Saturday, May 20, 2017

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन दयावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे व बँकाचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पिकांच्या पेरणी पूर्वी रक्कम मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी दिलेल्या उद्दीष्टानुसार पीक कर्जाचे तातडीने वाटप करावे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी मेळावे घेऊन पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.
सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगटाकडून रोजगार व व्यवसायासाठी तसेच विविध योजनेच्या लाभासाठी कर्जाचे प्रस्ताव बँकाकडे येत असतात. हे प्रस्ताव ही तात्काळ मंजूर करुन त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले पाहिजे असेही त्यांनी सूचना दिल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बँकाकडे येणारी कर्ज प्रकरणे त्वरेने मंजूर करण्याबरोबर अर्थसहाय्यही उपलब्ध करुन दिले पाहिजे असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान आवास योजना, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य, मुद्रा योजना, आदी योजना संबंधी बँकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे यांनी पीक कर्ज व आदी योजनेंतर्गत दिलेली उद्दीष्ट व उद्दीष्टपुर्ती केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

000000
क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज मंगळवार 30 मे 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन परिपूर्ण अर्जासह प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.    
या योजनेअंतर्गत क्रीडांगण विकसीत करणे, बंदिस्त प्रेक्षागृह, ॲस्ट्रोर्टफ हॉकी क्रीडांगण, लॉन टेनिस कोर्ट, जलतरण तलाव व विविध खेळांचे क्रीडा साहित्य आदी सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण- 2012 अन्वये राज्यातील महत्वाची एक प्रमुख शिफारस क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सुविधा सहाय्य करणे ही योजना दि. 1 मार्च 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुर करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणीक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानीक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे त्यामुळे खेळाडुंच्या कामगिरीत वाढ होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्राप्त अर्जाची तपासणी करुन परिपूर्ण अर्ज आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी नांदेड क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे यांच्याकडे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

0000000
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण
समितीची सोमवारी होणारी बैठक रद्द
नांदेड, दि. 20 :-  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा ) ची बैठक सोमवार 22 मे 2017 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. विधानसभा विशेष अधिवेशन 20 ते 22 मे 2017 या कालावधीत होत असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. सभेची पुढील तारीख निश्चित होताच संबंधितांना कळविण्यात येईल, असे नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) चे सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.

000000
सुधारीत वृत्त क्र. 432
गौण खनिज कार्यवाहीत
1 लाख 42 हजार रुपयाचा दंड
नांदेड, दि. 20 :- अनाधिकृत गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसिल कार्यालय नांदेड अंतर्गत विविध बैठे व भरारी पथक कार्यान्वीत करण्यात आले आहेत. या पथकाने रात्रगस्त घालून अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या बारा वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करुन 1 लाख 42 हजार 800 रुपये वसुल केली आहेत.
मौ. गंगाबेट गट नं. 36 गोदावरी नदीपात्रातून अंदाजे 600 ब्रास अनाधिकृत रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याबाबत लिलावाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील व नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती तहसिलदार नांदेड यांनी दिली आहे.

0000000
जिल्हा समादेशक होमगार्ड पदाचा
मंगेश शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
नांदेड, दि. 20 :- नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी बुधवार 3 मे रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड या पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारला असल्याची माहिती नांदेड जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक यांनी परिपत्रकान्वये दिली आहे. 
यापुढे गोपनीय व अर्धशासकीय पत्रव्यवहार मंगेश शिंदे, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक नांदेड या नावाने पाठविण्यात यावे. दूरध्वनी क्रमांक कार्यालय 02462- 232961, भ्रमणध्वनी 9921998959, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

0000000
"उज्ज्वल नांदेड" मोहिम विद्यार्थ्यांनी आपलीशी केली
- कार्यकारी संचालक सुरेश काकाणी
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यातील युवकांचा प्रशासनातील सहभाग वाढावा, स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना सक्षम करणे यासाठी सुरु करण्यात आलेली "उज्ज्वल नांदेड" मोहिविद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन आपलीशी केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सुरेश काकाणी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सेतू समिती अभ्यासिका, मनपा डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील हे होते.  यावेळी कार्यक्रमास पुणे येथील प्रा. मनोहर भोळे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथपाल संजीव कार्ले व आरती कोकुलवार यांची उपस्थिती होती.
            श्री. काकाणी पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा देवून शासन सेवेत रुजू झाली आहेत. कष्टामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. "उज्ज्वल नांदेड" मोहीम राबविण्यात विद्यार्थी, विषयतज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेला सहभाग व त्यातून निर्माण झालेला स्नेह सदैव आठवणीत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विनम्र भावनेने व ज्ञानपिपासूपणे ज्ञान घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सेतू समिती अभ्यासिकेत सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असे अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. प्रा. भोळे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेसंबंधी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी  सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी वर्ग एक कनिष्ठ स्तर न्यायाधीश या पदी इरफान अली खान यांची निवड झाल्याबद्दल सुरेश काकाणी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इरफान खान, ऐश्वर्या धूत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. त्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी तर आभार समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी मानले. संजय कर्वे, कोंडीबा गादेवाद, बाळू पावडे, रघूवीर श्रीरामवार, सुप्रिया धोत्रे, संगीता राठोड, आशा देशमुख, मंगल जाधव, सुप्रिया कार्ले, सुनीता हंद्रे, कुशवर्ता शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

000000
सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावांना
भेटी देवून विकास कामांचा आढावा घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात सांसद आदर्श ग्राम योजना व आमदार आदर्श ग्राम योजनांतर्गत निवडलेल्या गावांना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देवून विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा  सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज दिल्या.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात सांसद आदर्श ग्राम योजना व आमदार आदर्श ग्राम योजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोज अधिकारी एस. ए. थोरात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, आदी अधिकारी उपस्थित होते.
या योजनेतील निवडलेल्या गावांचा सर्वांगीण अभ्यास संबंधीत अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. ग्राम विकासाच्या आराखड्यात समाविष्ट कामे व योजनांची माहिती जनतेला संवादाच्या माध्यमातून दिल्यास लोकसहभाग वाढेल आणि कामांना अधिक गती येईल, असे सांगून श्री. डोंगरे यांनी गावात प्रस्तावित, पूर्ण व प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला.
सांसद आदर्श ग्राम योजना व आमदार आदर्श ग्राम योजनेत निवड झालेल्या गावात अधिकाऱ्यांनी विविध विकास योजनांची जनजागृती केली पाहिजे, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.
या बैठकीस संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषि , पाटबंधारे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य, क्रीडा आदि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...