Monday, October 20, 2025
२० ऑक्टोबर 2025
२० ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1117
20 व 21 ऑक्टोबर या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी
नांदेड, दि. २० ऑक्टोबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या गोष्टी करा :
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
0000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1116
नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाइनतर्फे अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक बियाणे वाटप
इतर अशासकीय संस्थांनीही मदतीचा हात पुढे करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 19 ऑक्टोबर:- जिल्ह्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशन संस्थेने कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे 600 व ज्वारी पिकाचे 160 क्विंटल बियाणे मोफत उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इतर शासकीय संस्थानीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक कुंपलवार, समन्वयक दत्तात्रय गरजे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गीते (देगलूर), श्री. शिरफुले (नांदेड), तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि नांदेड व अर्धापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 86 टक्के क्षेत्र सोयाबीन व कपाशी पिकाखाली असून ही पिके नैसर्गिक आपत्तीला अधिक बळी पडणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग, ऊस, रेशीमशेती आदी अतिवृष्टीला प्रतिकारक पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी पुढील कालावधीत जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, विहीर पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी आदी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीकाठांवर बांबू लागवड करून पुर नियंत्रणाचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी. तसेच अशासकीय संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांद्वारे मदतीचा हात द्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशनने साधारणतः 95 लाख रुपये किमतीचे हरभरा पिकाचे बियाणे नांदेड जिल्ह्यास पुरवठा केले असून ते गाव पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीने बाधित 6 हजार शेतकऱ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात सांगितले.
शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा यांनी सांगितले की, संस्थेमार्फत निविष्ठा स्वरूपात मदत तर केली जातेच, तसेच मानसिक पाठबळही दिले जाते. नैराश्य वा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनच्या 8955771115 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशन राजाभाऊ शेळके यांनी सांगितले की, संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील 41 नाल्यांवर 30 हजारांहून अधिक बांबू लागवड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच शेतात गाळ टाकण्याची कामे सुरू आहेत.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. नाम फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी या संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सानप, तंत्र अधिकारी राजेश मिरगेवार, तंत्र अधिकारी फलोत्पादन स्वामी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
000000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1115
यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन
दिल्लीत देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
कुसुम सभागृह नांदेड येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम
दि. १9 ऑक्टोबर- सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि श्री किरण कुलकर्णी (भाप्रसे)मा.सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.
दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ७:०० वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे रंगणाऱ्या या कार्यक्रमात संज्योती जगदाळे संगीतातील लावण्यवती पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिने व पार्श्वगायिका तथा उपविजेती -सुर नवा ध्यास नवा-पर्व 5 तसेच निवेदक बापु दासरी (सुप्रसिद्ध कवी व गझलकार),महेश जैन (गायक/संगीत संयोजक), अंकुश डाखोरे (तबला वादक),रागेश्री जोशी (प्रसिद्ध गायिका), गणेश इंगोले (मृदंग), निवेदिता जोशी (प्रसिद्ध गायिका), राज लामटिळे (की बोर्ड), शिवकुमार मठपती (प्रसिद्ध गायक), किशोर आवटे (ऐक्टोपॅड) हे गायक व वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता व ऐकता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहुन आश्वाद घ्यावे, असे आवाहन श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
000000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1114
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
बालविकास प्रकल्प कार्यालय ,नांदेड शहर तर्फे आयोजित आठव्या पोषण माह चा समारोप
नांदेड, दिनांक 19 ऑक्टोबर - बाल विकास प्रकल्प कार्यालय नांदेड शहर तर्फे आठव्या राष्ट्रीय पोषण माह चा समारोप साई लॉन्स येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले होते.त्यांनी यावेळी बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी,इतर साहित्य पुरवले जाईल व शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास तिथे अंगणवाडी भरविण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले.
बाल विकास प्रकल्प कार्यालय,नांदेड शहर ने राष्ट्रीय पोषण माह मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी सर्व मदतनीस व सेविका यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 30 हजार रुपये रक्कम दिली.
कार्यक्रमास लेखाधिकारी नीलकंठ पाचंगे, वैद्यकीय अधिकारी रिठे ,बाल न्याय मंडळ सदस्या श्रीमती सुप्रिया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोषण महा दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पोषण माह दरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पाककला आयोजित करण्यात आली होती.पोषण व आरोग्य यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली.या दरम्यान त्यांनी महिनाभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीमती गुंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व पर्यवेक्षिका गुंडारे,पेंदे ,शिसोदे ,गरुड ,खिराडे ,राहेगावकर , श्री आऊलवार,श्री खूपसे ,यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी प्रकल्पातील सर्व मदतनीस,सेविका व पालक वर्ग उपस्थित होते.
०००००
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...

.jpeg)





.jpeg)




