Wednesday, October 19, 2022

वृत्त 

विदेशातून आयात केलेले फटाके विक्रीस प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची  साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्यात आले आहे.  संबंधित यंत्रणांनी सतर्क राहुन योग्य ती तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधीता विरूध्द त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल. सर्व फटाका आस्थापनांनी सर्व समावेशक तपासणी करून सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्यामार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. अनधिकृत फटाक्यांचे  दु्ष्परिणाम या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड उपविभागीय दंडाधिकारी सर्व, कार्यकारी दंडाधिकारी सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांनी त्यांच्या  कार्यक्षेत्रात पत्रकार परिषदा आयोजित करून सर्वाना मार्गदर्शन करावे व सदर कार्यात लोकसहभाग वाढविण्याकरिता जनजागृती करावी असेही स्पष्ट केले आहे. 

सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांनी किरकोळ फटाके विक्री करण्याचे परवाने मंजूर करताना विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक विक्रीस प्रतिबंध करण्याकरिता मा सर्वेच्च न्यायलयाने रिट याचिका सिव्हिल क्रमांक 728/2015 मध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 व दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचना सर्व परवानाधारक यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व याबाबत स्थानिक पातळीवर जाहिर प्रसिध्दी देण्याचे निर्देश आहे. विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांच्या साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैद्य आणि दंडनिय अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. 

आगामी दिपावली सणाच्या कालावधीत आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड  उपविभागीय दंडाधिकारी सर्व कार्यकारी दंडाधिकारी सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील भरारी पथकाची नियुक्ती करावी. या पथकाने विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री, व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी. तसचे संदर्भ क्र .02 वर नमूद मा. राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय, नवी दिल्ली यांचेकडील मूळ अर्ज क्र.249/2022 दिनांक 9 नोव्हेंबर 2020 मध्ये दिलेल्या निर्देशनानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड नगरपालिका/नगरपंचायत/ नगरपंचायत क्षेत्रातील दिपावली कालावधीत फटाके वाजविण्याची वेळ सकाळी 6 ते 8 दोन तास रात्री 8 ते 10 दोन तास असेल याबाबतची काटेकोरपणे तपासणी पोलिस विभागाने व संबंधित महानगरपालिका व व नगरपालिका/ नगरपंचायत यांनी करावी असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

000000

पानभोसीच्या ऊसतोड मजूर परिवाराचे जिल्हाधिकारी राऊत यांनी भेट घेऊन केले सांत्वन   

नांदेड (जिमाका) दि. 19 :- लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ठार झालेल्या पानभोसी येथील ऊसतोड मजुराच्या परिवाराची आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, कंधारचे तहसिलदार मुंढे व इतर अधिकारी उपस्थित होते. कंधार तालुक्यातील पानभोसीचे माधव पिराजी डुबुकवाड हे धावरी येथे ऊसतोडीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत असलेले पोचीराम गायकवाड, त्यांची मुलगी रुपाली हे दोघे जागीच ठार झाले होते. माधव डुबूकवाड यांची मुलगी पुजा गंभीररित्या भाजली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

डुबुकवाड यांच्या परिवारातील सदस्यांशी जिल्हाधिकारी अभिजित राऊत प्रत्यक्ष भेटून धीर दिला. शासकिय नियमाप्रमाणे जी मदत आहे ती तात्काळ देण्याची प्रक्रिया सुरू असून इतरही जी काही मदत करता येईल ती आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी मयताच्या कुटुंबाला मदत देण्याच्यादृष्टिने तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.  

पानभोसी येथील मृत परिवाराच्या सांत्वनानंतर त्यांनी ईमानवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. कै. संभाजी विठ्ठल जिंके यांच्या वारस कविता संभाजी जिंके यांना शासकीय योजनेचा लाभ पोहचविण्यात आला असून संजय गांधी योजनेचाही लाभ त्यांना सुरू करण्यात आलेला आहे. इतर शासकीय शासकिय योजनाही देऊन उभारी कार्यक्रमाअंतर्गत योग्य ती मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिंके परिवारातील सदस्यांना सांगितले.

00000 





 पशुपालकांनी गोवंशीय गाभण जनावरे व वासरांचे लसीकरण करुन घ्यावे

- पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम.आर. रत्नपारखी

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनात जिल्ह्यात अधिनस्त संस्थाना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण 5 लाख 9 हजार 950 लसमात्रा वाटप करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 14 हजार 121 लसीकरण पूर्ण झालेले आहे. पशुपालकांनी गोवंशीय सशक्त गाभण जनावरांना तसेच वासरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करुन घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम.आर. रत्नपारखी यांनी केले आहे.
पशुपालकांमध्ये जनजागृतीचे कार्य पशुसवंर्धन विभागामार्फत युध्दस्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. प्राण्यांमध्ये संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये महाराष्ट्र राज्य हे नियंत्रितक्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या व्हर्जन-3.0 दिनांक 26/9/2022 च्या मार्गदर्शक सुचनामधील मुद्दा 11 नुसार सशक्त गाभण गाईना लसीकरण करुन घेण्यात यावे. तसेच मुद्दा क्र. 7 प्रमाणे वासरामध्ये लसीकरण करताना, ज्या जनावरांना वासराचा जन्म होण्यापुर्वी लसीकरण केलेले आहे त्याच्या वासरांना लसीकरण करण्याची गरज नाही. परंतु ज्या जनावरांना वासरु जन्मा पुर्वी लसीकरण करण्यात आलेले नाही त्यांच्या वासरांना ती कोणत्याही वयाची असली तरी त्यांचे लसीकरण करुन घेण्यात यावे, असेही पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
0000

 रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 19:- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये 15 नोव्हेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7,7() वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिकेचारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहेत्यांनी आपले नमुना नंबर 7,7,() चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 31 ऑक्टोबर 2022 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीतअसे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.


हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक


रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 31 ऑक्टोबर 2022 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. यासाठी कोरे पाणी मागणी अर्ज शाखेत विनामुल्य उपलब्ध आहेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस कार्यालय जबाबदार असणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. शासन निर्णयात नमूद दरानुसार सन 2022-23 साठीचे पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरणे आवश्यक आहे. शेतचारा स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेन करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

0000

 

 आयकर मर्यादेपेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणाऱ्या

निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करावी 


नांदेड (जिमाका) दि. 19 :- येथील कोषागारामार्फत सेवानिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी  ज्यांचे सन 2022-23 एकत्रित निवृत्ती वेतन 5 लाख 50 हजार व त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी आपला आयकर सुट मिळण्यासाठी पात्र बचतीचा तपशील रविवार 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्जासोबत पुराव्यासह कोषागारात सादर करावा, अन्यथा नियमाप्रामणे आयकर कपात करण्यात येईल. 

आयकर वसुलीचे नवीन नियम सेक्शन- 115 बीएसी नुसार  नवीन कर व्यवस्था (New Tax Regime  ) व जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime) असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. यापैकी आपणास जो पर्याय आयकर कपातीसाठी निवडावयाचा आहे. त्याची माहिती  20 नोव्हेंबर  2022 पूर्वी कळविण्यात यावी अन्यथा जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime)  हा विकल्प आपण स्विकारल्याचे गृहीत धरुन नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करु नयेअसे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...