Thursday, December 19, 2024

 वृत्त क्र. 1219

शासकीय निवासी शाळा हदगाव येथे 

जिल्हास्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धा संपन्न 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय निवासी शाळांचे जिल्हास्तरीय क्रीडा व कलाविष्कार स्पर्धा-2024 समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाल्या. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णयक्षमता, सहानुभुती, शिस्त व सहकार्याची भावना निर्माण होते. या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो, असे मत सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले. 

या स्पर्धेचे उदघाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हदगावचे शासकीय ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य फारुकी ए.डब्ल्यु, तालुका क्रीडा संयोजक प्रा.अजय चौधरी, स.क.निरीक्षक पी. जी.खानसोळे, आर.डी.सुर्यवंशी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, वसतिगृहाचे गृहपाल, इतर कर्मचारी उपस्थीत होते. जिल्हास्तरीय क्रिडा व कलाविष्कार स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

000

 वृत्त क्र. 1218 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144 

नांदेड, दि. 19 डिसेंबर :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त क्र. 1217 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड, दि. 19 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यात 18 डिसेंबर 2024 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

 वृत्त क्र. 1216 

प्रशासनात मराठी भाषेचा वापर करा

मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करा 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- महाराष्ट्र शासनाने 14 मार्च 2024 रोजी मराठी भाषा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार महसूल व अन्य सर्वच विभागाने प्रशासनात मोठ्याप्रमाणात मराठी भाषेचा वापर करावा. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

यासंदर्भात मराठी भाषा विभागाने व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासकीय आदेशाचे पालन करण्यात यावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेतून संभाषण करणे, मुळप्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिपण्या, आदेश, संदेशवहन मराठीतूनच करणे आवश्यक आहे. सूचना फलक, अधिकाऱ्याचे नाव फलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

जाहिरात प्रसिद्धी, प्रचार यामध्ये देखील मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. मालमत्ता खरेदी विक्री करतांना संस्था यांच्यामध्ये करण्यात येणारे खरेदीदस्त या देखील मराठी, इंग्रजी असा द्वैभाषिक स्वरूपात नोंदणी आवश्यक आहे. प्रसार माध्यमांनी देखील वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती, निविदा सूचना मराठी भाषेतूनच देणे अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेसंदर्भात असणाऱ्या सर्व निर्देशाचे पालन करण्याबाबत दक्ष असावे असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 1215 

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या

जन्मदिवसाला सुशासन दिन साजरा करा   

नांदेड दि. 19 डिसेंबर :- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाचे आयुक्त, पोलीस अधिक्षक व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळण्यात यावा. तसेच 19 ते 25 डिसेंबर या काळामध्ये वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात यावा. 

जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

00000

 वृत्त क्र. 1214 

संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील

लाभार्थ्यांनी बँकेशी आधार संलग्न करावे   

नांदेड दि. 19 डिसेंबर :- विशेष सहाय योजनेतील अर्थात संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनातील जिल्ह्यामधील मंजूर 2 हजार 125 लाभार्थ्यांनी अद्यापही आपले बँक खाते आधारशी संलग्न करून घेतले नाही. अशा निराधार लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे तातडीने बँकेशी आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने आवाहन केले आहे.    

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना बँक किंवा पोस्ट खाते आधार क्रमांकाशी संलग्न अर्थात जोडल्या गेल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप केले जाते. हा शासन निर्णय आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 2 हजार 125 लाभार्थी नव्याने पात्र ठरले असून या नव्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार खात्याशी संलग्न केले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाजसेवकांना, नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की अशा लाभार्थ्यांची मदत करावी. त्यांना सेतू केंद्र व बँक येथे पोहोचवून त्यांचे खाते आधार कार्डशी जोडून घ्यावे, यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे तहसिलदारांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 1213 

माळेगाव यात्रेमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शन

व कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण समारंभ होणार 

स्टॉल नोंदणीची आजची शेवटची तारीख 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषि प्रदर्शन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे, शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली आहे. यामध्ये मोठ्यासंख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या खंडोरायाच्या यात्रेनिमित्त कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके, भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावे, प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे. विजेत्या शेतकऱ्यांना 4 हजार, 3 हजार व 2 हजार बक्षिस देण्यात येणार आहे. 

यासाठी 80 स्टॉल्सचे नियोजन केले आहे. यामध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, औषधे, ट्रॅक्टर निर्माण, औजारे उत्पादन तसेच महिला बचतगटाचे आरोग्य विभागाचे, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञानकेंद्र, महाबिज, खादीग्रामोद्योग अशा विविध स्टॉल्सचा समावेश असेल. ज्यांना प्रदर्शनादरम्यान आपला स्टॉल्स उभारावयाचा आहे त्यांनी कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी माने यांनी केले आहे.

00000  

 वृत्त क्र. 1212

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अंतर्गत बाजारासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत सणासुदीच्या काळामध्ये महिला स्वयंसहायता बचतगटांना जिल्ह्याच्या ठिकाणी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यासंदर्भातील धोरण निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिली. 

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या समावेश असणारी समिती यासंदर्भात गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. 

नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी यासंदर्भात आज विविध अधिकाऱ्यांना माहिती दिली. समितीला बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत नेमकी कोणती कार्यवाही करायची याबाबतची माहिती दिली. यावेळी जागा उपलब्धतेच्या बाबत चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणत्याही यंत्रणेची अडचण असल्यास तातडीने लक्षात आणून द्यावेत. यासंदर्भातील शासन निर्णयातील नियमांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.   

000

 वृत्त क्र. 1211 

जिल्ह्यामध्ये शासनाकडून 94 टक्के

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप

शासनाचे कुठेही दुर्लक्ष नसल्याचे प्रशासनाकडून खुलासा 

नांदेड दि. 19 डिसेंबर :- विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटपाची क्रमवारी, कालावधी व प्राथमिकता ठरली आहे. जिल्ह्यात कुठेही रहिवासी दाखला, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागला नसून 1 एप्रिल 2024 पासून 19 डिसेंबर पर्यंत 94 टक्के प्रमाणपत्र विहित वेळेत देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केली आहे. 

रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र आदींसाठी विशिष्ट वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत दाखले तयार होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातप्रमाणत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासंदर्भात विहित वेळेत कार्यपद्धी अवलंबून लाभार्थ्यांना लाभ देण्याची सरासरी टक्केवारी 93 टक्के आहे. यासंदर्भातील आकडेवारी सर्वांपुढे असून उत्तरोत्तर ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ज्याठिकाणी हे काम चालते त्याठिकाणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कालबद्ध पद्धतीने सर्व अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे हे अर्ज केल्यानंतर कोणालाही हेलपाटे होणार नाही, प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
गेल्या वर्षभरात 1 एप्रिल पासून राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासंदर्भात 19 डिसेंबर पर्यंतची आकडेवारी बोलकी आहे. रहिवासी दाखल्यासाठी आतापर्यंत 70 हजार 841 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 64 हजार 932 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. केवळ 9 हजार 83 अर्ज बाकी आहेत. ही टक्केवारी 91.66 येते. तसेच जातप्रमाणपत्राची मागणी 60 हजार 302 विद्यार्थ्यांनी केली. 48 हजार 701 विद्यार्थ्यांना अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ही टक्केवारी 80 टक्क्यांवर येते. उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात 2 लाख 87 हजार 263 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 2 लाख 78 हजार 218 अर्ज मंजूर करण्यात आले असून ही टक्केवारी 97 टक्के आहे. नॉन-क्रिमिलेयर संदर्भात 31 हजार 320 अर्ज करण्यात आले होते त्यापैकी 29 हजार 133 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ही टक्केवारी 93 टक्के आहे.
  

शासन विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासंदर्भ दक्ष आहे. तथापि आणखी कोणाला याबाबत त्रास झाल्यास किंवा अर्जाला मान्यता न मिळाल्यास संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर  यांनी केले आहे.

0000

  ​ वृत्त क्र.   74   नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन चा जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार   ·          विद्यार्थ्या...