Tuesday, October 1, 2024

बातमी

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. १  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

0000



  वृत्त क्र. 889

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 1  ऑक्टोबर : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  गुरुवार 3 ऑक्टोबर 2024  रोजी पंचायत समिती सभागृह लोहा  पंचायत समिती सभागृह  कंधारपंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकु 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

या योजनेतून मोठया प्रमाणात स्वत:चा उद्योग उभारणी करुन त्यातंर्गत स्वयंरोजगार निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पूर्ती होण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या योजनेतर्गंत गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी लोहा, कंधार, मुखेड या तीन तालुक्यामध्ये मेळावे आयोजित केले आहेत. या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला,  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यावसायानुंषिक इतर परवाने  आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

 सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर दि.02, (विमाका) :-    छत्रपती संभाजीनगर विभागात सौर कृषी पंपाचे काम प्रगती पथावर असून विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या संदेशापैकी अद्यापपर्यंत ५ हजार २१६ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विनोद सिरसाठ यांनी केले आहे. ऑनलाईन पोर्टलनुसार प्रथम येणाऱ्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत जोडणी नाही अशा शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत पी.एम.कुसुम योजना सप्टेंबर-2021 पासून सुरू करण्यात आली असून योजनेचे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. योजना सप्टेंबर-2021 पासून पुढील पाच वर्ष राबविण्यात येत असून दरवर्षी 1 लक्ष या प्रमाणे 31 मार्च, 2027 पर्यंत 5 लक्ष सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. यासाठी केंद्र शासनामार्फत 30% तर राज्य शासनामार्फत सर्वसाधारण गटासाठी 60% व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 65% इतके अनुदान उपलब्ध असून सर्वसाधारण गटासाठी 10% व अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांसाठी 5% लाभार्थी हिस्सा निश्चित केलेला आहे. शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. 

          छत्रपती संभाजीनगर महाऊर्जा विभागीय कार्यालया अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या जिल्हयाचा समावेश आहे. या विभागाचे उद्दिष्ट सन सप्टेंबर-२०२१ ते २०२४-२५ पर्यंत ग्रामीण लोकसंख्यानूसार २८ हजार ५३९ इतके आहे. आजपर्यंत २४ हजार २६० सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले असुन १७ हजार ९४५ सौर कृषी पंपाचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अव्वलस्थानी आहे. तसेच या कार्यालयामार्फत योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या संदेशापैकी अद्यापपर्यंत ५ हजार २१६ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. त्यामुळे त्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलनुसार प्रथम येणाऱ्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. 

            वितरीत करण्यात आलेल्या सौर कृषी पंपामुळे विभागातील 1 लाख 25 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत आणखी 80 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे नियोजन आहे. विभागात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महावितरणमार्फत "मागेल त्याला सौर पंप" या धर्तीवर योजना सुरु करण्यात आली असुन महावितरणमार्फत सौर कृषी पंप योजना सुरु केले आहे. या योजने पासुन शेतकरी वंचित राहु नये यासाठी महावितरण व महाऊर्जा कटिबध्द आहे. अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी व अंमलबजावणीसाठी काही काळ लागणार आहे, शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक श्री सिरसाठ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

*****

 वृत्त क्र. 888 

 वृत्त क्र. 887

 

लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग  

 

·        7 ऑक्टोबरला नवामोंढा येथे हजारो महिलांची उपस्थिती राहणार

·        नांदेड मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

·        जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाची तयारी सुरु

 

नांदेड दि. 1 ऑक्टोबर : सोमवार 7 ऑक्टोबरला राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळावा नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री तथा अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील अन्य मेळाव्यांपेक्षा वेगळा मेळावा व्हावा, यादृष्टिने प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.

 

यासाठी विविध समित्यांची नेमणूक आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली असून त्यासंदर्भातील आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या समित्यांच्या बैठका विभाग प्रमुखांनी आज पूर्ण केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आज या समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी तसेच तालुकास्तरावरील यंत्रणेलाही या मेळाव्याच्या आयोजनातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरूवार 3 ऑक्टोंबरला यासंदर्भातील सर्व आढावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत घेणार आहेत.

 

हा मेळावा यशस्वी करतांना जिल्ह्यातील कोणताही लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन सुरू आहे. काही प्रातिनिधिक लाभार्थी थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे.  

 

नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

 

जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

00000



 वृत्त क्र. 886 

ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर

मग कायदा आपले कर्तव्य बजावेल -         दलजित कौर जज

 

·  नांदेडमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

 

नांदेड दि. 1 ऑक्टोबर :- आपल्या संस्कृतीमध्ये पालन पोषन करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांची, पालकांची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांची, आप्तस्वकियांची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे. पिढ्यांपिढ्या आपण हे कर्तव्य पंरपरेनुसार पार पाडत आलो आहे. मात्र यापासून दूर जाणाऱ्या मुलांनी कायद्याच्या बडग्याने त्यांना सरळ केले जाईल याचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना जिल्हा न्यायालय नांदेडच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दलजित कौर जज यांनी आज येथे केली.

 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र ज्येष्‍ठ नागरिक महासंघ (फेसकॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज बोलत होत्या. कायदा व त्याची अंमलबजावणी ही आपली पंरपरा व संस्कार विसरलेल्या मुलांसाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी व्यासपिठावर निर्मला कोरे, अशोक तेरकर, डॉ. हंसराज वैद्य, अशोक गोडबोले, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्रीमती जज यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरणामार्फत ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होत असल्यास कायदेशीर मदत करण्यात येईल, असे त्यांनी वेगवेगळ्या कायद्यांची माहिती सांगून विशद केले. केवळ मुलगाच नव्हे तर नातवांची देखील आजी-आजोबा व ज्येष्ठांची काळजी करणे जबाबदारी आहे. शासनाने अशा परिस्थितीत भरण-पोषणाची योजना म्हणून श्रावणबाळ योजना लागू केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लक्षात घ्यावे की, ज्येष्ठांसोबत स्थानिक न्यायालय प्राधिकरण, पोलीस आणि त्यांचे दायित्व घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी यांना कायद्याने अधिकार दिले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे कोणी विसरू नये. यावेळी ज्येष्ठांशी संवाद साधतांना त्यांनी वय कितीही वाढले तरी आपल्या मनातील बालपणाचा उत्साह कमी होऊ देवू नका. तुम्ही समाजाला भरपूर दिले आहे, त्यामुळे स्वत:साठी जगण्याकडे भर द्या, असे आवाहन केले.

 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबोधित करतांना ज्येष्ठांशी कसे वागावे हे आमचे मूल्य शिक्षण आहे. त्यामुळे आपल्या देशात ज्येष्ठांची काळजी तुलनेने खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते. आगामी काळात भारतामध्ये ज्येष्ठांची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे जे दवाखान्यात कोणाला जावे वाटत नाही तसेच यापुढे देखील वृद्धाश्रमात कोणाला जावे लागणार नाही, असे समाज मन तयार होणे आवश्यक आहे. मात्र जसे दवाखाने आवश्यक आहेत तसेच वृद्धाश्रमही आवश्यक आहेत. मात्र तिथे जाण्याची वेळ कोणार येऊ नये, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले. याप्रसंगी निर्मला कोरे, अशोक तेरकर, डॉ. हंसराज वैद्य, अशोक गोडबोले यांनीही आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, सद्यस्थिती आणि शासन-प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षांवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बापू दासरी यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गायके यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती लावली होती.

 

बॉक्स

या कार्यक्रमामध्ये प्रशासनाने ज्येष्ठांसंदर्भात आलेल्या तक्रारीवरून खालील सूचना केल्या आहेत.

· बँकेमध्ये कोणत्याही ज्येष्ठांना ताटकळत उभे रहावे लागणार नाही याची जबाबदारी व्यवस्थापकांनी घ्यावे.

·  एसटीमध्ये व खाजगी बसमध्ये ज्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी राखीव जागा आहेत त्या जागा त्यांनाच मिळाल्या पाहिजे यासाठी वाहकांने काळजी घ्यावी.

·  पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रथम ज्येष्ठांच्या तक्रारींना ऐकून घेतले जावे. ठाणेदारांनी तशी सर्वांना सूचना करावी.

00000





















महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...