वेळेत निदान , वेळेत उपचार
यातूनच
कुष्ठरोगाची मुक्ती
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन
कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष
कुष्ठरोग शोध मोहिम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत राबविण्यात
येणार आहे. तसेच 6 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम ही
राबविण्यात येणार आहे. त्याविषयी या लेखात माहिती...
आपल्याकडे कुष्ठरोगाची
समस्या आजही दिसून येते. खरोखर कुष्ठरोग हा एक किरकोळ आजार आहे. तो मायबाक्टेरीयाम
लेप्री या जीवाणुमुळे होतो. कुष्ठरोग हा काही स्पर्शाने होणारा आजार नाही. या
रोगाचे निदान व उपचार सर्व सरकारी दवाखान्यात तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत केला
जातो. लवकर वेळेत निदान व उपचाराने कुष्ठरोग पुर्ण बरा होतो व पुढे निर्माण
होणाऱ्या शारीरिक विकृती पासून बचाव होतो. कुष्ठरोगाच्या तीव्रतेनुसार त्याचा
उपचार सहा महिने किंवा बारा महिने इतका आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात. त्वचेवर
फिक्कट किंवा लालसर रंगाचा एक किंवा एकापेक्षा जास्त चट्टे असतात. हा चट्टा बधीर व
कोरडा असतो. चट्टा न खाजणारा, न दुखणारा, न घाम येणारा असतो. शरीरावर, चेहऱ्यावर, भुवयावर
गाठी येतात किंवा चेहऱ्याची त्वचा तेलकट दिसते. हाता-पायांना कोरडेपणा, बधीरपणा
तसेच अशक्तपणा येतो. रुग्णाला याबाबी आढल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात
कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी. एमडीटी हे औषध कुष्ठरोगावर चांगले प्रभावशाली ( गुणकारी
) औषध आहे. सर्व सरकारी दवाखाने व आरोग्य केंद्रामध्ये हे औषध मोफत उपलब्ध करुन
दिले जाते.
स्पर्श
कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सोमवार 26
जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा,
कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती देण्यात आली. दळणवळणास कठीण दुर्गम अशा
जिल्ह्यात 404 गावामध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य
कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी
असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षात 1 हजार 187 एवढ्या रुग्णांनी
एमडीटी हा औषधौपचार घेवून कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. त्यामुळे कुष्ठरुग्णांना
भेदभावाची वागणूक देऊ नका. नागरिकांनी आपण, आपले शेजारी व इतर कोणालाही अशा
प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच
आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती
दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या-
46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील- 16 , किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी
तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकुण- 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017
या दरम्यान शहरी भागातील- 300 घरे व
गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार
आहे. म्हणून सर्वाना आग्रहाची विनंती आपण आपले
शेजारी व इतर कोणालाही अशा प्रकारचे चट्टे किंवा डाग असतील तर त्यांनी तातडीने
वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व उपचारांनी कुष्ठरोग मुक्त व्हावे.
संकलन – काशिनाथ र. आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
*******