Sunday, November 17, 2024

 वृत्त क्र. 1111

निवडणूक कर्मचाऱ्यासाठी  133 बसेसची व्यवस्था

• लांब पल्ल्याच्या बसेस आज 18 ला दुपारी दोन वाजता निघणार

•जवळच्या कार्यक्षेत्रासाठी 19 नोव्हेंबरला पहाटे 5 ते 7 व्यवस्था

नांदेड दि. 17 नोव्हेंबर :-  नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना 18 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदारसंघात नेऊन सोडणे व 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर परत संबंधीत कर्मचारी यांना त्यांच्या मुळ विधानसभा मतदार संघात आणण्यासाठी 44 सीटरच्या एकूण 133 बसेस वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्त्या व वेळा बघून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. 

लांब पल्ल्यासाठी उद्या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 तर जवळच्या केंद्रासाठी 19 तारखेला सकाळी 5 ते 7 या काळात कर्मचाऱ्यांसाठी बसेस उपलब्ध राहणार आहेत. आपल्या नियुक्त क्षेत्राकडे जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

कुठून निघतील बसेस  

83 -किनवट मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यासाठी शासकीय आयटीआय गोकुंदा, किनवट येथून बसेस निघणार आहेत. ८४ हदगाव मतदारसंघासाठी समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, बुध्दभूमी वसाहत, तामसा रोड, हदगाव येथून बस निघतील. 85 भोकरसाठी नगरपरिषद नांदेड रोड, भोकर येथून तर 86 -नांदेड उत्तर व 87- दक्षिणसाठी शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथून बसेस निघणार आहेत. ८८ लोहासाठी पंचायत समिती, तहसिल कार्यालय परिसर लोहा येथून तर नायगावसाठी  शासकीय आयटीआय, नायगाव येथून बसेस निघणार आहेत. 90- देगलूरसाठी तहसिल कार्यालय, देगलूर येथून तर 91-मुखेडसाठी मुख्य प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, मुखेड येथून बसेस निघतील. 

अशी आहे निवास व्यवस्था 

किनवट मतदारसंघासाठी मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी (चि) किनवट येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तर हदगाव मतदारसंघासाठी मुलींचे वस्तीगृह इमारत क्र. २ तीसरा मजला, हदगाव येथे तर 85 भोकर साठी ओम लॉन्स मंगल कार्यालय, बायपास रोड, भोकर येथे निवास व्यवस्था केली आहे. 86 -नांदेड उत्तर व 87- दक्षिणसाठी निवास व्यवस्था ए.के.संभाजी मंगल कार्यालय, नांदेड येथे केली आहे. ८८ लोहा साठी निवास व्यवस्था श्रीनिवास मंगल कार्यालय साई गोल्डन, सिटी मेन रोड, लोहा येथे केली आहे. ८९- नायगावसाठी सामाजिक न्याय भवन, निवासी वसतीगृह नायगाव येथे निवास व्यवस्था येथे केली आहे. 

90- देगलूर मतदार संघासाठी निवास व्यवस्था नगरेश्वर मंदीर व मंगल कार्यालय, देगलूर येथे केली आहे. 91-मुखेडमतदार संघासाठी कै. गोविंदराव राठोड बहुउद्देशिय सभागृह तालुका क्रीडा संकुल, बीएसएनएल  टॉवरजवळ शांतीनगर, मुखेड येथे निवास व्यवस्था केली आहे. 

तरी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लांब पल्ल्यासाठीच्या मतदारसंघात जाण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत आणि जवळच्या अंतरासाठी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 ते 6 वाजता बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतुक व्यवस्थापन कक्ष प्रमुख तथा पुनर्वसन अधिकारी यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1110

देगलूरसाठी नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालयात निवासी व्यवस्था 

नांदेड दि. 17 नोव्हेंबर :- लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभा निवडणूक कामासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी नगरेश्वर मंदिर व मंगल कार्यालय, देगलूर याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पुढीलप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

देगलूर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बालाजी सुरनर यांचा मोबाईल क्रमांक 9881182846 आहे. मंडळ अधिकारी जी.पी. पदकोंडे यांचा मोबाईल क्रमांक 9657097098 असून देगलूर सज्जाचे तलाठी टी.जी. रातोळीकर असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8007929262 यांची नियुक्ती केली आहे. तरी मतदान प्रक्रीयेसाठी 18 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या मुक्कामी कर्मचाऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे देगलूर विधानसभेचे  निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी कळविले आहे. 

00000

 वृत्त क्र. 1109

भोकर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च निरीक्षकानी केली तृतीय तपासणी

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर :- भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी 16 नोव्हेंबर रोजी केली.  यावेळी काही उमेदवार तर काही उमेदवारांचे प्रतिनिधी हजर होते. 

गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव , भोकर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे (आयआरएस) व त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना हे आहेत. खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी 16 नोव्हेंबर रोजी उमेदवाराच्या खर्चाची तृतीय तपासणी करुन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार, सहायक खर्च निरीक्षक मारोती फुलारी, खर्च विभागाचे पथक प्रमुख पी. व्ही. गोविंदवार, दिपक गवलवाड व बालाजी वाकडे यांची उपस्थिती होती. 

0000

 वृत्त क्र. 1108

आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार

सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून 48 तासाच्या शांतता कालावधीला सुरुवात

जिल्ह्यामध्‍ये प्रतिबंधात्मक आदेश लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त

नांदेड दि. 17 नोव्हेंबर :- 16- नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या सोमवारी सायंकाळी  6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्‍त करण्‍यात आला असून निर्भय व पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्‍येने नागरिकांना मतदान करण्‍याचे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रमाणे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम 163 लागू होईल. याची नोंद घेण्‍याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, सोशल मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीयामध्ये आवाहन करता येणार नाही, जाहिराती देता येणार नाही,  असे स्पष्ट केले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण  मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (303103), नांदेड उत्तर (358918), नांदेड दक्षिण (316821), नायगाव (310375), देगलूर (312237), मुखेड (307092) असे एकूण 19 लक्ष 8 हजार 546 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 9 लक्ष 78 हजार 234  तर महिला 9 लक्ष 30 हजार 158 तर 154 तृतीय पंथीचा असे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदाराचा समावेश आहे. 

नांदेड विधानसभा मतदार संघात एकूण मतदार

नांदेड विधानसभा मतदारसंघात किनवट (278665), हदगाव (299086), भोकर (303103), नांदेड उत्तर (358918), नांदेड दक्षिण (316821), लोहा (301650), नायगाव (310375), देगलूर (312237), मुखेड (307092) यामध्ये पुरुष 14 लक्ष 30 हजार 365 तर महिला 13 लाख 57 हजार 410 तर तृतीयपंथी 172 असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदाराचा समावेश आहे.

3 हजार 88 केंद्र ; 5 संवेदनशील

जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण ३ हजार ८८ आहे. मतदान केंद्रांचे ठिकाण 1992 आहे यामध्ये शहरी मतदान केंद्र 396 व ग्रामीण 1596 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100% मतदान अधिकारी महिला असलेले, 100% मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100% मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 9 आहेत. याशिवाय जिल्ह्यात ५ संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ, मुखेड मधील कोलेगाव केंद्राचा समावेश आहे. या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी 21 हजारावर कर्मचारी तैनात केले गेले असून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे. 

बुथ व्यवस्थापन महत्वाचे

यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे. 

कडेकोट बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध

प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्‍ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.

मोबाईल वापरावर बंदी

मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्‍यांना अधिकारी दिले आहे त्‍यांच्‍या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्‍यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक सुटी ; बाजार बंद

20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बुधवार 20 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.

48 तास मद्य विक्री बंद

कायदा सुव्यवस्थेसाठी सोमवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.

रेडिओ संदेश बल्क एसएमएस, सोशल मिडीया प्रसिध्दीस बंदी

48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी, सोशल मिडीयावरील व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

पुढील बाबींवर प्रतिबंध असणार नाही

घरोघरी प्रचार करता येईल तथापि ही संख्या पाच पेक्षा जास्त नसावी. दवाखानाच्या गाड्या, ॲब्युलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर, विद्युत विभाग, पोलीस निवडणूक कर्मचाऱ्यांचे  व निवडणूक कर्मचाऱ्यांचे वाहन, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्या, शाळेला जाणारी वाहने यावर बंदी असणार नाही.  

0000

वृत्त क्र. 1107

स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने

मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा

विशेष पोलीस निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्याचा आढावा

नागरिकांनी निर्भय होवून मोठया संख्येने मतदानाला यावे

नांदेड दि. 17 नोव्हेंबर : लोकशाही असल्यामुळे आपले अस्तित्व आहे. लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या निवडणूका निर्भय व पारदर्शी वातावरणात झाल्या पाहिजे. प्रत्येक नोकरदाराने लोकशाही आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे जाणून लोकशाहीचे ऋण चुकविण्यासाठी संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी केले. 

विशेष पोलीस निवडणूक निरीक्षकानी आज सकाळी नांदेड व लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला . या बैठकीला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे तथा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची ऑनलाईन पध्दतीने उपस्थिती होती.

पोलीसांचा कॅमेरा आता प्रत्येक ठिकाणी

पुढच्या 48 तासात लोकशाहीचे भविष्य निश्चित होणार आहे. पोलीस विभागासाठी हे 48 तास 24 गुन्हीले 7 लक्ष ठेवण्याचे आहे. तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा शंभर टक्के वापर करा. शक्य त्या ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिग करा. यामध्ये ईव्हीएम मतदान केंद्रावर पोहोचविण्यासह बुथवरील सुरक्षा व्यवस्थेचेही रेकॉर्डिग ठेवा. प्रत्येक बुथवरच्या पोलीस कर्मचाऱ्यांने किती मिनीटात रिपोर्टीग करायचे, याबाबतची निश्चित कालमर्यादा पोलींग स्टेशन ते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा प्रतिसाद कालावधी जितका कमी कराल तीतक्या चांगल्या पध्दतीने कामकाज होईल, असेही त्यांनी यंत्रणेला निर्देश दिले. 

मोबाईलला परवानगी नाहीच

मतदानाच्या दिवशी  मोबाईलला परवानगी नाही. त्यामुळे आतमध्ये जाऊन होणाऱ्या रेकॉर्डिग व त्यामुळे दाखल होणारे गुन्हे यासंदर्भात कडेकोट पायबंद घाला. शंभर मीटरच्या आतमध्ये मोबाईल किंवा कोणत्याही कॅमेऱ्यावर कोणतेही शुटींग होणार नाही याची काळजी घ्या. 163 कलम याठिकाणी लागली आहे. त्यामुळे सक्तीने वापर करा. केंद्रात प्रवेश करणाऱ्या माणसाला विनाविलंब आतमध्ये प्रवेश करता आला पाहिजे अशा पध्दतीने अनुभवी माणसाची नेमणूक त्याठिकाणी करा. माध्यमासाठी असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्देशाशिवाय कुठलीही हयगय होणार नाही यासाठी काळजी घ्या.

व्हिलचेअरची संख्या वाढवा

रांगेत उभा राहून, संयम बाळगून, काही वेळ देवून, मतदान करणारा सामान्य मतदाता हा खरा लोकशाहीचा रक्षक आहे. त्यामुळे पोलीस दलासह सर्वानी त्याची विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना व्हिलचेअरची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळेल यासाठी काळजी घ्या. गरज भासल्यास खाजगी स्तरावरुन उपलब्ध करा. प्रत्येक गोष्ट कॅमेराच्या नजरेत राहील यादृष्टीने नियोजन करा.

नागरिकांनो निर्भय होवून मतदानाला या

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कडेकोट बंदोबस्त, ठिकठिकाणी नाकाबंदी, निवडणूक कायद्याचे कडक पालन हे सर्व नागरिकांना अतिशय निर्भय, पारदर्शी व सुलभ पध्दतीने मतदान करता यावे यासाठी आहे. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन सामान्य मतदारांना कोणताही त्रास होवू नये तसेच मतदान प्रक्रीया सुलभतेने पार पाडावी यासाठी झटत आहे. मोठया संख्येने नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे व लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रीयेत भाग घ्यावा.  

00000







 लक्षवेध 

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे निवडणूक आयोगाचे प्रवेश पत्र मिळण्यासाठी छायाचित्र दिले होते. त्या सर्वांच्या निवडणूक प्रवेशिका माध्यम कक्षात उपलब्ध आहे. कृपया स्वाक्षरी करून आपापल्या प्रवेशिका घेऊन जाव्यात, प्राप्त कराव्यात ही नम्र विनंती. दुपारी दोन वाजता पासून माध्यम केंद्र नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे या प्रवेशिका आपणास देण्यासाठी उपलब्ध आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...