Thursday, April 23, 2026

वृत्त क्रमांक 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने

कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

नांदेड दि. 23 एप्रिल :- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने इतर मागास बहूजन कल्याण विभागातंर्गत असलेले इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने नांदेड, लातुर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील लाभार्थ्यांकरीता नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह विष्णुनगर नांदेड या सभागृहात गुरूवार 30 एप्रिल 2026 रोजी  सकाळी 10  वा. कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती  व वनार्टी या योजनेतील पात्र ठरलेल्या/निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण, मा.अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे महोदयांचे  हस्ते करण्यात येणार आहे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याकरीता तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी नारायण झुंझारे व इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी  

जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, विमानतळ रस्ता नांदेड 431605 संपर्क क्र. 02462-220865, वेबसाईट. www.msobcfdc.org येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक

खाजगी विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज सुरू 

नांदेड दि. 23 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षासाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

अनेक शाळाबाह्य विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून जून-जुलै २०२५ च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरिता नाव नोंदणीसाठी संधी देण्यात आली होती. 

त्यानुसार जून-जुलै २०२६ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेसाठी शाळाबाह्य खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 

जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही दिनाक २२ एप्रिल २०२६ पासून सुरु करण्यात आली असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरून भरावयाचे आहेत. 

जून - जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे यासाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत बुधवार २२ एप्रिल २०२६ ते गुरुवार २१ मे २०२६ पर्यंत राहील. 

खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी फेब्रु मार्च २०२६ च्या परीक्षेच्यावेळी ज्या अटी व शर्ती निर्धारित केलेल्या होत्या त्याच अटी व शर्ती जून-जुलै २०२६ च्या परीक्षेसाठी कायम राहतील. सदर अर्ज फक्त नियमित शुल्काने घ्यावयाचे असून याकरिता विलंब, अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही व मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबधित घटकांनी नोंद घ्यावी. 

खाजगी विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ. १२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. १० वी, १२ वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून मंडळाची परीक्षा दयावयाची आहे, त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी. 

नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Corner या option चा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. 

सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (पीडीएफ) काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. 

विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. 

खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी शुल्काचा तपशील  

इ.१०वी :- रु.१ हजार ११०/- नाव नोंदणी शुल्क + रु.१००/- प्रक्रिया शुल्क (Processing Fee)

इ.१२ वी :- रु.१ हजार ११०/- नाव नोंदणी शुल्क + रु.१००/- प्रकिया शुल्क (Processing Fee) 

इ. १० वी / १२ वी जून-जुलै २०२६ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI / Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोचपावती विद्यार्थ्याला, संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या लॉगीन मध्ये प्राप्त होईल.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील (Current Address) जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार, त्यास माध्यमिक शाळांची यादी दिसेल. त्यामधील एका माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणीविषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यम व शाखेनुसार, त्यास उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल, त्यामधील एका उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षा अर्ज, प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक/ तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र/ युडीआयडी कार्डची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ,माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५ वी किंवा इ. ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. १० वी साठी (१७ नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल. 

ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्रमांक 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 23 एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार 24 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 24 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा. शिरूर ताजबंद येथून आगमन व कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा येथे इच्छापुर्ती महादेव मंदिर व संत सदाशिव महाराज मंदीर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. मोहिजा परंडा येथून अहमदपूरकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून लोहा-नांदेड मार्गे भोकरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर विभागाच्यावतीने व समर्थ कॉ.ऑपरेटिव्ह सोसायटी भोकरच्यावतीने सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ- मंजुळानगर भोकर. दुपारी 4 वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. नांदेड भोकर शाखा नवीन वास्तुचा लोकर्पण सोहळा समारंभास उपस्थिती. स्थळ- मार्केट कमिटी परिसर भोकर. सायं. 6 वा. भोकर येथून गोरठा ता. उमरीकडे प्रयाण. सायं. 6.20 वा. कैलास गोरठेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- गोरठा ता. उमरी. सायं. 7 वा. गोरठा येथून शिरूर ताजबंदकडे मोटारीने प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

नांदेड दि. 23 एप्रिल:- पूरग्रस्त भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या विशेष पुढाकारातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या अंतर्गत दक्षा RPTO, उद्यमिता लर्निंग सेंटर येथे पूरग्रस्त भागातील २० तरुणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आले.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर प्रभावित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला. 

या प्रशिक्षणामध्ये हसनाळ, रावणगाव, भिंगोली आणि भाटापूर या गावांतील एकूण २० तरुणांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना डीजीसीए कडून १० वर्षांसाठी  ड्रोन ऑपरेटर परवाना प्रदान करण्यात आला आहे. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. 

प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना ड्रोन पायलट म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यासाठी त्यांना दक्ष RPTO कडून मार्गदर्शन देखील दिले जाणार आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे शेती फवारणीसारखा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारक्षम बनविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा विशेष उपक्रम आहे.

00000






वृत्त क्रमांक

दिशा समितीच्या  बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना 

नांदेड दि. 23 एप्रिल : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज दिशा समितीच्या बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, लोहा व भोकर नगराध्यक्ष यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

या बैठकीत सुरवातीला 24 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या विविध योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. 

प्रत्येक विभागाने बैठक झाल्यानंतर अनुपालन अहवाल समितीला सादर केला पाहिजे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी सुरवातीला सर्व विभागांना केल्या. त्यानंतर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या पुर्ण, अपूर्ण कामाबाबतची यादी सादर करणे, स्त्रोत नाही तिथे काम झाले का, निधीचा प्रश्न, आतापर्यत किती कामे पूर्ण झाली याबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी विचारणा केली. याबाबत जलजीवन मिशन योजनेबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. 

जिल्ह्यात व शहरात सध्या महावितरणच्या अनेक समस्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. लोडशेडींगसह अचानक विज गायब होण्याच्या घटनेने नागरिक त्रस्त असून याबाबत महावितरणने कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच येत्या 5 वर्षाच्या कालावधीत शहरात सर्व केबल अंडरग्राऊड करण्याचे काम पूर्ण व्हावे अशा सूचना खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. 

विजेच्या समस्या सोडविण्याबाबत तरोडा भागात 8 नवे ट्रान्सफार्मर बसविले असून इतर भागातही  ट्रान्सफार्मर बसविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. यासह इतरही समस्या लवकरच सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल व सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले. 

यावर्षी नांदेड जिल्ह्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 813 कोटी रुपयांचा पिकविमा परतावा मंजूर झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे यावेळी अभिनंदन केले. खताचे लिंकीग, भरारी पथके, खताचा तुटवडा होवू नये यासाठी खबरदारी, खताचा पुरेसा साठा, युरियाचा पुरवठा, मागणी प्रमाणे उपलब्धता, विक्री या विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. लिंकीगमुळे शेतकऱ्यांना खताच्या बाबतीत त्रास होवू नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. 

शहराला दैनंदिन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अमृत मिशन 2 यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. नुकतेच इस्लामपुरा भागात चार शाळकरी मुलांचा खड्डयात पडून मृत्यू झाला याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती खासदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिकेकडून घेतली. या मृत्त मुलांना योग्य ती मदत मिळेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  

महामार्गाच्या पायाभुत सुविधा, दूरसंचार पायाभूत सुविधा कार्यक्रम, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत मिशन 2.0, पाटबंधारे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पीएम सुर्यघर योजना, रेल्वे विभाग यासह सर्व योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष खासदार रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी व विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. या शिवाय आवश्यकतेनुसार महत्वाच्या विभागांचा आढावा स्वतंत्र बैठक घेवून घेण्यात येईल अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

बारूळ धरण सिमेंट कॅनल बांधकाम सुरु असून संबंधित बांधकाम करत असताना नवीन मुरूम ऐवजी बाजूच्या शेतातील माती काढून कॅनल बांधकाम चालू आहे. भविष्यात शेतीचे नुकसान होऊ नये या करिता धानोरा, कांडाळा, होटाळा येथील शेतकऱ्याची उखरलेली जमीन भरून देण्यात यावी असे खासदार डॉ. काळगे यांनी सांगितले. 

यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रस्ते विकास, वीज समस्या, रस्ते अपघात, खताचा तुटवडा, खत लिंकींग याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  

यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध विभागामार्फत करण्यात येणार कामे व सुरु असलेल्या विकास कामांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन उपाययोजनाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. 

00000










वृत्त क्रमांक   इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन   नांदेड दि. 23 एप्रिल :...