Wednesday, September 2, 2020

 

केळी पिकावरील फुलकिडे नियंत्रणासाठी

कृषि विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- अर्धापुर तालुक्यातील केळी पिक संरक्षणासाठी कृषि विभागातील केळी तज्ज्ञांनी विविध किड नियंत्रणासाठी खालील शिफारस केली आहे. केळी पिकांवरील फुलकिडे नियंत्रणासाठी केळीच्या घडावर व्हीर्टीसिलियम लेकॅनी तीन ग्रॅम लि. पाणी अधिक स्टीकर 1 मिलि व निंबोळी अर्क 5 टक्के स्टीकर 1 मिली फवारणी करावी. फुलकिडे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडल्यावर त्यांना पॉलीथीनची पिशवी घालावी.केळीच्या पानावरील ठिपके नियंत्रणासाठी ठिपके आढल्यास तो भाग काढुन बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करावा. केळीचा प्लॉट स्वच्छ व तणविरहीत ठेवावा. पाण्याचा निचरा व्य्वस्थित करावा. पाणी साचणार नाही. याची काळजी घ्यावी व केळीपिक संरक्षणासाठी संदेश देवून आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी आवाहन केले आहे. 

किड नियंत्रक म्हणुन कृषि अधिकारी,खाजा लतीफोदीन, व किड सर्वेक्षक जी. पी .वाघोळे कृषि पर्यवेक्षक व मुदखेड तालुक्यासाठी किडनियंत्रक म्हणुन एस. एन. पुरी कृषि अधिकारी व किड सर्वेक्षक म्हणुन व्ही. आर. भुरके, टी. टी. हिलालपुरे कृषि पर्यवेक्षक हे किड रोगाचे सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पावर काम करीत आहेत.

0000

 

पंडीत दीनदयाल उपाध्याय

रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोनाच्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना तसेच स्थलांतरित परराज्य व जिल्हयातून परत आलेल्या मजुर कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने येत्या 9, 10,11 सप्टेंबर 2020 रोजी तीन दिवसांचे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे.

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज करावेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल, असेही रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

0000

 

आंतर जिल्हा वाहतुकीसाठी खाजगी प्रवासी बसेसला

प्रादेशिक परिवहन विभागाची मानके जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य शासनाने मिशन बिगेन अंतर्गत दिनांक 31.08.2020 रोजीच्या जारी केलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध दुर करण्यात आले असून आता काही अटी व शर्तीसह प्रवासास परवागी देण्यात आली आहे. या प्रवासासाठी आता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. या आदेशात नमूद केल्यानूसार प्रवासी वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांना अंमलात आणवयाची मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure i.e.SOP) बाबत सुचना पुढील प्रमाणे आहेत. खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हीड-19 महामारीच्या पार्शभुमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन सहआयुक्त अ. ना. भालचंद्र यांनी केले. 

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 20 (1) (x) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. तसेच कंत्राटी बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे.  बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसचे प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड-19 आजाराची प्राथमिक लक्षण दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. कंत्राटी बस (सिटींग) वाहनांमध्ये प्रवासी एका आड एक पध्दतीने आसनस्थ होतील अशाप्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थ वर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थ वर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल. चालकाने प्रवास दरम्यान जेवण/अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारिरीक अंतर (social distancing) पाळतील याची दक्षता घ्यावी.  प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये. त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सुचना द्याव्यात. प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.

उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम, 1988, केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. केंद्र व राज्या शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून उपरोक्त सुचना/कार्यपध्दतीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल. सर्व खाजगी प्रवासी बस चालक, मालकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.                        

   000000

 

115 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

380 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 115 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 380 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 257 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 614 अहवालापैकी  1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 7 हजार 407 एवढी झाली असून यातील 4 हजार 777 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 67.14 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 337 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 249 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

सोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील हिंगोली गेट नांदेड येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे तर मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी मगनपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर पोलीस कॉलनी नांदेड येथे 53 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल, नांदेड येथे तर बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी तरोडा नांदेड येथे 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कासराळी बिलोली येथील 60 वर्षाच्या एक पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 243 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 23, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 8, मुखेड कोविड केअर सेंटर 26, हदगाव कोविड केअर सेंटर 14, माहूर कोविड केअर सेंटर 2, नायगांव कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 9, किनवट कोविड केअर सेंटर 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 1, बिलोली कोविड केअर सेंटर 12 असे 115 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 49, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 14, लोहा तालुक्यात 6, नायगाव तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 1, यवतमाळ 1, बीड 1, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर तालुक्यात 3, हदगाव 12, देगलूर तालुक्यात 15, मुखेड तालुक्यात 6, धर्माबाद तालुक्यात 1, हिंगोली 5, लातूर 1 असे एकुण 123 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र, 118, अर्धापूर तालुक्यात 16, भोकर तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 14, किनवट तालुक्यात 1, नायगाव 6, देगलूर तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 8, यवतमाळ 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 23, मुदखेड तालुक्यात 16, बिलोली तालुक्यात 14, लोहा तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 4, माहूर तालुक्यात 19, उमरी तालुक्यात 5, परभणी 1 असे  एकुण 257 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 337 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 233, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 968, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 83, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 43, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 81, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 62, लोहा कोविड केअर सेंटर येथे 112, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 14,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 35,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 90, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 17, मुदखेड कोविड केअर सेटर 37,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 32, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 27, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 62, उमरी कोविड केअर सेंटर 47, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 221 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 52 हजार 54,

घेतलेले स्वॅब- 49 हजार 936,

निगेटिव्ह स्वॅब- 40 हजार 488,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 380,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 407,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-17,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,

एकूण मृत्यू संख्या- 243,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 777,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 337,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 375, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 249. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

लॉकडाऊच्या कालावधीत अटी व शर्तीसह

30 सप्टेंबरपर्यंत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय योजनेच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍हयात बुधवार 30 सप्टेंबर पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार आदेश निर्गमीत केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयात 1 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्री पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश लागू राहतील.

 

राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाचे 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून हा लॉकडाऊन कालावधी  30 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत वाढविण्यात आला  आहे. कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील.

 

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्यांचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये  एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. नांदेड जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. परंतू प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल  सभागृह, घर  व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्न संबंधित समारंभाचे आयोजन तसेच या कार्यालयाने वेळोवेळी दिलेंले आदेश व अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक  राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन हजर राहणेस  परवानगी राहील. नांदेड जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1 हजार रुपये दंड आकाराण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा / तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

कामाच्या ठिकाणी पुढील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. शक्य असेल त्याठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे. कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. थर्मल स्कॅनिंग, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी  व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटतांना शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

कंटेनमेंट प्रतिबंधीत क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र हे Incident Commander  यांना ठरविल्‍याप्रमाणे पुर्वीच्‍या सुचनेप्रमाणेच राहतील. प्रतिबंधीत क्षेत्राबाबत केंद्र शासनाने  व राज्‍यशासनाने पुर्वी दिलेल्‍या सूचना जशास तसे लागू  राहतील.

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्टीटयुट हे 30 सप्‍टेंबर  2020 बंद पर्यंत राहतील. परंतू  ऑनलाईन / दुरस्‍थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृह, जलतरण तलाव, करमणूक, उदयाने, थिएटर, बार, सभागृह, असेंबली हॉल  यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. या आदेशापुर्वी सर्व अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे दुकाने आस्‍थापना यांना लागू करण्‍यात आलेले आदेश जशास तसे लागू राहतील.

 

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रातील पुढीलबाबींना 2 सप्टेंबर पासून परवानगी राहील. सर्व खाजगी आस्‍थापना, दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेमध्ये चालु रहातील. तर रविवार बंद राहतील. परंतू मेडीकल, औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत. सर्व हॉटेल व लॉजिंग यांना पूर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता (-पास) परवान्याची आवश्यकता नाही. दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. बाहय शारिरीक क्रियाकलाप (Outdoor Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही.

 

सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करणेस पुढीलप्रमाणे परवानगी राहील.  टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर  - फक्त अत्यावश्यक 1+ 3, रिक्षा  - फक्त अत्यावश्यक 1+ 2, चार चाकी-  फक्त अत्यावश्यक 1+3, दोन चाकी  1 +  1  मास्क व हेल्मेटसह प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

 

वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with comorbidities, गर्भवती महिला, दहा वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये मास्‍कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा.  मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 31/08/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. हा आदेश आज 1 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...