Saturday, August 15, 2026

वृत्त क्रमांक

युवा शक्तीचा संकल्प: स्वच्छ आणि सुंदर भारत

माय भारत युवा केंद्र आणि मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता पंधरवडा’ यशस्वीरीत्या संपन्न

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या माय भारत युवा केंद्र यांच्या पुढाकाराने व कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ, नांदेड यांच्या सहकार्याने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

देशभरात 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, समृद्ध भारत' या उद्देशाला समोर ठेवून घेतलेल्या या पंधरवडयात विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 राबविण्यात आलेले प्रमुख उपक्रम

स्वच्छता शपथ: कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांसोबत स्वच्छतेची प्रतिज्ञा व शपथ घेतली.

स्वच्छता पोस्टर प्रदर्शन: युवकांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि संदेशपर पोस्टर्सचे खास प्रदर्शन भरवण्यात आले.

स्वच्छता रॅली : गावात जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

घरोघर जाऊन स्वच्छता संदेश: स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांना ओला-सुका कचरा व आरोग्याबाबत मार्गदर्शन करत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता : गावातील विविध सार्वजनिक स्थळे, परिसर व चौक श्रमदानातून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले.

मान्यवरांचे मार्गदर्शन व सहभाग

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या अध्यक्षा साधना गायकवाड, सचिव नंदनी तदलापूरकर, तसेच सोहन तदलापूरकर, ऋषिकेश तदलापूरकर आणि यश तदलापूरकर यांनी विशेष व अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला संस्थाध्यक्ष कैलाश गायकवाड, माहेश्वरी गायकवाड आणि सांस्कृतिक कार्यप्रमुख शिवशंकर मूळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

आयोजक: माय भारत युवा केंद्र, नांदेड. सहकार्य: कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ.

00000




 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण

नांदेड, दि. १५ ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या योजनेच्या जिल्ह्यातील ७ लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती (बेबाक) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000





वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाला 45 लॅपटॉपचे वितरण

नांदेड, दि. १५ ऑगस्ट : भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक हायटेक, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला 45 अद्ययावत लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे लॅपटॉप संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ‘गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन’ या योजनेतून हे आधुनिक लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर , पदाधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.  

डिजिटल सेवांना मिळणार गती-पालकमंत्री

भूमी अभिलेख विभागाचा थेट संबंध शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाशी येतो. जमिनीची मोजणी, सिमांकन, डिजिटल सातबारा, मिळकत पत्रिका (Property Cards), ई-फेरफार आदी महत्त्वाच्या सेवा आता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आणि तंत्रज्ञानाधारित झाल्या आहेत. अद्ययावत संगणकीय उपकरणांमुळे या कामांना आणखी गती मिळणार आहे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

नवीन लॅपटॉपच्या उपलब्धतेमुळे मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा, ऑनलाइन फेरफार व मिळकत पत्रिकांच्या नोंदींमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यास तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. परिणामी नागरिकांना जलद, सुलभ आणि विनाविलंब डिजिटल सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचे आधुनिकीकरण करून नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शासनाचे आभार

अद्ययावत संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नांदेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. नवीन लॅपटॉपमुळे क्षेत्रीय कामकाजासह प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याच्या भावना यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

00000




वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न 

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान व बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य सेवांच्या दर्जात गुणात्मक व परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. 

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय १४ मे २०२६ च्या अनुषंगाने जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या "जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती"च्या या बैठकीस खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड,  जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते. 

या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा आणि माहिती सादर करण्यात आली. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानके (NQAS) कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवांचे व आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करणे, आरोग्य संस्थांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांना सुलभरीतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम (NCD), महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेतर्गंत टोल फ्री क्रमांक १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा, तसेच सर्वात महत्वाचे महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या माझ गावं-आरोग्य संपन्न गाव इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. 

या बैठकीत जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य विषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि राज्य शासनाचे आरोग्य धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणे, रुग्ण व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक व तात्काळ निराकरण करणे, विविध आरोग्य संस्था व विभागांतर्गत योग्य समन्वय प्रस्थापित करणे आणि आरोग्य उपक्रमांमध्ये लोकसहभाग अधिक व्यापक करणे, जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा गुणांकन दर्जा (Quality Standards) सुधारण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या. 

जिल्ह्यात माता व बाल आरोग्य विषयक सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या.  

या बैठकीच्या समितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आरोग्य विषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

00000






 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आधार सेवा केंद्राचे उद्घाटन

नागरिकांना मिळणार एकाच ठिकाणी सुविधा

आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावतीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध 

नांदेड, दि. 15 ऑगस्ट :- नांदेड शहरातील नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवा सुलभ आणि जलदगतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत आधार सेवा केंद्र महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूलजवळ, वजीराबाद येथे सुरू करण्यात आले आहे. या आधार सेवा केंद्राचे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, यूआयडीएआय मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप गहलोत, ऑपरेशनल मॅनेजर आधार सेवा केंद्राचे गंगाधर गिरी आदीची उपस्थिती होती.

नागरिकांना आधारशी संबंधित कामांसाठी विविध ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. महावीर चौक, मल्टीपर्पज हायस्कूल, बंदा घाट रोड, वजीराबाद येथे बीएलएस इंटरनॅशनल लि. यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रामध्ये आधार नोंदणी, बंद पडलेले आधार पुन्हा कार्यान्वित करणे, बोटांच्या ठशांशी संबंधित समस्या सोडविणे तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती व अद्ययावतीकरणाच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. नागरिकांना आधारशी संबंधित विविध सेवांबाबत आवश्यक मार्गदर्शनही या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.

आधार हे विविध शासकीय योजना, बँकिंग, शैक्षणिक प्रक्रिया तसेच इतर नागरिक सेवांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारमधील आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवीन आधार सेवा केंद्रामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून, आधारशी संबंधित आवश्यक सेवा आणि मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार असून यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

सदर आधार सेवा केंद्रामध्ये पाच ते पंधरा वयोगटातील सर्व मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिर्वाय असून ही सेवा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत विनामूल्य आहे. तसेच सदर आधारसेवा केंद्रामध्ये ज्या व्यक्तींचे जन्मतारखेत किंवा नावामध्ये बदल करण्याची मुदत संपली आहे. तसेच ज्यांचे आधार कार्ड तात्पुरते निलंबित किंवा बंद पडले यासाठी पूर्वी मुंबईच्या कार्यालयात जावे लागत होती सर्व सेवा आता नांदेड येथील या आधार केंद्रात उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे यांनी सहकार्य केले.  

00000








 वृत्त क्रमांक

शेतकरी हितासह सर्वांगीण विकासावर भर - पालकमंत्री अतुल सावे

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन करतानाच शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,  महापौर कविता मुळे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विभाग प्रमुख, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील जवळपास 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे 106 कोटी 25 लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. यासोबतच शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही शासनाने घेतला असून, कर्जाचा भार कमी करण्याबरोबरच शेतीच्या वीज खर्चात दिलासा देण्याचे काम शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष

महाराष्ट्र शासनाने ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ नुकतेच मंजूर करून शेती व शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महिला शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात आला असून, या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, सुविधा व हक्कांबाबत मार्गदर्शन आणि मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

मतदारांनी गणनापत्रक जमा करण्याचे आवाहन

जिल्ह्यात मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून, जिल्हा प्रशासनाने या कामात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, ज्या मतदारांनी अद्याप गणनापत्रक भरून दिलेले नाही, त्यांनी विहित मुदतीत ते BLO कडे जमा करावेत असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.

‘महाभूसंपादन लडार’ प्रणालीचे कौतुक

भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता आणि सुलभता आणण्यासाठी ‘महाभूसंपादन व लडार’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी आणि त्यांच्या टीमचे कौतुक पालकमंत्री सावे यांनी केले.तसेच

कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील बबनराव पेठकर यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यात 3 हजार 365 नागरिकांचा विमा उतरवून राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचा आदर्श सर्वानी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील 99 टक्के पेरणी पूर्ण झाली असून पिकांची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन दक्षतेने काम करीत असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले. 

15 ते 21 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ‘जलसंधारण सप्ताहात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, 21 ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार असून, 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात जलसंधारणाचे महत्त्व, गाळमुक्त व जलयुक्त गावांची संकल्पना तसेच पाण्याच्या काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे. या सप्ताहात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात विविध योजनांतर्गत 341 किलोमीटर लांबीच्या नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, 47 लाख 54 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असून, जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वजारोहणानंतर सलामी देण्यात आली.  सलामी पथक कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक,  त्यांचे कुटूंबिय यांची विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे आणि श्रीमती अंजली नातू यांनी केले.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार 

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना अति उत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार जाहीर केले आहे. यात विठ्ठल श्रीमंतराव खोमणे व गंगाराम हनमंतराव जाधव यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तर राजेंद्र राजलिंग सिटीकर, दीपक राजाराम पवार, दत्ता रामचंद्र सोनुले, दिगांबर किशनराव मुसळे, गजानन बळीराम कदम, संतोष परसराम वाघ, सतिश दत्तात्रय मुधोळकर, माधव नारायण येईलवाड, महेश दुर्गय्या बुडगु यांचा पालकमंत्री यांनी  सन्मान केला. तसेच दिनांक 11 जानेवारी, 2023 रोजी नक्षलग्रस्त भागात ऑपरेशन “जुवेन्तुस” झारखंड राज्यात जखमी झालेल्या शिपाई फारुकी शाहारुखखान आजिजखान यांचा ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला. 

दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत शिवाजी नामदेव घोरबांड व श्रीमती अंजना पद्माकर कौसल्ये-अस्थिव्यंग तर गणेश देविदासराव कदम-अव्यंग व श्रीमती ज्योती निवृत्ती तेलंग-अस्थिव्यंग यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विवाहित जोडप्यांचा सन्मान करण्यात आला. 

सन 2023-24 राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप व रब्बी हंगामात विजेते शेतकरी माधव शंकरराव पाटील, सुनिल नामदेव चिमणपाडे, रत्नाकर गंगाधर ढगे, सुभाष विश्वनाथ यलसटवाड यांचा यांचा सन्मान केला. 

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी पाणी आडवा-पाणी जिरवा मोहिम राबवून जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्याप्रित्यर्थ 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत सीएसआर निधीतून यशस्वी नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केल्याबाबत इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी, धर्माबाद, डियाजिओ इंडिया, धर्माबाद, अव्दिक सस्टेनेबल सोल्यूशन, नांदेड या संस्थेचा सन्मानपत्र देऊन पालकमंत्री यांनी गौरव केला. तसेच यावेळी जलसंधारण विभागाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. 

00000


























 मा. ना. पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम


वृत्त क्रमांक युवा शक्तीचा संकल्प: स्वच्छ आणि सुंदर भारत माय भारत युवा केंद्र आणि मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने  ‘स्वच्छता पंधरवडा’ यश...