Thursday, March 12, 2026

वृत्त क्रमांक 

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू 

नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक बुकिंग करु नये

घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी

नांदेड दि. 12 मार्च :- जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक बुकिंग करु नये. तसेच गॅस एजन्सीच्या बाहेर अनावश्यक गर्दी करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

घरगुती गॅसच्या नियंत्रणासाठी  जिल्हा आणि तालुकास्तरावर कंट्रोल रूम तयार करण्यात येत आहे. नागरिकांनी यासंबंधी काही समस्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मो. नंबर 8668223326 या व्हॉटसॲप Chat Bot नंबरवर पाठवाव्यात.

नांदेड जिल्ह्यात कोणीही घरगुती गॅसचा गैरवापर, काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार तात्काळ वर दिलेल्या नंबरवर द्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी

15 ते 16 मार्चदरम्यान नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर आयोजन; 

100 स्टॉल्स, शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व थेट शेतमाल विक्री

नांदेड, दि. १२ मार्च:- कृषी विभाग व आत्मा, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026 चे आयोजन 15 ते 16 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांचे स्टॉल, विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन तसेच कृषी संलग्न शासकीय विभागांचे स्टॉल अशा सुमारे 100 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध विषयांवरील शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलन यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी यांसारखी सेंद्रीय उत्पादने उपलब्ध राहणार आहेत.

तसेच मध, गुळाचा पाक, महिला बचत गटांची चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज यांसारखी फळे व विविध भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय जात्यावरची सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या, रानफळे तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

या महोत्सवाला शहरातील नागरिक व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन शेतमाल खरेदीद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 

नांदेडमध्ये आज मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन

रेणुका महोत्सवामुळे महिलांना विक्रीसाठी खुले झाले दालन

नांदेड, दि.१२ मार्च:-मिनी सरस, रेणुका महोत्सव 2026 अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या  वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन, १३ मार्च ते १८ मार्च २०२६ दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल, मल्टीपर्पज ग्राउंड, वजीराबाद नांदेड येथे भरवले जाणार आहे. वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेमध्ये उपलब्ध असणार आहे.

उमेद -

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद नांदेड  

मिनी सरस,रेणुका महोत्सव दिनांक 13 मार्च  ते 18 मार्च 2026 यादरम्यान हे विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे ,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम,विधान परिषदेचे सदस्य तथा  बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील,महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती खा. डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे , आमदार विक्रम काळे, आमदार श्री सतीश चव्हाण, आमदार  आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार  प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भीमराव रामजी केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर,आमदार राजेश पवार,आमदार जितेश आंतापूरकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार कुमारी श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान सचिव एकनाथ डवले , विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर छत्रपती संभाजी नगर, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिडीबी बेलापूर नवी मुंबईचे निलेश सागर,विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,श्रीमती मेघना कावली, जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक, डीआरडीए डॉ. संजय तुबाकले आदि मान्यवर व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत असणार आहे आणि हे प्रदर्शन मोफत प्रवेश व  ग्राहकाला आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे.

स्थळ -जिल्हा परिषद ची मल्टीपर्पज हायस्कूल जिल्हा परिषद शाळा, वजिराबाद ,महावीर चौक, नांदेड 

या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम 

मध्ये यामध्ये आदिवासी नृत्य द्वारे स्वागत, ऐनोद्दीन वारसी यांचे बासरी वादन, अंधविद्यालय वसरणीचे पंकज शिरभाते यांचे गीतगायन, दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थी यांचे समूह गायन, नाटिका, तृतीयपंथी यांचे लावणी, गणेश काकडे यांची लावणी व शुभम सर व नृत्यालय ग्रुप चे समूह डान्स, शिवराज्याभिषेक सोहळा सादरकर्ते  - महात्मा फुले हायस्कूल बाबा नगरचे ५० विद्यार्थी- विद्यार्थींनीचा संच,

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचावर आधारित एक पात्री प्रयोग सादरकर्ते  शाहीर दिगू तुमवाड, व त्यांचा संच,भीम गीते व महामानवावर गीते सादर करणारे

बाल कलावंत- आयुष सचिन डोम्पले, नागसेन विद्यालय सिडको व त्यांचा संच, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटिका सादर कर्ते सिने कलावंत मास्टर माधव पवार व त्यांचा संच, लोकधारा पारंपारिक, गवळी, लावणी, चुटकुले सादर कर्ते- शिवशंकर चिलगर व त्यांचा संच.

आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर इतर सामाजिक विषयावर ज्वलंत प्रश्न और परिसंवाद यांचे देखिल आयोजन करण्यात आलेले आहे असे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली  व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले,जिल्हा अभियान व्यवस्थापक व्दारकादास राठोड यांनी आवाहन केलेले आहे.

oooo




वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 12 मार्च :- नांदेड 13 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 मार्च 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.                                   

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 मार्च 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 वृत्त क्रमांक 

शुक्रवारी बिलोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 12 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व श्रीधर स्वामी शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी श्रीधर स्वामी शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 13 मार्च 2026 सकाळी 11 वा. पासून श्रीधर स्वामी शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे. 

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी  क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक   घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू  नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक बुकिंग करु नये घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास...