Wednesday, February 4, 2026

वृत्त क्र. 172

जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी :- बिलोली येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विनानंबरचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली. ही वाहने विनापरवाना व अनधिकृतरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमएच 24 बीडब्लू 7727, एमएच 24 बीडब्लू 7227, एमएच 24 सीई 7227 एमएच 20 जीएस 0793 या वाहनाचा यात समावेश आहे. या सर्व वाहनावर दंड आकारण्यात आला असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात येऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, अवैध वाहतूक, विनानंबर किंवा बनावट नंबर असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. 

0000




 वृत्त क्र. 171

एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी व सर्वह इन्क्युबेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे प्रादेशिक इनोवेशन व स्टार्टअप संवाद

नांदेड, ४ फेब्रु  :-श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी), नांदेड आणि सर्व इन्क्युबेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक इनोवेशन व स्टार्टअप संवाद कार्यक्रमाचे आयोजन ६ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी, नांदेड येथे करण्यात आले आहे.

विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तसेच इनोवेशन परिसंस्थेतील विविध भागीदारांना एकत्र आणून नवोन्मेष, उद्योजकता आणि प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासावर सखोल संवाद व चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या संवाद कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS), महाराष्ट्र शासन यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्राचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, शासनाचे विविध इनोवेशन व स्टार्टअपविषयक उपक्रम तसेच विद्यार्थी, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र नवोन्मेष प्रक्रियेत कशा प्रकारे सक्रिय सहभाग घेऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

हा प्रादेशिक संवाद महाराष्ट्रातील इनोवेशन व स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार्य, ज्ञानविनिमय आणि संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचा तपशील :

दिनांक : ६ फेब्रुवारी २०२६

वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १.००

स्थळ : श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी), नांदेड

हा कार्यक्रम विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी तसेच इनोवेशन परिसंस्थेतील भागीदारांसाठी खुला आहे. नोंदणीसाठी खालील QR कोड स्कॅन करावा किंवा दिलेल्या लिंकवर भेट द्यावी : https://forms.gle/NptDJZwEFhSDdfYv9

०००००

 वृत्त क्र. 170

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : - कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतात. कारागिरांच्या व्यवसायवृद्धीसाठी अशा प्रदर्शन व विक्री उपक्रमांना महत्त्व असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.

आज लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर, नांदेड येथे एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उदघाटन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर  यांच्यासह  जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम ५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या प्रदर्शनात पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण व थेट विक्री करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सुतार, अस्त्रनिर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई व झाडू निर्माते, पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार आदी विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधव सहभागी झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यत पीएम विश्वकर्मा योजनेत 1 लाख 33 हजार 257 कारागिरांनी नोंदणी केली असून, यापैकी 4 हजार 874 कारागिरांना कर्ज मंजूर झाले असून यापैकी 4 हजार 102 कारागिरांना कर्ज वाटप झाले आहे. तर 7 हजार 594 कारागिरांना टुलकिट वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी दिली. तसेच या प्रदर्शनीत 50 कारागिरांनी सहभाग नोंदविला असून विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधवानी स्टॉल लावले आहेत. नांदेड नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथेही हे प्रदर्शन भरणार आहे. तरी  नागरिकांनी या प्रदर्शन व विक्रीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेवून  विश्वकर्मा बांधवाना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

00000













 वृत्त क्र. 169 

दहावी-बारावी परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी :  नांदेड जिल्ह्यातील सर्व बारावीच्या 110 तर दहावीच्या 177 परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 रोजीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. याबाबतचा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे. 

या आदेशानुसार परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्या, तसेच परीक्षा केंद्रात नेण्या, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मिटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. सर्व संबधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश काढण्यात आला आहे.

00000

वृत्त क्र. 168 

नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या

5 हजार 106 कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ  

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी :  नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या एकुण 5 हजार 106 कर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतेच 2 फेब्रुवारी रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. त्यानुसार जिल्हयातील संबंधित सर्व तहसिलदार यांना तालुक्यातील एकुण 5 हजार 106 थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी देऊन सदर शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या (भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या. मुंबई) कर्जबोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यानी मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करावीत व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक (भू-विकास बँक ) नांदेड या बँकेची दिनांक 8 मार्च 2025 रोजीच्या आदेशान्वये नोंदणी रद्य झाली असुन महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय एलडीबी 1015/प्र.क्र. 28 ( शिकाना / 7-स) दिनांक 9 नोव्हेंबर 2022 अन्वये राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. मुंबई (शिखर भूविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाचे (जिल्हा भूविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज पुर्णतः माफ झाले आहेत. 

भु-तारण बँक, भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या., मुंबई या बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की याबाबत आपले संबंधित सहाय्यक ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) महसूल विभागाशी समन्वय साधुन आपल्या 7/12 वरील भु-तारण बँक, भुविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या., मुंबई या नावाने असलेल्या बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी केल्याची खात्री करावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्हयातील संबंधीत तहसिलदार कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन शाहुराज हिरे परिरक्षक नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. नांदेड तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र. 167 

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनास प्रशिक्षणार्थ्यांचा उत्सफूर्त सहभाग 

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कौशल्यास वाव मिळावा, नवनवीन संकल्पना, नाविन्यता विकसीत व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये संपूर्ण जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था मिळून जवळपास 24 संस्थानी सहभाग नोंदवला. 

कार्यक्रमासाठी संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा, संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुर्यवंशी एस. व्ही., औ.प्र. संस्था अर्धापूरचे प्राचार्य तथा संस्थेचे उपप्राचार्य कंदलवाड व्ही. डी., प्राचार्य सर्वश्री त्रिचूरकर, फारूकी, गायकवाड, पिंडकुलवार, अन्नपुर्णे पी. के. तसेच जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील संस्थेतील शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

प्रास्ताविकात प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी तंत्रप्रदर्शनासारख्या संकल्पना राबवल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्यास वाव मिळतो. सध्याचे युग हे उद्योगाला चालना देणारे तसेच नविन उद्योग धोरण राबवणारे असल्यामुळे नवनविन उद्योजक निर्माण हो शकतात. संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तंत्रप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व आधूनिक बदलांशी जुळवून घेणेसाठी त्यांना उदयुक्त करता येते, असे नमूद केले. 

तंत्रप्रदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर अतिशय नाविन्यपुर्ण संकल्पना आणि तांत्रीक कौशल्यावर आधारीत असे उपकरणे तयार केली. प्रदर्शनाचा लाभ नांदेडमधील विविध शाळांनी घेतला.

कार्यक्रमाचे आभार करताना संस्थेचे उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहीत करून त्यांचे कौतूक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन राका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

0000

वृत्त क्र. 166 

गटई कामगारांसाठी अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजनेची व्याप्ती 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील च्छुक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन 2025-26 करीता सुधारित मागणी नोंदविण्याकरीता गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असून सदरचा ऑफलॉईन अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयात उपलब्ध आहे. 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) च्छुक लाभार्थ्यांनी सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज परीपुर्ण भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयास सादर करण्यात यावा. राज्यातील गटई कामगारांना १०० टक्के अनुदान या तत्त्वावर पत्र्याचे स्टॉलवर कमाल 5 हजार रुपये इतके डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येते ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. 

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागातील 80 हजार व शहरी भागातील 1 लाखापेक्षा अधिक नसावे, अथवा अर्जदार दारीद्रय रेषेखालील असावा. अर्जदराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका, यांनी त्यास भाड्याने, कराराने खरेदीने, अगर मोफत, परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी. किंवा ती जागा त्यांच्या स्वमालकीची असावी. सदर योजनेची गटईस्टॉलसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी गटई कामगाराची राहील. एकदा गटई स्टॉलची वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही. तसेच ते भाडे तत्त्वावर देता येणार नाही. तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. याबाबत अनियमितता झाल्यास सदर स्टॉल परत घेण्यात येईल. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहे. त्या शिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी वापरता येणार नाही. असे निदर्शनास आल्यास स्टॉल रद्द करुन अनुदान वसुल करण्यात येईल. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर स्टॉलची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. स्टॉलचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देता येईल. 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) घटकांतील सुशिक्षीत बेरोजगार, इच्छुक लाभार्थ्यांकडुन सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असुन सदरचा ऑफलाईन अर्ज, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगार यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000


वृत्त क्र. 165 

ई-आर 1 त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाईन भरण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे माहे डिसेंबर २०२५ अखेरचे ई-आर- १ (ER-1) त्रैमासिक विवरणपत्र जानेवारी/फेब्रुवारी 2026 च्या मुदतीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in वर भरावयाची मुदत आहे. 

डिसेंबर- २०२५ अखेरचे ईआर १ (ER 9) त्रैमासिक विवरणपत्र भरल्याची प्रत माहे जानेवारी २०२६ च्या वेतन देयकसोबत जोडल्याशिवाय वेतन देयके स्विकारली जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 

जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना या कार्यालया मार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ईमेल आयडी, फोन नंबर, पॅन नंबर, टॅन नंबर नोंदवून आपली प्रोफाईल अद्यावत करावी. या बाबत काही अडचणी आल्यास या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02462-251674 वर संपर्क करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 164

शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा

नांदेड, दि. ४ फेब्रुवारी : राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक यांच्यासाठी उद्योगवाढीच्या संधी, उत्पादनांची निर्यात क्षमता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तसेच डीजीएफटी (DGFT), निर्यात नोंदणी, धोरणे व सुलभ प्रक्रिया यासंदर्भात तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यशाळेमुळे उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील नव्या संधींची माहिती मिळून जिल्ह्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविण्यास मदत होणार आहे.

तरी नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातक्षम उद्योगांचे प्रतिनिधी, बँक अधिकारी तसेच औद्योगिक विकासाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रमुख यांनी या एकदिवसीय कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शन सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 163

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत

शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन 

नांदेड दि.4 फेब्रुवारी :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेत जमीनीसाठी प्रति एकर 5 लाख रुपये मर्यादेच्या आत तसेच बागायती शेतजमीनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपये मर्यादेच्या आत जिल्हास्तरीय समितीमार्फत वाटाघाटी करुन मोबदला अदा करण्यात येतो. जिल्ह्यात शेतजमीन विक्री करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी व व्यक्तीनी आवश्यक कागदपत्रांसह शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे –विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, नमुना आठ-अ, शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी सह विहित नमुन्यातील शपथपत्र, भूमि अभिलेख कार्यालयाचा पोटहिस्सा मोजणी अहवाल, तलाठी यांचे निर्विवाद प्रमाणपत्र, मुल्यांकन प्रमाणपत्र, बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र, कुटुंबातील सदस्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मागील 13 वर्षाचे फेरफार संबंधी पुरावे (सर्च रिपोर्ट), इतर आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, शपथपत्रांचे नमुने व अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

00000

  वृत्त क्र.  181 सोमवारी आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन   नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना के...