Tuesday, April 14, 2020


जिल्हयात फौजदारी प्रक्रिया दंडसंहितेचे
कलम 144 ची मुदत 30 एप्रिलपर्यंत
नांदेड, दि. 14 :- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया दंडसंहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हयात मनाई आदेश 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपासुन ते 30 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्हयात संपुर्ण नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात या कार्यालयाने यापुर्वी काढलेले प्रतिबंधात्मक आदेश व अत्यावश्यक सेवा, शेतीविषयक तसेच वेळोवेळी दिलेल्या इतर बाबींसाठीची सुट जशास तशी अंमलात राहील, असे आदेश निर्गमीत केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोणातुन करावी. त्याचप्रमाणे या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यतक्ती, संस्थान अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यांसाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्द व कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 13 एप्रिल रोजी जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमित करण्यातत आला आहे.
शासनाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपायोजनेचा एक भाग म्हणुन मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील 13 एप्रिल 2020 अन्वये यापुर्वी दिलेले सर्व प्रकारचे आदेश, परिपत्रक, निर्देश 30 एप्रिल 2020 पर्यंत लागु राहतील असे अधिसूचित केले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000000


जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मास्क,
रुमालाचा वापर करणे बंधनकारक
नांदेड दि. 14 :- साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोव्हिड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड जिल्ह्यातील अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांना Three Layar mask, Simple mask, Homemade cotton mask, हात रुमाल इत्यादीचा वापर तोंड व नाक व्यवस्थितरीत्या झाकले जाईल अशारितीने करणे बंधनकारक राहील, असेही आदेशित केले आहे. जे कोणी व्यक्ती, समुह याआदेशाचे उल्लंघन करील त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यप्रणालीमुळे
पर्यावरणाची मोठी हानी टळली
नांदेड दि. 14 :- कोरोना साथरोग नियंत्रण कामात व्यस्त असतानाही जिल्ह्यातील हदगाव व तामसा या हद्दीतील जंगलाला लागलेली आग जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी व  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या  तत्परतेने तात्काळ नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेत या आगीने  मोठे तांडव केले असते व मोठी राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जंगलातील झाडांचे घर्षण व वातावरणातील उष्णता  यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढणार आहेत. जिल्ह्यातील हदगाव वनपरिक्षेत्र  व तामसा या हद्दीतील  कॅम्प नंबर 347 (A) येवली गावाजवळील  जंगल क्षेत्रात दि. 13 रोजी दुपारी  आग लागली होती. पाहता-पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते.  हा प्रकार नांदेड येथील आकाशवाणीचे पत्रकार आनंद कल्याणकर यांना त्यांच्या मित्राकडून कळला. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया कक्षात डॉ. दीपक शिंदे यांना हा प्रकार सांगितला व लवकर उपाय झाले तर बरे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शिंदे यांनी हा प्रकार  तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या लक्षात आणून दिला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या साथ रोगाच्या नियंत्रणाच्या कामाच्या बैठका
माहितीचे संकलन अशा विविध कामात व्यस्त असतानाही
  डॉ. खल्लाळ यांनी आगीवर नियंत्रण आले नाही तर त्या परिसरातील अनेक झाडे जळून गेली असती व राष्ट्रीय संपत्ती नष्ट झाली असती. सोबतच जंगलातील प्राणी, पशू-पक्षी यांची ही मोठ्या प्रमाणात हानी झाली असती याबाबींचे गांभीर्य ओळखून डॉ. खल्लाळ यांनी वन अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर तसेच इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना करता येतील हे कळवा असे स्पष्ट आदेश दिले.
सोबतच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी  घटनास्थळी धाव घेतली. वन विभागातील शरयू रुद्रावार, वनपाल खूरसाळे व त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांची यंत्रणा वापरत या आगीवर दोन ते तीन तासात नियंत्रण मिळवले. जागरुक पत्रकार, तत्पर अधिकारी व झटपट निर्णय यामुळे हे शक्य झाले व जिल्ह्यातील एका वनाचे  व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण झाले.
000000


प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
जयंतीदिनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे अभिवादन
नांदेड, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकूळे, तहसिलदार संजय बिराजदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेची काळजी घेऊन हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
000000


कोरोना मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे    
-         पालकमंत्री अशोक चव्हाण  
नांदेड दि. 14 :- कोरोना मुक्त नांदेड जिल्हा व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  दिले.  
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जिल्हा सिमेवर बिलोली तालुक्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुविधा युक्त चेक पोस्ट उभारण्यात आलेला आहे. याचा उपयोग कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आरोग्य तपासणीसह इतर अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणता येईल. कोरोना संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घेऊन पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्यक सेवेतील दुरुस्तीची कामे शासनाच्या निर्देशानुसार वेळेत पूर्ण करावी.
कोव्हीड 19 पार्श्वभुमीवर वैद्यकीय उपचारासाठी सेवावर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा मुळ ठिकाणी घ्यावी. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे बंधनकारक राहील. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी साधनसामुग्री, मनुष्यबळासह रुग्णालय अद्यावत ठेवावीत, आदी सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.  लॉकडाऊन काळात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना परत त्यांच्या घरी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यात अडकेलेल्या नागरिकांना परत नांदेड येथे त्यांच्या घरी आणण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची माहिती घेतली.
यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी ॲड सुरेंद्र घोडजकर यांनी 20 हजार रुपये तर महेश मगर यांनी 11 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
000000

*कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती* 
दि: १४ एप्रिल २०२० सायं. ५ .०० पर्यंत

▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 0
▪️आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - ४९५
▪️क्वारंटाईन कालावधी पूर्ण - १२७
▪️अजून निरीक्षणाखाली असलेले - ३९
▪️पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -१
▪️घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ४९५
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले- १५
▪️एकुण नमुने तपासणी- २३२
▪️पैकी निगेटीव्ह - २०७
▪️नमुने तपासणी अहवाल बाकी- २०

नाकारण्यात आलेले नमुने - ५


▪️जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७२९०८ असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

आरोग्य विभाग, नांदेड मार्फत

विशेष लेख :
कृषी विभागाच्या समनव्यातून
भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
           
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील फळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे व हे काम  अव्याहतपणे कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
          जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा श्री रविशंकर चलवदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसंचालक आत्मा श्री एम.के. सोनटक्के, तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी, आत्म्याचे श्रीहरी बिरादार यांच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमगट स्थापन केला आहे.
            जिल्ह्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रीतसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे,क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा,नगरपालिका, महानगरपालिका  या जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात या माध्यमातून दररोज 90 ते 100 क्विंटल भाजीपाला तर 150 क्विंटल टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत असून संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे .
            नांदेड जिल्ह्यातील  हदगाव बिलोली भोकर कंधार नायगाव देगलूर नांदेड माहूर किनवट लोहा मुखेड मुदखेड यासह सर्वच तालुक्यात भाजीपाला व फळांची विक्री होत आहे. 
            कंधार तालुक्यातील भाजीपाला, टरबूज इत्यादी फळांची जिल्ह्यात तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येत असून लवकरच रितसर परवानगी घेऊन परराज्यात विक्री करण्यात येणार आहे.
            बिलोली तालुक्यातील टरबूज विक्री स्थानिक बाजारपेठेसह अकोला जिल्ह्यातही करण्यात आली आहे. 
             हदगाव येथेही  स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणी मागणीप्रमाणे  भाजीपाला व फळांची विक्री होत असून नांदेड तालुक्यात  गुरुद्वारात लंगरसह  सोसायटीमध्ये भाजीपाला व इतर फळे विक्री करण्यात येत आहेत देगलूर भोकर तालुक्यातही गरजेप्रमाणे भाजीपाला फळे विक्री करण्यात येत असून याकामी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत.
      तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गावस्तरावर कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक ,आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक  व कृषी मित्र या सगळ्यांच्या सहकार्याने ही साखळी तयार केली असून सोशल डिस्टंसिंग ,मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह संपूर्ण काळजी घेत  येत्या काळात कुठल्याही प्रकारचा भाजीपाला व फळे कमी पडणार नाहीत आणि त्याचप्रमाणे भाजीपाला आणि फळांची विक्री शेतकरी ग्राहक थेट  होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.     

-         रविशंकर चलवदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड
*******


राज्यावरील कोरोना संकटाच्या प्रभावी मुकाबल्यासाठी
उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमितीची बैठक संपन्न  
·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दिल्या उपयुक्त सुचना
       
नांदेड, दि. 14 :- राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला हरविणे, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात जणांच्या मंत्री गटाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.  
ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे बैठक मुंबई येथे आज घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभाग घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.  
यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोव्हीड-19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन विविध विभागाच्यावतीने अनेक उपाययोजना करत आहे. राज्य शासनाकडून लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येत आहे. परंतू उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कामागारांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी आहे तेथील अत्यावश्यक सेवेसह काही उद्योग सामाजिक अंतर ठेवून सुरु करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणुचा प्रसार होणार नाही याबाबत जिल्हा सीमेवरील बंदी कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. रुग्ण तपासणीसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व्हेंटिलेटर, पीपीई कीट आदी उपकरणे उपलब्ध करुन देणे, कोरोना निर्बंधाचे पालन करुन रेस्टॉरंट, हॉटेलसारख्या सेवा सुरु करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.    
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणा युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्याचे कामही ही समिती करणार आहे. राज्यात 24 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरही ही मंत्रिमंडळ समिती निर्णय घेईल, अशी माहिती देण्यात आली.

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी
अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन ; 30 एप्रिलपर्यंत अहवाल
कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सूचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीत जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस), सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस), रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस), उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस), जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस), सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने ही समिती उपाययोजना सूचवेल, अशी माहिती देण्यात आली.
0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...