Tuesday, August 13, 2019


आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांची
अद्यावत माहिती त्वरीत सादर करावी
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड दि. 13 :- जायकवाडी धरणातील सोडण्‍यात येणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यात पुरापासून नुकसान होणार नाही यासाठी संबंधीत विभागाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन आराखड्यांची अद्यावत माहिती जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्षात त्वरीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. 
जायकवाडी धरणातील सोडण्‍यात येणाऱ्या विसर्गामुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता प्रतिबंधीत उपाय योजनेसाठी जिल्‍ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक कक्षात घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस.के.सब्‍बीनवार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.बी.पी.कदम, जि.प.जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता, संतोष वाहने, प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश प्र.राऊत यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, आदींची यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, जायकवाडी प्रकल्‍पातील पाणी सोडल्‍यानंतर गोदावरी नदीपात्रापासून बाधीत होणाऱ्या गावांमध्‍ये पुरापासून नुकसान होणार नाही यासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत गावकऱ्यांशी चर्चा करुन आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. मागील पुरामधील उपाययोजनांची माहिती घेऊन तसा आराखडा तयार करावा. पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणातून सोडण्‍यात येणाऱ्या पाण्‍याची व किती गावे बाधीत होतील याची माहिती जिल्‍हा व तालुका प्रशासनास दयावी. अन्नधान्य, औषधीचा पुरवठा, आरोग्‍य पथक यासह आवश्यक उपाययोजनांसाठी तत्पर रहावे. स्‍थलांतरीत नागरीक तसेच जनावरांसाठी सुरक्षीत स्‍थळाची पाहणी करुन नदीपात्रात व्‍यक्‍ती, जनावरे वाहून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्‍ते व पुलाची स्थिती लक्षात घेऊन त्‍याची दुरुस्‍ती करावी. महापालिका, नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने तसेच महापालिकेने आवश्यक बोटीसह सतर्क रहावे. जीवनरक्षक, पोहणारे व्‍यक्‍ती यांचे पथक गठीत करुन सुरक्षितस्‍थळांचे  नियोजन करावे. पुरामुळे विद्युत पुरवठा बंद करुन पूर ओसरल्‍यानंतर विद्युत पुरवठा सुरु करण्याबाबत दक्षता घ्‍यावी. पूररेषेमध्‍ये असलेल्‍या नागरीकांना सुरक्षितस्‍थळी जाण्‍यासाठी नोटीसा देऊन त्‍यांना सुरक्षितस्‍थळी जाण्‍याच्‍या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिले.   
अधीक्षक अभियंता श्री सब्‍बीनवार यांनी सद्यस्थितीत जायकवाडी प्रकल्‍पात 90.44 टक्‍के पाणीसाठा असून 1 हजार 500 क्‍युसेक पाणी नदीपात्रात येत आहे. सद्यस्थितीत धोका नाही परंतु यापेक्षा अधिक पाणी जमा झाल्‍यास गोदावरी नदीपात्रात जास्त पाणी येण्‍याची शक्‍यता आहे. जायकवाडीतून पाणी सोडल्‍यानंतर 72 तासात नांदेडला पाणी येण्‍यास वेळ लागतो परंतु हवामान खात्‍याच्‍या सूचनेनुसार आवश्‍यक ती दक्षता घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्यांनी सांगीतले.
नांदेड शहरातील सखल भाग 11 ठिकाण असून घरामध्‍ये पाणी जाऊन बाधीत होणाऱ्या भागासाठी नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे. पूर परिस्थितीमध्‍ये सीआरपीएफ मुदखेड तसेच श्री गुरुव्‍दारा लंगरकडून मदत घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  
0000


जिल्हा परिषदेच्या प्रांगणात
रक्षाबंधनानिमित्त स्टॉल
नांदेड, दि. 13 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत स्वयं सहाय्यता समुहाना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रक्षाबंधानानिमित्त राखी विक्रीचे पाच स्टॉल लावण्यात आली आहेत. येथे माफक दरात नागरिकांना विविध प्रकारच्या राखी उपलब्ध असून रक्षाबंधनानिमित्त येथे राखी खरेदी करुन महिला स्वयं सहाय्यता समुहाला पाठबळ दयावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
00000


स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात आज
पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 72  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त गुरुवार 15 ऑगस्ट, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
000000

सुधारीत वृत्त


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड दि. 13 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 14 ऑगस्ट 2019 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने रात्री 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
गुरुवार 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.05 वा. ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 9.30 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

0000


जिल्हा ग्रंथालय कार्यालयात
 डॉ. एस. आर. रंगनाथ जयंती
निमीत्त ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम संपन्न
          नांदेड दि. 13 :- भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत. त्यांचा जन्म दिवस सर्वत्र ग्रंथपालन दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथपद्रर्शनाचे द्घाटन साहित्यिक, कलावंत देवदत्त साने यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हूणन विधी महाविदयालयाचे ग्रंथपाल प्रा. राजीव वाघमारे, डॉ राम  मनोहर लोहिया महानगरपालिकेचे ग्रंथपाल संजीव कार्ले हे उपस्थित होते.
         याप्रसंगी देवदत्त साने यांनी वनात ग्रंथाचे वाचनाचे महत्व विशद केले. तसेच ग्रंथालय क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीबाबत माहिती दिली.
या ग्रंथपद्रर्शनातील ग्रंथाचा लाभ जिल्हयातील नागरिक, विद्यार्थ्यानी घ्यावा, असे अवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आषिश ढोक यांनी याप्रसंगी केले.
कार्यंक्रमाचे सुत्रसंचालन आभार प्रताप सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमास को. मा. गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके, प्रसाद आवतिरक, अंकुश टेकाळे, गौरव राजमोड, प्रशांत पाटील, विना कातळे, रुक्मीण सावते, मोनिका दाबेवार, सरिता गायकवाड, धुते शितल, ऐश्वर्या फड मनिषा आराळे, सुवर्णमाला किर्ती यांच्यासह अनेक विद्यार्थी वाचक उपस्थित होते.
000000



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
                                                                    00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...