सर्वधर्म समभाव आणि एकजूटीची
भावना सर्वांनी वृद्धींगत करावी
-
पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 26 :- भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या
थोरांचे स्मरण करुन प्रत्येकाने सर्वधर्म समभाव आणि एकजूटीची भावना वृद्धींगत
करावी, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम
यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक
दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज
पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री कदम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई
पवार, महापौर शिलाताई भवरे, आमदार हेमंत पाटील, आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर,
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक
चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा
आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज
कारभारी आदी मान्यवर पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
जनतेला प्रजासत्ताक
दिनाच्या शुभेच्छा देवून पालकमंत्री ना. कदम म्हणाले की, देशाच्या सिमेवर
पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद पाहता आपल्या भारतीयांना एकजूट दाखवून एकत्रित लढा
दिला पाहिजे. सिमेवरील आपल्या जवानाला धीर दिला पाहिजे. आपण सर्वांना जाती-पाती,
भेदभाव विसरुन एकत्रितपणे पुढे येण्याची गरज आहे.
राज्यात शेतकरी सुखी नाही . अजूनही आत्महत्या होत आहे. महाराष्ट्र बलवान आहे.
आपल्या सर्वांना एकत्रितपणे जातीय तेढ निर्माण होणार नाही, अशी भूमिका घेण्याची
गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री ना.
कदम यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांची भेट घेवून संवाद साधला . तसेच
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगुज केले. याप्रसंगी केंद्रीय राखीव बल (मुदखेड),
राज्य राखीव बल अमरावती, सशस्त्र पोलीस पथक (क्युआरटी), सशस्त्र पोलीस पथक (पोलीस
मुख्यालय) , सशस्त्र पोलीस पथक (नांदेड शहर) , शहर वाहतूक शाखा पथक (नांदेड शहर), पुरुष
गृहरक्षक दल पथक , अग्निशमन दल पथक (म.न.पा), एनसीसी मुलांचे पथक (सायन्स महाविद्यालय)
, महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले पथक, महात्मा फुले हायस्कूल गाईड मुलींचे
पथक, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल मुले स्काऊट, पोलीस बँड पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक
व नाशक पथक, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर, मिनी
रेस्क्यू फायर टेंडर, 108 आपतकालिन रुग्णवाहिका यांनी संचलन केले. प्राथमिक शिक्षण
विभाग, वन विभागाचा चित्ररथही संचलनात सहभागी झाला होता.
पालकमंत्री ना. कदम यांच्या
हस्ते पोलीस उपअधीक्षक विश्वेश्वर प्रभाकर नांदेडकर यांना महामहिम राष्ट्रपती पोलीस
पदक जाहीर झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. हेमंत गोडबोले
(न्यायवैद्यकशास्त्र), श्रीमती वालूबाई विश्वनाथ मुंडे, स्काऊट गाईड राज्यस्तरीय पुरस्कार
प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच
नेहरु युवा केंद्रच्यावतीने अल-इम्रान प्रतिष्ठान (बिलोली) यांना उत्कृष्ट युवा मंडळ
पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी महात्मा फुले हायस्कूल , सावित्रीबाई फुले
विद्यालय , प्रतिभा निकेतन हायस्कूलच्या मुलींची मासपीठी व महात्मा फुले
हायस्कुलचे श्री कडटकर रघुनाथ यांच्या मार्गदर्शनाखालील लेझीम पथकांनी नागरिकांची मने
वेधून घेतली. सुत्रसंचालन व्यंकटेश चौधरी, स्नेहलता स्वामी यांनी केले. या
समारंभास शालेय विद्यार्थी , विद्यार्थींनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
****