Friday, April 10, 2020


 कोरोना विषाणू संसर्गाबाबत
नांदेड जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती
            नांदेड दि. 10 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून ही जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 482 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 110 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 49 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 7 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 426 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 17 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 192 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 145 नमुने निगेटीव्ह आले असून 42 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 70 हजार 624 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
000000


अत्यावश्यक स्वरुपातील कामे पूर्ण करण्यासाठी सुधारीत आदेश

नांदेड दि. 10 :- अत्यावश्यक स्वरुपांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांचे जिल्हा प्रमुख अधिकारी यांना सुधारीत आदेशाद्वारे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विविध निर्देश दिले आहेत.
या सुधारीत आदेशात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार दि. 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित केली आहे. आणि ज्या अर्थी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील अधिसुचना क्र. करोना 2020 / प्रक्र.58 / आरोग्य 5 दि. 14 मार्च 2020 मध्ये जिल्हाधिकारी यांना वरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
नांदेड जिल्ह्यात 31 मार्च 2020 पासून ते 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाच व त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा प्रतिबंधामधून वगळण्यात आली आहेत. सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पुढील कामे होणे गरजेचे आहे. जेणेकरुन अत्यावश्यक सेवा कोलमडणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटणकर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन 7 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन पुढीलप्रमाणे सुधारीत अत्यावश्यक स्वरुपाची कामे पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
सदरची कामे पुढील नमुद केल्याप्रमाणे राहतील. जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गाची, ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत रस्ते दुरस्ती करणे व पावसाळया पूर्वीची दुरुस्तीची कामे. जिल्हयातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण कामकाज, सांडपाणी व्यवस्था व पावसाळयापूर्वीची सर्व दुरुस्तीची कामे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील इलेक्ट्रीक पोल टाकणे व इलेक्ट्रीक मेंटनन्स, दुरस्ती इ. भारत संचार निगम लिमिटेड आणि इतर दुरसंचार कंपनीकडील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा संचालन, लाईन मेंटनन्स इ. खाजगी क्षेत्रातील संस्थांना एमटीएनएल आणि बीएसएनएलचे जिल्हा स्तरावरील अधिकारी यांनी लेखी आदेश दयावेत. पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण आणि स्वच्छता इत्यादी अनुषंगिक कामांचा यात समावेश आहे.
संबंधित विभागाचे जिल्हा प्रमुख अधिकारी यांना असेही निर्देश दिले आहेत की, त्यांनी वरील अत्यावश्यक सेवेसाठी नमुद अधिकारी, कर्मचारी आणि वाहने याकामी नेमणूक करुन त्याप्रमाणे आदेश आपले स्तरावर काढण्यात यावेत. या आदेशाची प्रत पोलीस विभागाकडे दयावी आणि सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना कामावर ये-जा करतांना आदेशाची प्रत आणि कार्यालयाचे ओळखपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दयाव्यात. तसेच या विभागांनी, संस्थांनी कोविड 19 या विषाणू संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. सामाजिक अंतराचे निर्देश पाळावेत आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. प्रस्तुत आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग प्रतिबंध कायदा तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 व इतर अनुषंगिक कायदानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदरचे आदेशास तात्काळ अंमल देण्यात यावा, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...