Friday, July 26, 2019


परिवहन संवर्गातील
वाहनधारकांना आवाहन
नांदेड, दि. 27 :-  मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार वाहनांवर एआयएस 089 एआयएस 090 या मानकांचे रिफ्लेक्टिंव्हटेप (Reflective Tape) रिअर मार्कीग प्लेट (Rear Marking Plate) परिवहन संवर्गातील वाहनांना बसविणे अनिवार्य केले आहे.
जिल्हयातील सर्व वाहन वितरक, चालक, मालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांना Reflective Tape Rear Marking Plate हे अधिकृत विक्रेत्याकडून लावून त्याचे प्रमाणपत्र विहित कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 24.36 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात  शनिवार 27 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 24.36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 389.81 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 218.55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23.03 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 32.00 (212.15), मुदखेड- 20.67 (269.34), अर्धापूर- 20.33 (214.31), भोकर- 35.50 (230.70), उमरी- 17.33 (240.11), कंधार- 22.67 (205.50), लोहा- 25.50 (178.37), किनवट- 30.29 (239.53), माहूर- 4.00 (257.09), हदगाव- 42.43 (202.56), हिमायतनगर- 65.00 (209.35), देगलूर- 3.00 (139.15), बिलोली- 22.80 (277.40), धर्माबाद- 21.00 (183.32), नायगाव- 20.00 (241.80), मुखेड- 7.29 (196.13). आज अखेर पावसाची सरासरी 218.55 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3496.81) मिलीमीटर आहे.
00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात 10 ऑगस्ट 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 जुलै 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 10 ऑगस्ट 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

यंत्रमागधारकांच्या व्याज सवलतीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ



नांदेड दि. 26 :- राज्यातील साध्या यंत्रमाग धारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात 5 टक्के सवलत अनुदान याजनेअंतर्गत सन 2017-18 या कालावधीसाठी ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करण्याची  30 जूलै,2019 पर्यंत असलेली अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. विभागातील सर्व साधेयंत्रमाग धारकांनी WWW.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर दिनांक 30 सप्टेंबर,2019 पुर्वी अर्ज करावेत, असे आवाहन औरंगाबादचे प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांनी केले आहे.
0000


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.38 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात  शुक्रवार 26 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 182.12 पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 194.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20.45 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 23 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 1.63 (180.15), मुदखेड- 6.67 (248.67), अर्धापूर- 12.33 (193.98), भोकर- 14.50 (195.20), उमरी- 12.33 (222.78), कंधार- 0.50 (182.83), लोहा- 3.33 (152.87), किनवट- 27.14 (209.24), माहूर- 16.50 (253.09), हदगाव- 24.86 (160.13), हिमायतनगर- 38.33 (144.35), देगलूर- 0.33 (136.15), बिलोली- 2.20 (254.60), धर्माबाद- 15.67 (162.32), नायगाव- 5.80 (221.80), मुखेड- निरंक (188.84). आज अखेर पावसाची सरासरी 194.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3107.00) मिलीमीटर आहे.
00000

जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा जिल्‍हाधिकारी डोंगरे यांनी घेतला आढावा



             नांदेड दि. 26 :- जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत घेण्‍यात आलेल्‍या सन 2017-18 व 2018-19 मधील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्‍हा व तालुकास्‍तरीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन भवन येथे आज घेतला. यावेळी जलयुक्‍त शिवार अभियानांची कामे पुढील एक महिन्‍याच्‍या आत पुर्ण करण्याचे निर्देश देण्‍यात आले.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सन 2017-18 पूर्वीची अपुर्ण कामे पुर्ण करावीत. मजूरांना मागणीनुसार कामे उपलब्‍ध करुन त्यांना वेळेवर मजूरी दयावी. मागेल त्‍याला शेततळे योजनेंतर्गत जिल्‍हयात मोठया प्रमाणात शेततळयांची कामे हाती घेण्‍याची व ती कामे विहीत वेळेत योग्‍य पध्‍दतीने पूर्ण करण्‍याची सुचना दिली.
यावेळी उपजिल्‍हाधिकारी रोहयो, उपवनसंरक्षक, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, अति. मुख्‍य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्‍हास्‍तरीय अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका व जिल्‍हास्‍तरीय अधिकारी उपस्थित होते.
00000

उत्कृष्ट नियोजनातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे - मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन


             
नांदेड दि. 26 :- जिल्ह्यात 33 कोटी वृक्षारोपण मोहिमेत सर्व विभागाने उत्कृष्ट नियोजन करुन दिलेले उद्दिष्ट 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करावे, असे निर्देश औरंगाबादचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी दिले.
            सन 2019 च्या पावसाळ्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत करावयाच्या 33 कोटी वृक्षारोपण कामांची आढावा बैठक श्री महाजन यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.   
यावेळी औरंगाबाद विभागाचे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक अशिष ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक श्री. महाजन म्हणाले या वृक्षारोपण मोहिमेत प्रामुख्याने ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयामार्फत तसेच पूनर्वसन झालेल्या गावातील जुन्यागावात, नदी-नाल्यांचा काठावर, राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करावे. महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकेद्वारे उत्कृष्ट नियोजन करुन शासनाने सर्व विभाग प्रमुखांना दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. वनविभागाचा 1926 हा नंबर नि:शुल्क असून त्यावर माहिती घेण्याबरोबर आपणास माहिती देता येते.
अप्पर आयुक्त श्री. टाकसाळे यांनी वृक्षारोपण करणे ही जबाबदारी वन विभागाचीच नसून शासनाच्या सर्व विभागाची व जनतेची आहे. उद्दिष्ट समजून काम न करता स्वत:चे कर्तव्य व येणाऱ्या पिढीसाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. जिल्ह्यात जमीन चांगली असून पशु, झाडे जगविणे आपले कर्तव्य आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी समजून वृक्षारोपण करुन संगोपन करावे. कार्यालय परिसरातील वृक्षाचे संगोपण व वृक्षांना पाणी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदारी देऊन ती झाडे वाचवावी. यातून कार्यालयाचा परिसर सुशोभनीय ठेवावा, असे सांगितले.  
उपवनसंरक्षक अशिष ठाकरे म्हणाले, या वृक्षारोपन मोहिमेत वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे वृक्षारोपण करण्यासाठी सर्व विभागांना सहकार्य करणार आहेत. वन विभागाच्या Maha Forest पोर्टलवर माहिती उपलब्ध असून त्या पोर्टलवर वनविभाग ऑनलाईन नोंदणी करणार आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारचे निसर्गाला अनुकूल असणारे रोपे असून यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन वृक्षांची जोपासणा करावी. नांदेड शहर व जिल्ह्यात तसेच विद्यापीठ स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्यामार्फत वृक्षारोपण व संगोपन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात तसेच शहरात रानमळा योजना राबवून जन्म झालेल्या मुलींच्या नावे 10 झाडे तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावावीत. घरातील विविध प्रसंगाच्या वेळी वृक्षभेट देऊन त्याचे संगोपन करावे. आई-वडिलांची आठवण म्हणून वृक्ष लावावे व त्याचे संगोपन केल्यास गाव वनराई होईल. माय प्लॅन्ट ॲपवर स्वयंसेवी संस्था व नागरिकांना वृक्षारोपण केलेले स्थळ छायाचित्र व रेखांशसह छायाचित्र डाऊनलोड करता  येईल व आपणासाठी या मोहिमेत सहभाग नोंदविता येईल, अशी माहिती दिली.  
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे वृक्षलागवड सेलचे वनविभागाचे अधिकारी रामचंद्र दावलवार यांनी पाणी व पाऊस कमी असल्यास वृक्ष लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षि‍क दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.   
बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, विविध विभागाचे विभागीय अधिकारी, वनविभाग व सामाजिक वनिकरणाचे वनक्षेत्रपाल आदी उपस्थित होते.
000000

कारगिल विजय दिनानिमित्त शहिद परिवारांचा सत्कार
उरी द सर्जीकल स्ट्राईक चित्रपटाच्या मोफत प्रेक्षपणाचे उद्घाटन
नांदेड दि. 26 :- जिल्हयात "उरी द सर्जीकल स्ट्राईक" या चित्रपटाच्या मोफत प्रेक्षपनाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ज्योती चित्रपटगृहात आज करण्यात आले.  
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वा संपुर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात "उरी द सर्जीकल स्ट्राईक" या चित्रपटाचे प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्वल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्वींगत व्हावा यासाठी जिल्हयातील सर्व चित्रपटगृहात  चित्रपटाचे मोफत प्रेक्षपणाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित हा 20 व्या कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कारगिल युद्वातील शहिद जवानांना बिगुलरच्या ध्वनीत श्रद्वाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मेजर (नि) बी थापा व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हयातील 5 विरनारी, एक विरपिता, विरमाता, युद्व दिव्यांग माजी सैनिक व कारगिल युद्वात भाग घेतलेले माजी सैनिक, सर्व माजी सैनिक यांची उपस्थित होती. 
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार संपन्न झाल्याने  माजी सैनिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. माजी सैनिक संघटना अध्यक्ष  व्यंकट देशमुख व पुर्ननियुक्त माजी सैनिक कर्मचारी अध्यक्ष पठाण हयुन यांनी आभार मानले. तसेच सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील हंगरगेकर व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.  ज्योती चित्रपटगृहाचे व्यवस्थापक दिपक बिकाने व कर्मचारी यांनी चित्रपट प्रेक्षपणाचे योग्य नियोजन करुन मुलांना व्यवस्थित चित्रपटगृहात बसविण्यासाठी मदत केली. चित्रपटगृहात वेळेत प्रवेश मिळण्यासाठी योग्य नियोजन जिल्हा प्रशासनाच्या करमणुक शाखेच्यावतीने करण्यात आले होते.       
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व करमणुक शाखा यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे, सुभे तुकाराम मसीदवार, सुर्यकांत कदम, गायकवाड तसेच करमणुक शाखा प्रमुख  श्रीमती उषा इज्जपवार व  डी. एम. जाधव यांनी प्रयत्न केले.
000000


आदर्श ग्राम निर्मितीची संकल्पना ही
एक लोकचळवळ झाली पाहिजे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावाच्या सर्वोत्तम विकासाबरोबर  नागरिकांशी संवाद साधून आदर्श ग्राम निर्मितीची संकल्पना ही एक लोकचळवळ उभी राहिली पाहिजे,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीचा विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली यांनी गुरुवार 25 जुलै रोजी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषेदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोळगणे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, माविमचे चंदनसिंग राठोड, अभियानाचे व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, सहा अभियान व्यवस्थापक प्रतिक आचरे, जिल्हा व्यवस्थापक दिनेश मराठे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपरिवर्तक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानात समाविष्ट जिल्ह्यातील गावातील विकास कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे. गावातील मुलभुत सुविधांबरोबर आवश्यक विकास कामांना यात प्राधान्य राहिले पाहिजे. नागरिकांशी संवाद हा महत्वाचा असून आदर्श गावासाठी स्थानिक नागरिकांची महत्वाची भुमिका आहे. त्यांच्यातील उत्तम कलागुणांची माध्यमातून गावात चांगले परिवर्तन करण्यास मदत होईल. नागरिकांना विविध विभागाच्या योजनेची माहिती देऊन त्यांना त्याचा लाभ दयावा. त्यांची नैराश्यातून आत्महत्या होणार नाही यासाठी ग्रामस्तरावर प्रबोधनात्मक उपक्रम राबविली पाहिजे. यासोबतच गाव धूरमुक्त, हागणदारी मुक्त, घरकुल, पाण्यासाठी स्वयंपूर्ण असेल यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाची आहेत, असे निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले.
 यावेळी जिल्ह्यातील या अभियानांतर्गत समाविष्ट गावांत होत असलेल्या विविध योजनांचा प्रगतीचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या. आदर्श ग्राम निर्माणासाठी ग्रामपरिवर्तकासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध होऊन सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक अभियानाचे व्यवस्थापक दिलीप बयास यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक दिनेश मराठे यांनी मानले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आंदबोरी (ई), आंबाडी तांडा, गौरी, धामनधरी, दिगडी (मं), कनकवाडी, प्रधानसांगवी व वझरा बु. या आठ गावांच्या आणि लोहा तालुक्यांतर्गत वाळकेवाडी, टेळकी, हंगरगा व फुटकळवाडी या पाच गावांचा, कंधार तालुक्यातील हनमंतवाडी, रामनाईक तांडा, मोहिजा व हटक्याळ आणि हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा बु. पारवा बु. व टेंभी या तीन गावांचा याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील 26 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी 18 गावांमध्ये सध्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या ग्रामपरिवर्तंकांचे ग्रामपंचायतीअंतर्गत सादर केलेला 42 कोटी 1 लाख 46 हजार 845 रक्कमेच्या गाव विकास आराखडयांना मंजुरी देण्यात आली. या अभियांनातर्गत आदर्श ग्रामस्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतीचे मुल्यमापन करण्यासाठी 12 सदस्यांची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. तसेच 2017-18 2018-19 मध्ये विविध शासकीय विभागांमार्फत प्रलंबित कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेवुन पुर्तता करण्यासंदर्भात संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या.
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...