Monday, April 23, 2018


शेतकऱ्यांनी बी.टी.कापूस बियाणे खरेदी करतांना विशेष खबरदारी घ्यावी

---- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 23 :-  शेतकऱ्यांनी बी.टी. कापूस बियाणे खरेदी परवानाधारक बियाणे विक्रत्यामार्फत करावी. शेतकऱ्यांनी बी.टी.कापूस बियाणे खरेदी करतांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक नईम कुरेशी, कृषि विकास अधिकारी पंडित मोरे, विक्रेते प्रतिनिधी विपीन कासलेवाल, दिवाकर वैद्य, मुकेश गुप्ता तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी श्री . डोंगरे म्हणाले की, बियाणे खरेदी करतांना विक्रेत्याकडून छापील पक्की पावती घ्यावी. पावतीवर खरेदी दिनांक, बियाण्याचा प्रकार, नाव, उत्पादक कंपनी लॉट नं. , दर रक्कम बरोबर असल्याची खात्री करावी. दुकानदार, विक्रेत्याची सही व खरेदीदार , शेतकऱ्यांनी सही , अंगठा करावा. बियाणे पॅकेटावरील नोंदी व पावतीवरील नोंदी अचूक आहेत याची पाहणी करावी. नामांकित कंपनीच्या कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणाची निवड करावी. खाजगी व्यक्ती , एजंट , ओळखीची अथवा अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून अथवा शासनमान्य नसलेल्या बी.टी. बियाण्याची खरेदी अथवा लागवड करु नये. शासनाने मान्यता न दिलेल्या वाणाची विक्री, खरेदी व लागवडी करु नयेत. अनाधिकृत बी. टी. बियाणाबाबत कृषि विभागामार्फत धाडी टाकण्यात येत आहेत. अज्ञानामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी, विक्री , लागवड करु नये . तसेच याचप्रकारचे कृत्य बेकायदेशीर असल्यामुळे फौजदारी स्वरुपाची कार्यवाही होवू शकते.

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, शासनाने बंदी घातलेल्या बी. टी. वाणाची विक्री साठवणूक झालेल्या ठिकाणाची माहिती असल्यास जवळच्या तालुका कृषिअधिकारी अथवा जिल्हा प्रशासन कळवावी. माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी या कामी मदत केल्यास अनाधिकृत बी. टी. बियाणे लागवडीमुळे शेतकऱ्यांचे व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. तसेच एसटीबीटी हे पर्यावरणास घातक असल्याने पर्यावरणाचा कायदा लागू होतो. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास अजामीनपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिध्द झाल्यास पाच वर्षाची कैद व एक लाख रुपयांचा दंड अशी कायद्यात तरतुद असल्याने या कायद्याचा कोणीही भंग करु नये. तरी सर्व जनतेने समाजघातक प्रवृत्तीच्या लोकांची माहिती कृषि विभागाकडे कळवावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.   

****

प्रा. वृषाली फुके यांना पीएचडी प्रदान
नांदेड दि. 23 :- परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राज्‍यशास्‍त्र विभागाचे प्रमुख व सहाय्यक प्राध्‍यापक सौ. वृषाली लक्ष्‍मीकांत फुके यांना स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान करुन त्‍यांच्‍या संशोधन कार्याचा गौरव केला आहे. प्रा. फुके यांनी भारतीय लोकशाहीचे सुदृढीकरण आणि माहितीचा अधिकार : एक अभ्‍यास विशेष संदर्भ परभणी जिल्‍हा या विषयावर विद्यापीठाला संशोधन प्रबंध सादर केला होता. त्‍यांनी हा प्रबंध प्रा.डॉ. डी आर भागवत यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुर्ण केला. हा प्रबंध विदयापीठाने स्विकारुन त्‍यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे. प्रा. फुके यांच्‍या यशाबद्दल स्‍थानिक नियामक मंडळाचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, डॉ. विजया नांदापुरकर, प्राध्‍यापक व इतर कर्मचारी यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.
00000


अवैध ऑटोरिक्षातून प्रवास करु नये  
आरटीओ कार्यालयाचे आवाहन
नांदेड दि. 23 :- खाजगी संवर्गातील नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम 16 एप्रिल ते 15 मे 2018 या दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांनी अवैध ऑटोरिक्षातून प्रवास करु नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.    
ऑटोरिक्षा अवैधपणे प्रवासी वाहतुक करताना आढळून आल्यास त्यांचे विरुद्ध कारवाई करुन वाहने अटकावून दंड वसूल करण्यात येणार आहे. अशा अवैधपणे चालणाऱ्या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे पुर्णत: बेकायदेशीर आहे. या वाहनास अपघात झाल्यास व वाहतूक बेकायदेशीर असल्याने कोणत्याही विमा संरक्षणास  प्रवासी पात्र राहत नाहीत. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000


माहूर येथे शुक्रवारी आरटीओचे शिबीर
नांदेड दि. 23 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे माहूर येथील मासिक शिबीर 28 एप्रिल ऐवजी शुक्रवार 27 एप्रिल रोजी होणार आहे. माहूर तालुक्यातील संबंधीत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000


कर्जमाफी योजनेला 1 मे पर्यंत मुदतवाढ
वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
नांदेड , ‍दि. 23 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 1 मे 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रवीण फडणीस यांनी केले. 
राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 16 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नि:शुल्क आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजना  
30 एप्रिलला ग्रामसभेत माहिती संकलन होणार    
नांदेड दि. 23 :- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी 30 एप्रिल रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. 
ग्रामसभेस येताना स्वत:चा मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका सोबत आणणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना भारतातील कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. यासाठी ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेत लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल. सोमवार 30 एप्रिल रोजी ग्रामसभेत याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांची पथके तयार करण्यात आली आहेत. संकलित केलेली माहिती 7 मे 2018 नंतर वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...