Friday, January 21, 2022

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

नांदेड जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक

 जिल्ह्याच्या विकास कामांना वाढीव निधी उपलब्ध करून घेवू

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सोळा तालुक्यांसह अनेक वैविध्य असलेल्या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेद्वारे समतोल विकास साध्य करण्याचे आव्हान नांदेड जिल्ह्याने यशस्वी पैलून दाखविले. गतवर्षी नांदेड जिल्ह्याच्या मंजूर प्रारुप आराखड्यानुसार आरोग्याच्या सेवा-सुविधांसह एकात्मिक विकासाच्यादृष्टिनेही चांगले काम झाले आहे. नाविन्यपूर्ण योजनेद्वारे विकासाचे नवे स्वरूपही दिसून आले आहे. जिल्ह्यातील या उपक्रमाचे कौतूक करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला इतर जिल्ह्यांचा आढावा घेऊन वाढीव तरतूद उपलब्ध करून देऊ असे सांगितले. 

नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड येथून आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा सचित्र आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सादर केला. यात श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन, अद्ययावत कोविड-19 वार्ड, नांदेड जिल्ह्यात 14 मॉडिलर ऑपरेशन थेअटर, जिल्ह्यातील सर्व भागांना आरोग्य सुविधेशी जुळता यावे या उद्देशाने 62 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी, प्रत्येक तालुक्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एक्सरे मशीन्स, महिला रुग्णालय येथे अद्ययावत सोनोग्राफी कक्ष, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अद्ययावत कोविड अतिदक्षता बालरोग कक्ष, मिशन स्वास्थ अंतर्गत क्रीडा सुविधांवर भर, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागातून महसूल कॉलनी येथे 3 सिंथेटिक टेनिस कोर्ट, जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक 3 बॅडमिंटन कोर्ट, जिल्ह्यात शासकीय कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खुल्या जागेत ओपन जीम, नांदेड क्लब येथे हेरीटेज रोड, पाच नगरपरिषदांकरीता अत्याधुनिक अग्निशमन वाहन, नांदेड जिल्ह्यातील रुग्णालय, मनपा व नगरपरिषदांमध्ये विकेंद्रीत मलनिस्सारण केंद्राची उभारणी, नियोजन भवन येथे विविध बैठका, परिषदा यादृष्टिने व्हिडिओ कॉन्फरन्सकरीता डिजिटल एलईडी डिस्पले, सहस्त्रकुंड येथे मेगा ॲडव्हेन्चर स्पोर्ट आदी  उपलब्ध असलेल्या निधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून साध्य करुन दाखविता आली असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोना सारख्या आरोग्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सक्षम करण्यासह एकात्मिक जिल्हा विकासालाही समतोल न्याय दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतांना माहिती दिली. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022-23 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी भरीव वाढीव तरतूद मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हा नियोजन विभागाने जिल्ह्यासाठी 303.52 कोटी मर्यादेत आराखडा सादर करण्याचे निर्देशीत केले होते. तथापि जिल्ह्याचा विस्तार व विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी धरला.

00000










 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

शनिवार 22 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.30 वा. सावरगावमाळ आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. पाळज आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भुमीपूजन समारंभास उपस्थिती.

 

रविवार 23 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील परिसरात दोनशे मुलांच्या वसतीगृहाच्या बांधकामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. भोकर पाणी टंचाई आराखडा बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन नांदेड.

 

सोमवार 24 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वा. बैठकीसाठी राखीव. स्थळ नियोजन भवन नांदेड.

 

मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वा. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील विविध विकास कामाच्या भूमीपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन/लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वा. अर्धापूर ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.

 

बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. स्थळ पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद नांदेड. दुपारी 1.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.  

00000

 

नांदेड जिल्ह्यातील शाळा 24 जानेवारी पासून सुरू होणार 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  सातत्याने शाळा सुरू करण्याची मागणी होत असल्याने दिनांक 24 जानेवारी 2022 पासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

 

स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त, राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिले आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातील कोवीड-19 ची परिस्थिती पाहता 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 24 जानेवारी पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात मान्यता दिली आहे.  शासनाने वेळोवेळी कोविड- 19 च्या संदर्भात दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

000000

 राष्‍ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने

लोकशाहीची भिंत भिंतीवरील चित्रकला स्‍पर्धेस उत्‍स्फूर्त प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बारावा राष्‍ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात साजरा करण्‍यात येणार आहे. निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती करण्यासंदर्भाने विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्‍यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या संकल्‍पनेतून नांदेड शहरातील विद्यार्थी, चित्रकला शिक्षक व इतर नागरीकांसाठी लोकशाहीची भिंत या खुल्‍या चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन आज कृषी तंत्र विद्यालय काबरानगर रोड नांदेड येथे करण्‍यात आले होते. लोकशाहीची भिंत या नाविण्‍यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य पवन ढोके यांच्या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे या होत्‍या.  

 

नांदेड शहरात लोकशाहीची भिंत ही स्‍पर्धा मतदारांमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण करेल. आठरा वर्ष पूर्ण झालेले मतदार निश्चितच प्रेरणा घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवतील. सर्व सुजाण नागरिक मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्‍क बजावतील, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी केले. यावेळी सर्व स्‍पर्धक व चित्रकला शिक्षकांना त्यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.  

 

नांदेड कृषी तंत्र विद्यालय येथील संरक्षण भिंतीवरील दर्शनी भागावर निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती विषयक चित्रे काढण्‍यात आली. या स्‍पर्धेसाठी चित्रकला शिक्षकविद्यार्थी-विद्यार्थीनी, इतर स्‍पर्धकांचा उत्‍स्‍फूर्त  प्रतिसाद  मिळाला. या स्‍पर्धेत शहरातील 11 चित्रकला शिक्षकविद्यार्थी-विद्यार्थीनी असे जवळपास चाळीसच्यावर स्‍पर्धकांनी सहभाग नोंदविला.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास मानेतहसिलदार किरण आंबेकर, नायब तहसिलदार डी. एन. पोटे नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामीनायब तहसिलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णीउपशिक्षणाधिकारी दत्‍तात्रय मठपतीविस्‍तार अधिकारी राजेंद्र शेटे, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील फैय्याज खानशरद बोरामने, विनोद मनवर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार राजेश कुलकर्णी यांनी मानले. परिक्षक म्‍हणून श्रीमती कविता जोशीसुरेश कुऱ्हाडे, विजय सावंत, विलास झोळगेशैलजा बुरसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्‍या य‍शस्वितेसाठी तलाठी नारायण गाढेमाणिक भेासलेसंजय भालकेके. डी. जोशीआर. जी. कुलकर्णीपी. एम. कुलकर्णीसय्यद, बडुरेविनोद जोंधळे यांनी परिश्रम घेतले.

0000000




 नांदेड जिल्ह्यात 719 व्यक्ती कोरोना बाधित 

तर 481 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 960 अहवालापैकी 719 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 592 तर अँटिजेन तपासणीद्वारे 127 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 852 एवढी झाली असून यातील 90  हजार 382 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 812 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 73 वर्षे वयाच्या महिलेचा 20 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 335, नांदेड ग्रामीण 39, भोकर 2, देगलूर 3, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 3, किनवट 72, लोहा 3, मुदखेड 1, मुखेड 19, नायगाव 1, हिमायतनगर 3, बिलोली 5, उमरी 40, अर्धापूर 5, माहूर 3,  हिंगोली 5, परभणी 29, अकोला 1, हैदराबाद 1, निझामाबाद 1, औरंगाबाद 3, लातूर 1, जालना 1, नागपूर 1, वाशीम 6, यवतमाळ 2, पुसद 1, उमरखेड 2, अहमदनगर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 4, बिलोली 16, धर्माबाद 17, हदगाव 6, लोहा 3, देगलूर 28, मुखेड 3, नायगाव 6, उमरी 5, भोकर 2, कंधार 13, मुदखेड 7 असे एकुण 719 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 398, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड  हॉस्पिटल नांदेड 3 असे एकुण 481 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 709, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 812 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 27 हजार 788

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 16 हजार 287

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 96 हजार 852

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 90 हजार 382

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.31 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-31

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-77

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 812

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-03.

 गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 1.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 2.05 वा. नांदेड येथून वाशीमकडे प्रयाण करतील.

00000

लेख क्र 1

 36 हजार 328 रुग्णांनी घेतला महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

 

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा जोतिराव फुले ही योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेचा लाभ 36 हजार 328 रुग्णांनी घेतल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली.  ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे.

 

दुर्धर आजारांचा समावेश

1 एप्रिल 2020 पासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनेक दुर्धर आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे.

 

या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते.  लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयात संगणीकृत नोंदणी केल्यानंतर उपचार दिला जातो.  शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शिधापत्रिकासात/बारा उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्चाचा यात समावेश आहे.  

 

विमा कवच

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिकुटुंब 1 लाख 50 हजारापर्यंत विमा संरक्षण मिळते. मुत्रपिड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाख रूपये आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रतिकुटुंब 5 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जाते.  

 

कोविड-19 चा समावेश

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 वरील उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरूपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलात आली आहे. कोविड-19 रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक भार पडू नये तसेच कोविड-19 महामारीच्या संकटात नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी म्युकरमोकोसिस आजारांचा यात समावेश करण्यात आला आहे.

 

 

शस्त्रक्रियेचा समावेश

महात्मा जोतिराव फुले या योजनेतंर्गत सर्वसाधारण शस्त्रक्रियाकान, नाक घसा शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रियापोट व जठर शस्त्रक्रियाकार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया, मज्जातंतूविकृती शास्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडिओथेरपी कर्करोगत्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभाल, जनरल मेडिसिन, संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, न्युरोलॉजी, पल्मोनोलॉजी, चर्मरोग चिकित्सा, रूमेटोलॉजी, इंडोक्रायनोलॉजी, मेडिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, इंटरव्हेन्शनल रेडीओलॉजी या शस्त्रक्रियेचा यात समावेश करण्यात आला आहे.

 

जनआरोग्य योजनेचा 6 हजार 978 शेतकरी कुटुंबांनी घेतला लाभ

या योजनेचा 6 हजार 978 शेतकरी कुटुंबांनी लाभ घेतला आहे. या योजनेतून 14 हजार 360 विविध शस्त्रक्रिया व उपचार शेतकऱ्यांवर करण्यात आले.  

 

16 तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यात अर्धापुर 694, भोकर 643, बिलोली 786, देगलूर 828, धर्माबाद 324,  हदगाव 1 हजार 517हिमायतनगर 502कंधार 1 हजार 212किनवट 855लोहा 1 हजार 386माहुर 518 , मुदखेड 681मुखेड 1 हजार 169नायगाव 910, नांदेड 4 हजार 68, उमरी 553 अशा एकुण 16 हजार 646 रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यापैकी 33 हजार 672 शस्त्रक्रिया या योजनेतून करण्यात आल्या आहेत.

 

सर्वाधिक उपचार या आजारांवर करण्यात आले

कार्डियो थोरेसिक सर्जरी 131, कार्डियोलॉजी 2 हजार 183, अतिदक्षता विभागात 434, कान-नाक-घशावर जटिल शल्यक्रियामध्ये 269, एंडोक्राइनोलॉजी 116,जनरल मेडिसिन 274, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट 105जनरल सर्जरी 863,  स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र 328, नेफरोलॉजि 1 हजार 155, बालरोगशास्त्र 439, पल्मोनोलॉजिस्ट 2 हजार 408 असे एकुण 34 हजार 654 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यापैकी 36 हजार 328 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे ही महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही लाभार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.    

 

श्वेता पोटुडे-राऊत

माहिती अधिकारी नांदेड.


 नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत व्यक्ती व संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी पात्र संस्था किंवा व्यक्ती यांनी आपले अर्ज केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 31 जानेवारी 2022 पर्यंत योग्य त्या कागदपत्रांसह करायचे आहे. अर्ज हे ऑनलाईन स्विकारले जाणार आहेत. पात्र व इच्छुकांनी मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करूनच अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...