सुलभ निवडणुका" या विषयावर महाविद्यालयीन युवकांनी परिसंवादात मते मांडली. तसेच सहस्‍त्रक मतदार, दिव्‍यांग मतदार, नवयुवा मतदार यांना मतदान ओळखपत्राचे मान्‍यवरांचा हस्‍ते वाटप करण्‍यात आले. राष्‍ट्रीय निवडणूक ज्ञान स्‍पर्धेत विजयी ठरलेल्‍या स्‍पर्धकांना, उत्‍कृष्‍ट कार्य करणाऱ्या बिएलओ, परिसंवादातील सहभागी प्राध्‍यापक व शिक्षक यांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.
            प्रारंभी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रांगणात जिल्‍हा‍धिकारी अरुण डोंगरे यांचा हस्‍ते मतदार ज्‍योत प्रज्‍वलीत करून रॅलीचा प्रारंभ झाला. ही रॅली छत्रपती शिवाजी पुतळा, वजीराबाद चौक मार्गे प्रतिभा निकेतन महाविद्यालयात पोहोचली. रॅलीत विविध महाविद्यालयांचे जवळपास सातशे विद्यार्थी, खेळाडु सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक स्‍नेहलता स्‍वामी यांनी तर सुत्रसंचलन राजेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राजेश कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, शेख फय्याज, संजय भालके, संतोष आडे , राजीव कानगुले, रमेश हंबर्डे , प्रभाकर कोत्‍तापल्‍ले ,श्री. पाटील, श्रीमती देगलुरकर, पंडीत पांचाळ, शरद बोरामणे , शेख अझहर , मोहम्‍मद आखीब ,मिलींद रणवीर  गणेश पोटपत्‍तेवार यांनी केले.

000000
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
 नांदेड दि. 25 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 27 जानेवारी, 2018 रोजी औरंगाबाद येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन वासवी माता परमेश्वरी भवन (वासवी मंगल कार्यालय), कॅन्सर हॉस्पिटल समोर सिडको रोड नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. आगमन व लोकतंत्र सेनानी संघ-महाराष्ट्र प्रांत कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. मोटारीने वासवी माता परमेश्वरी भवन (वासवी मंगल कार्यालय), कॅन्सर हॉस्पिटल समोर, सिडको रोड नांदेड येथुन उस्मानपुरा औरंगाबादकडे प्रयाण करतील.
0000000
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 25 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000
शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळा
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  
नांदेड, दि. 25 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात गुरुवार 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेपासून ते शुक्रवार 26 जानेवारी 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे.
000000
हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 25 :- येथील कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच तालुक्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे हरभरा पिकाच्या संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी कार्बेडेझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...