Saturday, March 18, 2017

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 
युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न
नांदेड दि. 18 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. मनोज बोरगांवकर यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी हुजूरसाहेब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य सरदार गुरुबचन सिंघ उपप्राचार्य मनजितसिंग यांची उपस्थितहोत. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे हे होते.
          

  दोन दिवस चालणाऱ्या युवोत्सव- 2017 कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रमाची आखणी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली. रांगोळी, टेक्निकल प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्री. पाचंगे प्रा. बोरगांवकर यांनी तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांतील सामाजिक बांधिलकीची जाणीव बघून कौतूक केले. जीवन आधार रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पुजन गणपती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात प्रा. लोकमनवार यांनी संस्थेची माहिती तसेच विविध स्तरावर केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. उद्घाटन भाषणात श्री. पाचंगे यांनी चांगल्या लेखकांची पुस्तके जीवनाला कलाटणी देणारी ठरतात , ती वाचा तसेच आयुष्यात एक चांगला नागरिक होणाऱ्या दृष्टीने प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याबद्दल आवाहन केले.  प्रा. कवी मनोज बोरगांवकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचे सुत्र विद्यार्थ्यांसमोर सांगितली.
            अध्यक्षीय समारोपात संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून दिले. बक्षिस समारंभासाठी सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच. पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी मोहन पवार हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे हे होतो. प्राचार्य श्री. पोपळे यांनी बक्षिस विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शिक्षणाबरोबरच इतर कलागुणांना वाव स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमातून मिळतो. म्हणूनच युवोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.  स्नेह संमेलनल प्रभारी म्हणून प्रा. डी. एम. लोकमनवार यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. ए. एन. पवार, डॉ. ए. डब्ल्यू. पावडे, प्रा. एस. पी. कुलकर्णी, प्रा. के. एस. कळसकर, प्रा. डॉ. एस. एस. चौधरी, प्रा. व्ही. बी. उष्केवार, प्रा. एस. एम. कंधारे, प्रा. व्ही. यु. दातीर, प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. ए. टी. आढावे विद्यार्थी संसद सचिव श्रीकांत जोशी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. ए. बी. दमकोंडवार, जिमखाना सचिव प्रदीप सेवलीकर यांनी स्नेहसंमेलन युवोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती आर. के. देवशी, धनश्री लटपटे ऋषीकेश अमलापुरे यांनी केले.

0000000
धर्माबाद आयटीआयमध्ये शिल्पनिदेशकांच्या
नेमणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मुलाखती
नांदेड दि. 18 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी मंगळवार 4 एप्रिल 2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद यांनी केले आहे.  
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक मोटार गाडी, यांत्रिक कृषित्र, अभियांत्रिकी चित्रकला निदेशक या व्यवसायाकरीता शैक्षणिक अर्हता ही संबंधित व्यवसायामधील मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक/दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वारील नियुक्ती मिळेल.
या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी मंगळवार 4 एप्रिल 2017 रोजी संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

000000
जलदौड स्पर्धेचे आज आयोजन
नांदेड दि. 18 :- जलसंपदा विभागामार्फत गुरुवार 16 ते बुधवार 22 मार्च 2017 कालावधीत राज्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने रविवार 19 मार्च 2017 रोजी  सकाळी 6.30 वा. आयटीआय चौक-शिवाजीनगर ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जलदौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जलदौडमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांनी केले आहे. 
या स्पर्धेत वय 25 वर्षे व 25 वर्षापुढील वयोगट असे दोन गट करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय विजेता घोषित करण्यात येणार असून विजेत्यांना सन्मानपत्र, रोख बक्षिस देण्यात येणार आहे. 

0000000
शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज
भरण्यास 30 मार्च पर्यंत मुदत
नांदेड दि. 18 :- समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवार 30 मार्च 2017 पर्यंत असून  शाळेच्या मुख्यापकांनी मुदतीत शाळेच्या लॉगइन आयडीतून  विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन मान्यतेसाठी ऑनलाईन अर्ज पुढे पाठवावेत.
विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्जात नमूद केलेला खाते क्रमांक विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करुन खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न केल्याचा पुरावा प्रस्तावाच्या हार्ड कॉपीसोबत जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावा. प्रस्तुत कार्यालयाकडे प्रस्ताव व प्रस्तावासोबत खाते क्रमांक आधारकार्डाशी संलग्नतेचा पुरावा सादर न करणाऱ्या शाळांचे अर्ज मंजूर करण्यात येणार नाहीत. गुरुवार 30 मार्च पर्यंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रासह समाज कल्याण कार्यालयाकडे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
मंडळ अधिकारी संवर्गाची
सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध
नांदेड दि. 18 :- मंडळ अधिकारी संवर्गातील सेवानिवृत्त, स्वेच्छासेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांचे कुटुंबियांनी जेष्ठता सुचीचे अवलोकन करावे आणि या जेष्ठातसुची संबंधी काही आक्षेप असल्यास आपण ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त, स्वेच्छासेवानिवृत्त व मयत ( मयत कर्मचाऱ्यांचे  कुटुंबियांनी) झाले आहेत त्या कार्यालयाचे नाव नमूद करुन आक्षेप अर्ज सबळ पुराव्यासह गुरुवार 30 मार्च 2017 पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत. या तारखेनंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा ( जेष्ठतेचे विनियमन ) नियमावली 1982 अन्वये मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांची 1 जून 1982 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीच्या सेवा जेष्ठता याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना शासनाकडून दिल्यानुसार‍ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या आस्थापनेवरील महसूल विभागातील मंडळ अधिकारी  संवर्गातील कर्मचारी यांच्या सेवाजेष्ठता याद्या सुधारीत करुन प्रसिद्धीस्तव जिल्हाधिकारी कार्यालयाचे http://:nanded.nic.in या संकेतस्थळावर आणि सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासने यांचेकडे पाहण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत.  

000000
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
नांदेड दि. 18 :- शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे रविवार 19 मार्च 2017 रोजी एक दिवसीय राज्यस्तर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. "सद्यस्थितीत शाळाबाह्य मुलांचे शिक्षण" या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात सर्व स्तरावरील शालेय शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षक प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी केले आहे.
शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासंदर्भात निरनिराळ्या स्तरावर संशोधन करणारे व संशोधन प्रकल्पाशी संबंधीत संशोधकांनीही या चर्चासत्रात सहभागी व्हावे.  तसेच सोमवार 20 मार्च 2017 रोजी "संशोधन पद्धती" या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन याच महाविद्यालयात करण्यात आले आहे. गुणात्मक संशोधनातील नवप्रवाह या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात उच्च शिक्षणांतर्गत सर्व महाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था तसेच शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापक यांचा सहभाग अपेक्षित आहे. या दोन्ही चर्चा सत्रात त्या-त्या संबंधित शिक्षक, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सक्रीय सहभाग नोंदविण्याचेही आवाहन प्राचार्या डॉ रोडगे यांनी केले आहे.

000000
बेरोजगार उमेदवारांसाठी
बुधवारी भरती मेळावा
नांदेड दि. 18 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर- 6 ( कॅशलेस व्यवहाराबाबत सादरीकरण ) नामांकित कंपनीत सेवेची संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी बुधवार 22 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , कैलास बिल्डींग, श्रीनगर वर्कशॉप रोड, नांदेड येथे इंट्रीपास व आधार कार्डसह उपस्थित रहावे , असे आवाहन सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
एम.आय.एस. इं. लि. हैद्राबाद या कंपनीत सेक्युरिटी गार्डच्या 100 जागा पुरुषांसाठी आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. हैद्राबाद व महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र राहील. वेतन 8 हजार ते 12 हजार असून वय 20 ते 35 वर्षे. उंची 167.5 आवश्यक आहे.  
युरेका फोर्बस प्रा. लि. नांदेड या कंपनीत सेल्समन या पदासाठी 20 जागा असून बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र नांदेड राहील. वेतन 8 हजार व पेट्रोल, कमिशन दिले जाईल. वय 18 ते 30 वर्षे आवश्यक आहे.
नवभारत फर्टीलायझर औरंगाबाद या कंपनीत सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी 60 जागा असून पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. कार्यक्षेत्र हिंगोली व परभणी राहील. वेतन 8 हजार 500 ते 12 हजार रुपये राहील. वयमर्यादा 19 ते 35 वर्षे आवश्यक आहे.
ऑनलाईन सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन आयडी पासवर्ड टाकुन लॉगइन व्हायचे- जॉब फेअरमध्ये जावून जॉब इन्व्हेन्ट मधून जिल्हा निवडणे- नांदेड स्किल ॲन्ड जॉब फेअर-6 च्या उजव्या बाजुस ॲक्शनमध्ये जावून पार्टीसिपेशनला क्लिक करणे-टर्म ॲन्ड कंडीशनला आय ॲग्री करुन अप्लाय करणे- पुन्हा ॲक्शनवर येवून इंट्री पास काढून घ्यावी. हा इंट्री पास व आधार कार्ड घेवूनच मेळाव्यात यावे लागेल. काही अडचण आल्यास दूरध्वनी नंबर 02462 - 251674  संपर्क साधावा.  या मेळाव्याकरीता ऑनलाईन सहभाग, इच्छुकता दर्शविल्याशिवाय सहभागी होता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या उमेदवाराची नोंद झाली नाही त्याची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा बुधवार 22 मार्च 2017 रोजी मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. याबाबत होणारा प्रवास खर्च व इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
अर्ज करण्यास 23 मार्च पर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 18 :- शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी गुरुवार 23 मार्च 2017 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना" या योजनेअंतर्गत अर्ज यापुर्वी 16 मार्च 2017 पर्यंत मागविण्यात आले होते. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या पत्रान्वये अर्ज करण्याची मुदत गुरुवार 23 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसाठी लागू असलेल्या अटीची तसेच शासन निर्णयातील तरतुदीची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित जोडपत्र क्र. 1 मधील अर्ज त्यासोबत जोडपत्र क्र. 2 मध्ये नमूद कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून परिपूर्ण अर्ज गुरुवार 23 मार्च 2017 पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन निर्णय दि. 6 जानेवारी 2017 समाज कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ग्यानमाता  शाळेसमोर  नांदेड  या  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...