Monday, September 2, 2024

 महत्वाचे वृत्त क्र. 797 

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित ; 

25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला

 

·        नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे

·        उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरुवात

·        93 पैकी 45 मंडळामध्ये धो-धो पाऊस

·        नांदेड शहरात सरासरी 125 मीमी पाऊस

·        पाटबंधारे विभागाची पूर नियंत्रणासाठी पराकाष्ठा

·        पालकमंत्र्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा

 

नांदेड दि. 2 सप्टेंबर : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

 

 25 जनावरे मृत्युमुखी

25 जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास शेतीचे व जानमालाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू होतील असे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे

गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मिटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

नांदेड,अर्धापूर सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. काल किनवट माहूर या तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात झालेला पाऊस आज नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या तालुक्यावर धो -धो बरसला. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये 170 मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी 125 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहराच्या अनेक भाग जलमय झाला होता.गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्‍ये दुस-या मजल्‍यापर्यत पाणी गेले होते. या इमारतीमध्‍ये अडकलेल्‍या दोन व्यक्तिना बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.

 

या पावसाने जिल्ह्यातील 28 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान केले असून सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना दुपारी पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता रात्री उशिरा पाऊस थांबल्यानंतर मात्र पूर ओसरला. रात्री उशिरापर्यंत संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

 

 25 जणांची सुटका

आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज युद्धपातळीवर काम केले.उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्‍या परीसरात जवळपास 25 लोक अडकले होते. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड कडून राज्‍य आपत्‍ती प्रतिसाद दल SDRF ची तुकडी त्‍या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन 25 जणांना पुरातुन सुखरुप बाहेर काढले.

 

 एक जण वाहून गेला

तथापि, नांदेड तालुक्यात दुपारी 4 वाजताच्‍या दरम्‍यान पासदगाव पुलावरून पाणी जात होते. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा एका व्यक्तीने प्रशासनाचे काहीच न ऐकता पुल क्रॉस करण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

 

धरणांमध्ये मुबलक साठा

नांदेड ज‍िल्‍हयातील 2 सप्टेबर रोजी दुपारी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आले असले तरी धरणाची दारे मात्र उघडलेली नाही. शंकरराव चव्‍हाण व‍िष्‍णुपरी प्रकल्‍प नांदेडची 14 उघडण्यात आली होती. अपर मानार ल‍िंबोटी धरणाची  पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ  धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत.त्‍यामुळे येणारा व‍िसर्ग जशाला तसा पुढे  जातो आहे. बळेगाव हाय लेव्‍हल बॅरेजचे एकूण 14 दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व 16 दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व 14 दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस धरणाचे 14 दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत सर्व गोदावरी वरील बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.

 

पालकमंत्र्यांकडून आढावा

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला शक्य तेवढ्या लवकर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले तातडीच्या मदतीला सुरुवात करण्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

0000






 वृत्त क्र. 796 

राज्य गणेशोत्सव स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यास 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड, दि. 2 सप्टेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024' चे आयोजन करण्यात आले आहे.  जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे.

 

गणेशोत्सव मंडळांनी संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय. डी. वर पाठवणे आवश्यक आहे.स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात.  स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धा नि:शुल्क आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट ,ध्वनिप्रदू्षण रहित वातावरण,  गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे ४ जिल्हे प्रत्येकी ३ आणि हे ४ जिल्हे वगळता अन्य ३२ अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण ४४ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील.

 

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे कळविले आहे.

०००००

 वृत्त क्र. 795

होमगार्ड नोंदणीची शैक्षणिक कागदपत्रे,

शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळापत्रकात बदल

 

नांदेड, दि. 2  सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील होमगार्डचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांकानुसार शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे बोलविण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नांदेड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच प्रशासकीय कारणास्तव 1 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांच्या वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

 

नोंदणी अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संगणक प्रणालीमध्ये सादर केलेल्या उमेदवारांनी अर्ज क्रमांकानुसार शैक्षणीक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी पोलीस मुख्यालय नांदेड येथे पुढील नमुद केलेल्या दिनांकाला आवेदन क्रमांकानुसार बोलाविण्यात आले आहे.

 

दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी आवेदन क्रमांक 16501 ते 17495 (पुरूष), आवेदन क्रमांक 1 ते 17495 (महिला उमेदवार), दिनांक 6 सप्टेंबर रोजी आवेदन क्रमांक 10501 ते 13500 (पुरूष उमेदवार). दिनांक 7 सप्टेंबर रोजी आवेदन क्रमांक 13501 ते 16500 (पुरूष उमेदवार), दिनांक 8 सप्टेंबर रोजी आवेदन क्रमांक 4501 ते 7500 (पुरूष उमेदवार), दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी आवेदन क्रमांक 7501 ते 10500 (पुरुष) या आवेदन क्रमांकानुसार बोलाविण्यात आले आहे.

 

पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे बोलावण्यात आलेल्या या सुधारीत वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरीलप्रमाणे आवेदन क्रमांकानुसार उमेदवारांनी पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे सर्व आवश्यक मुळ शैक्षणीक कागदपत्रे व मुळ आवेदन, सर्व स्वसाक्षांकित छायांकित प्रती तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटोसह सकाळी 6 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 794

युद्ध सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नांदेड, दि. 2  सप्टेंबर : युध्दात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिकांना, विधवांना एकरकमी 15 लाख युद्ध सन्मान योजनेतर्गंत तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या अनुषंगाने 1965 आणि 1971 च्या युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या आणि डिस्चार्ज बुकमध्ये समर सेवा स्टार किंवा पूर्वी स्टार/पश्चिमी स्टार मिळाल्याची नोंद आहे अशा माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यत नाव नोंद करावी. तसेच अधिक माहितीसाठी कल्याण संघटक (मोबाईल क्रमांक 8698738998/8707608283) वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

अर्जासोबत माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांचे ओळखपत्र आणि डिस्चार्ज बुकची छायांकित प्रत, पेन्शन स्लीप, शेतजमीन आणि उपलब्ध घराचे क्षेत्रफळ याबाबतचा सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा दाखला, मागील पाच वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स किंवा वार्षिक उत्पन्न विवरण (AIS) , सध्याच्या उत्पन्नाचे साधनाचा तपशील व दाखला, नॉन पेन्शनर यांनी शासकीय पेन्शन मिळत नसल्याबाबतचे स्वंयघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत असेही कळविले आहे.  

00000

वृत्त क्र. 793

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 नांदेड, दि. 2  सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्व सूचना कळवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात शिरून पिके जलमय होऊन, पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर इत्यादी कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. वरील नुकसानीची भरपाई ही पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत देण्यात येते. 

वरील कारणांमुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 14447 याद्वारे विमा कंपनीस नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. पूर्वसूचना दिल्यानंतर विमा कंपनी मार्फत किंवा केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेला डॉकेट आयडी सांभाळून ठेवावा. क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये पूर्वसूचना देताना अतिवृष्टी, जास्तीचा पाऊस या कारणांचीच निवड करावयाची आहे, इतर कारणे नमूद करू नये. 

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्व सूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असेही कृषि विभागाने कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 792 

इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद  

 ·  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

नांदेड, दि. 2  सप्टेंबर : इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार (आरओएस) 1 ते 15 सप्टेंबर या कालावधी मध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार इसापुर धरणाची पाणी पतळी 440.74 मी. इतकी ठेवावयाची आहे. आज 2 सप्टेंबर 2024 रोजी सायं 4 वा. इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मी. इतकी असुन उपयुक्त पाणी साठा 816.75 दलघमी (84.72 टक्के) इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे व इसापुर धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत. 

इसापुर धरणाच्या खालील बाजुस काल 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असुन त्यामुळे पेनगंगा व कयाधु नदीला पूर आला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 361 हदगाव-उमरखेड रोड वरील मार्लेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली असून नदीने धोकापातळी ओलांडली आहे. सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील बाजुस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत यावर्षी इसापुर धरणामधुन अद्याप पर्यंत विसर्ग सोडण्यात आला नाही. नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता ब. बा. जगताप यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 791 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा

 

·  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती

·   नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारासही भेट

 

नांदेडदि. 2  सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनक्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

उदगीर येथील कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.35 वाजता राष्ट्रपती महोदयांचे नांदेड विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 4.45 वाजता नांदेड विमानतळ येथून वाहनाने गुरुद्वारा रोडयात्री निवास रोड नांदेड येथे आगमन. सायं 5 ते 5.05 वाजेपर्यत टीबीसी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.5 ते 5.15 राखीव. सायंकाळी 5.15 ते 5.40 पर्यत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे भेट.  सायं. 5.40 वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे वाहनाने प्रयाण. सायं. 5.55 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. त्यानंतर सायंकाळी 6.05 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.

 

राष्ट्रपतींच्या  नांदेड येथील 4 सप्टेंबर 2024 रोजीच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. राष्ट्रपती महोदयांच्या नांदेड येथील दौऱ्यानिमित्त संबंधित विभागानी आपआपली जबाबदारी पूर्ण पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

00000


 वृत्त क्र. 790 


#नांदेड येथील शंकरराव चव्हाण #विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे #गोदावरीनदी दुधडी भरून वाहत आहे. आतापर्यंत १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. नागरिकांनी #सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 





#नांदेड शहरात जोरदार पावसामुळे #विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे #गोदावरीनदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जुन्या नांदेड मधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. छायाचित्र - पुरुषोत्तम जोशी




 

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.











#नांदेड मधील #गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. #विष्णूपुरी धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्राच्या पुढील भागातील व सकल भागातील नागरिकांनी
#सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...