Wednesday, May 23, 2018


उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात
विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन
नांदेड दि. 23 :-उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 22 ते 31 मे 2018 या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने मोफत करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सुरज सोनकांबळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये क्रीडा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामलू पारे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, प्रा. मनोज पैजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणार्थींना सकस आहार दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे हा मुख्य उद्देश आहे. गुरुवार 31 मे पर्यंत सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम परीसरातील शासकीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल येथे तेरा क्रीडा प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले जात आहे. हे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000



ग्रामपंचायत निवडणूक
मतदान-मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 23 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने रविवार 27 मे रोजी मतदान केंद्र परिसरात व सोमवार 28 मे रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या तसेच मतमोजणीच्या दिवशी संबंधीत तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
हा आदेश मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 27 मे रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 28 मे रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
00000


बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या संस्थांची तपासणी
अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 23 :- बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांना निवासी सेवा पुरविणाऱ्या शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांची तपासणी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 12 जून 2018 रोजी सायं 5.30 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय शास्त्रीनगर नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या अनुषंगाने विधी संघर्षग्रस्त बाल आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी कलम 2 (21) मध्ये नमुद व्याख्येनुसार व कलम 54 नुसार समितीत सदस्य पदासाठी अशासकीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. व्यक्ती पदवीधर असावा. तिला बाल हक्क, काळजी, संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच तिचं वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणुकीपासून तीन वर्षांचा राहील.
अर्ज करतांना पुर्ण नाव व पत्रव्यवहाराचा संपुर्ण पत्ता, दूरध्वनी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेचा पुरवा, चारित्र्य प्रमाणपत्र, या पृष्ठयर्थ आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच बाल हक्क, काळजी, संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभवाच्या अनुषंगाने कागदपत्रे, प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक बाबींचा उल्लेख करावा. विहित वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


विधानपरिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा  
 नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 
गुरुवार 24 मे 2018 रोजी यवतमाळ येथून सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व राखीव. सकाळी 7.45 वा. माहूरगड येथील रेणुका मातेचे दर्शन. सकाळी 8.15 वा. माहूरगड येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
0000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...