Tuesday, December 17, 2024

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

  वृत्त क्र. 1206

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू 

 नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा 

नांदेड दि. 17 डिसेंबर : बदललेली जीवनशैली व ताण तणावाचे वातावरण यामुळे अनेक ठिकाणी योग्य उपचार व नेमक्या वैद्यकीय विश्लेषण व सल्ल्या अभावी वंध्यत्व व उशिरा गर्भधारणेची समस्या समाजामध्ये जाणवते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांनी शासकीय आरोग्य संस्थामध्ये या संदर्भातील मार्गदर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या समाजामध्ये वंध्यत्वाचे व उशिराने गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च 2024 पासून जिल्हा प्रशासन व श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यातर्फे वंधत्व निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 6 उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय याठिकाणी फर्टिलिटी ओपीडी अर्थात वंध्यत्व निवारणासाठी विशेष ओपीडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाते.

  

 आतापर्यंत सरासरी प्रत्येक महिन्यात 500 पेक्षा जास्त ' नागरिकांनी या ओपीडीला भेट देऊन आपल्या समस्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अंकुर फुटण्यास यामुळे मदत झाली आहे.

      या ओपीडीमध्ये आलेल्या नागरिकांच्या अनुभवावरून हे लक्षात येते की, बहुतांश जीवनशैली व ताणतणावामुळे उशिराने गर्भधारणा होणे किंवा न होणे अशा प्रकारे त्याचे परिणाम होतात. तसेच मुलभूत स्वरुपाच्या तपासण्या करून उदाहरणार्थ सिमेन अॅनालिसिस,फॉलिक्युलर स्टडी तसेच हॉर्मोन्स तपासणी हे करून वंध्यत्वाचे किंवा उशिरा गर्भधारण होण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. 

या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांच्या जीवनात नवीन अंकुर फुलण्यास मदत होत आहे. आगामी काळात हा उपक्रम मोठ्याप्रमाणत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी फलदायी अशाप्रकारचा राहणार आहे. तसेच या सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचा कल असून नागरिकांनी अत्यंत नैसर्गिक असणाऱ्या या समस्येसाठी योग्य सल्ला घेण्याच्या आवाहनही जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने केले आहे.

0000

तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा

  वृत्त क्र. 1205

तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा 

नांदेड, दि. 17 डिसेंबर :- राज्य शासनामार्फत यावर्षी मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर्षी होणाऱ्या प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. त्यामुळे शासन सेवेत येण्यास इच्छूक असणाल्या गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे. स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक नव्या वर्षात तुमची वाट बघत आहे. 

नव्या वर्षात 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पुर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पुर्व परीक्षा नुकतीच झाली असून 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे. 

तसेच दिनांक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पुर्व परीक्षा 28 सप्टेंबर, 2025, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आदिंचा समावेश आहे. याशिवाय यावर्षेभरात झालेल्या पुर्व परीक्षांच्या सर्व मुख्य परीक्षा या वर्षेभरात होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबतची अधिकची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

स्वाधार योजनेची मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

  वृत्त क्र. 1204

स्वाधार योजनेची मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत 

 अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा 

नांदेड दि. १७ डिसेंबर : वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून नाराज न होता खाजगी स्तरावर भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारी अनुसूचित जातींसाठीची लोकप्रिय योजना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री. शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्या विद्यार्थ्यांना खाजगी स्तरावर राहण्यासाठी भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही योजना आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या मुलांनी घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

वसतीगृह स्तरावरून रिजेक्ट करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना व ज्या विद्यार्थ्यांनी वसती गृह स्तरावरून रिजेक्टचा अर्ज स्वाधार सर्विस ला कन्वर्ट किंवा वर्ग करावा म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना विनंती अर्ज केला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी यासंदर्भात एडिट ऑप्शन आल्यानंतर स्वाधार सर्विस हे ऑप्शन निवडून स्वाधारला अर्ज भरावा. अर्जाची प्रिंट काढून स्वाधार सव्हीस हे ऑप्शन निवडून स्वाधारला अर्ज भरावा.

शासन निर्णयातील निकषानुसार सर्व कागदपत्रे जोडून अर्जाची प्रिंट काढून स्वाधार शासन निर्णयातील निकषानुसार सर्व कागदपत्रे जोडून संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रात विहित कालावधीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज भरून घ्यावे, असे आवाहन श्री. शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

0000

आज अल्पसंख्यांक हक्क दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात व्याख्यान नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन

  वृत्त क्र. 1203

आज अल्पसंख्यांक हक्क दिवस 

 जिल्हाधिकारी कार्यालयात व्याख्यान 

 नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि.१७ डिसेंबर : जगभरातील राष्ट्रीय वार्षिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्व समाजाने पुढे यावे असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले आहे. 18 डिसेंबर हा जगभर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. निमित्त आयोजित व्याख्यानाला जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या१८ डिसेंबरला अकरा वाजता उपस्थित राहण्याच्या आवाहन प्रशासनाने केले आहे.

        जगभरात विविध ठिकाणी विविध जाती, धर्म ,पंथ ,भाषिक समुदाय, अल्पसंख्यांक ठरतात. बहुसंख्यांकांमध्ये अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व व त्यांच्या न्याय हक्काचे रक्षण व्हावे यासाठी अशा समुदायांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला जातो. 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वार्षिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला आहे.

      या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्यानुसार 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता या संदर्भातील एक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंत्रालयातील सेवानिवृत्त सहसचिव अॅडवोकेट देवेंद्रसिंग निर्मले, तसेच सामाजिक विज्ञान नारायणा ई टेक्नो स्कूल नांदेड येथील विभाग प्रमुख श्री. इर्शाद अहमद या दोन वक्त्यांचे व्याख्यान उद्या होणार आहेत. तरी अल्पसंख्यांक समुदायातील तसेच मागासवर्गीयातील समुदायांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 उद्या बरोबर अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमाती व विविध वर्गातील सर्व मान्यवर आमंत्रित आहेत.

0000

अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल

  वृत्त क्र. 1202

अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल 

 जिल्हा परिषद सिईओ मीनल करनवाल यांनी दिली ग्‍वाही 

- पायाभूत सुविधांमध्‍ये यावर्षी वाढ 

  - सुरक्षा, स्‍वच्‍छता, जागरुकतेकडे लक्ष 

 - लावणी महोत्‍सव यावर्षीही आकर्षण 

        - पाच दिवसांच्‍या नियोजनाची माहिती जाहीर 

 नांदेड, 17 डिसेंबर: महाराष्‍ट्रातील महत्‍वपूर्ण तसेच दक्षिण भारतात प्रसिध्‍द असलेली असलेल्‍या माळेगाव यात्रेला यंदाही संस्‍मरणीय ठरविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन कामाला लागले आहे. यंदा अधिक प्राथमिक व मुलभूत सुविधा उपलब्‍ध केल्‍या जातील. या यात्रेचे औचित्‍य, महत्‍व आणि परंपरेला जोपासण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्‍न केले जातील, अशी ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली.

आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशंतवराव चव्‍हाण सभागृहात माळेगाव यात्रा पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद घेण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, समाज कल्याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील गिरी, नरेगाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, प्रभारी कार्यकारी अभियंता बांधकाम संजय शिंदे, विशाल चोपडे, आदींची यावेळी उपस्थिती होती 

दिनांक  29 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्‍या कालावधीमध्‍ये माळेगाव यात्रा असेल. 29 डिसेंबर रोजी देवसवारी आणि पालखी पुजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे. पाच दिवसांमध्‍ये शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी व पशु प्रदर्शन असेल. कृषिनिष्‍ठ शेतक-यांचा सत्‍कार, अश्‍व, श्‍वान, कुकूट प्रदर्शन व विविध स्‍पर्धेचे उद्घाटन, कुस्‍त्‍यांची दंगल, पारंपारीक लोककला महोत्‍सव, महिला आरोग्य शिबिर तसेच शेवटच्‍या दिवशी लावणी महोत्सव प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

 कुस्ती दंगल व लोककला महोत्सव: पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

   यंदाची यात्रा प्‍लास्टिकमुक्‍त यात्रा करण्‍यावर भर असेल. कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर, हॉटेल व खानावळांसाठी डस्टबिन्स ठेवण्यात येतील. मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती आणि महिला बचत गटांकडून कापडी पिशव्यांचे स्टॉल्स उभारले जातील. ॲम्बुलन्स आणि रुग्णवाहनासाठी बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मागील वर्षी तलावाच्या 50 टक्के पायऱ्यांचे काम पूर्ण झाले होते, यंदा उर्वरित पायऱ्यांसह पालखीसाठी ओटा तयार केला जाईल. रस्ते मोकळे ठेवून छोटे व्यापारी एकत्रितपणे ठराविक जागेवर दुकाने लावू शकतील, असे जिल्हा परिषदेने नियोजन केले असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले आहे.

जिल्हा परिषदेने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, अन्‍न व औषध प्रशासन, अग्निशमन, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, बीसएसएनएल, राज्‍य परिवहन महामंडळ, देवस्थान समिती आणि अन्य विभागांच्या समन्वयाने यात्रा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले. यात्रेतील प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुविधा-संपन्न वातावरण देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्‍याचेही त्‍या म्‍हणाल्‍या. जिल्हा परिषदे कडून होणाऱ्या या उपायोजनेत व सुविधांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी स्वच्छता राहण्यासाठी जागरूक असावे तसेच सहकार्य करावे, विद्यार्थी स्वयंसेवक व यात्रेकरूंनी देखील यात्रेमध्ये शासनाने निर्माण केलेल्या सोयी सुविधांचा उपयोग घ्यावा तसेच स्वच्छता व शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

0000





    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...